Sartara news Sadabhau khot Vijay shivtare offices vacant | Sarkarnama

सातारा : दोन्ही पालकमंत्र्यांची संपर्क कार्यालये ओस... 

सरकारनामा ब्युरो
सोमवार, 19 जून 2017

सातारा : जिल्ह्यातील लोकांच्या कामांचा निपटारा व्हावा, तसेच जनतेच्या तक्रारी थेट मंत्र्यांपर्यंत पोहोचाव्यात यासाठी जिल्ह्यात पालकमंत्री व सहपालकमंत्री यांनी आपली संपर्क कार्यालये थाटली आहेत. पण ही कार्यालये जनतेच्या संपर्कापासून दूरच असल्याचे चित्र आहे. कार्यालयाची जबाबदारी असलेली व्यक्ती कार्यबाहूल्यामुळे फिरतीवर जात असल्याने कार्यालयात संपर्क कोणाशी करायचा असा प्रश्‍न जनतेपुढे आहे. 

सातारा : जिल्ह्यातील लोकांच्या कामांचा निपटारा व्हावा, तसेच जनतेच्या तक्रारी थेट मंत्र्यांपर्यंत पोहोचाव्यात यासाठी जिल्ह्यात पालकमंत्री व सहपालकमंत्री यांनी आपली संपर्क कार्यालये थाटली आहेत. पण ही कार्यालये जनतेच्या संपर्कापासून दूरच असल्याचे चित्र आहे. कार्यालयाची जबाबदारी असलेली व्यक्ती कार्यबाहूल्यामुळे फिरतीवर जात असल्याने कार्यालयात संपर्क कोणाशी करायचा असा प्रश्‍न जनतेपुढे आहे. 

राज्यात व केंद्रात भाजपची सत्ता असताना सातारा जिल्ह्यात मात्र, राष्ट्रवादी व कॉंग्रेसचे वर्चस्व आहे. अशा परिस्थितीत जिल्ह्यातील जनतेची कामांचा निपटारा होण्यासाठी व दोन्ही कॉंग्रेसच्या नेत्यांवर अंकुश ठेवण्यासाठी शिवसेनेचे पालकमंत्री विजय शिवतारे व सह पालकमंत्री सदाभाऊ खोत (स्वाभिमानी शेतकरी संघटना) यांच्यावर जबाबदारी दिली आहे.

 त्यापैकी श्री. शिवतारेंचा जिल्ह्यात केवळ कार्यक्रम व बैठकांच्या निमित्ताने संपर्क आहे. तर सहपालकमंत्री सदाभाऊ खोत हे शिवतारेंची उणीव भरून काढण्याचे काम करत आहेत. जिल्ह्यातील जनतेची विविध कामे, समस्या, त्यांचे प्रश्‍न थेट पालकमंत्री व सहपालकमंत्री यांच्यापर्यंत पोहोचावेत, यासाठी दोन्ही मंत्र्यांनी आपापली संपर्क कार्यालये सातारा शहराजवळ थाटली आहेत. 

शिवतारेंचे संपर्क कार्यालय पाटबंधारे विभागाच्या कृष्णानगर येथील कार्यालयाजवळील अधिकाऱ्यांच्या निवासस्थानात तर सदाभाऊंचे संपर्क कार्यालय सातारा तालुका कृषी अधिकारी कार्यालयातील कृषी विकास भवनाला फलक लावून तयार केले आहे. शिवतारेंच्या संपर्क कार्यालयाची जबाबदार त्यांचे स्वीय सहायक निलेश फळके यांच्याकडे तर सदाभाऊंच्या संपर्क कार्यालयाची जबाबदारी स्वीय सहायक अनिल पवार यांच्याकडे आहे. 

या दोघांना ही मंत्री महोदयांच्या विविध कामांचा निपटारा करण्यासाठी जिल्हाभर दौरा करावा लागतो. त्यामुळे संपर्क कार्यालयात अल्पवेळच थांबण्यास मिळते. त्यामुळे इतर वेळी ही दोन्ही कार्यालये मोकळीच असतात. येथे कामांनिमित्त येणाऱ्या जिल्ह्यातील जनतेला नेमका कोणाशी संपर्क करायचा हेच समजत नाही. 

दोन दिवसांपूर्वी सदाभाऊ खोत यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन भवनात खरिप व रब्बी कर्जवाटपासंदर्भात आढावा बैठक घेतली. यावेळी त्यांनी उपस्थितांना माझे साताऱ्यात संपर्क कार्यालय सुरू आहे. जनतेने तेथे येऊन आपल्या समस्या, प्रश्‍न व मागण्यांची निवेदने व इतर माहिती द्यावी. तसेच कार्यालयाला भेट द्यावी ते जनतेसाठीच आहे, असे सांगितले होते. 

पण प्रत्यक्षात त्यांच्या कार्यालयात कोणीही उपस्थित नसते. किमान कार्यालयात आलेल्या व्यक्तीला येथे कोणीही नसेल तर कोणाशी संपर्क करावा, याचा सुचना फलक लावावा, केवळ फलकापूरते कार्यालय राहू नये, अशी अपेक्षा सर्वसामान्य जनतेतून होत आहे. 

संबंधित लेख