Sarpanch Election Every Party Claiming | Sarkarnama


ब्रेकिंग न्यूज

विनोद तावडे कृष्णकुंजवर . राज ठाकरे आणि विनोद तावडे यांच्यात चर्चा .

एकाच सरपंचाचा तिन्ही पक्षांकडून सत्कार : प्रत्येकजण म्हणतो सरपंच आमचाच!

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 13 ऑक्टोबर 2017

नगर : जिल्ह्यात तिनही प्रमुख पक्षांनी अनेक सरपंच आमचेच असल्याचा दावा करून आपल्या समर्थकांचा आकडा वाढविला आहे. भारतीय जनता पक्षाने तर २०४ जागांपैकी तब्बल १०८ सरपंच आमचेच असल्याचे सांगून आघाडी घेतली आहे. मात्र, आता एकाच सरपंचाचे वेगवेगळ्या पक्षांकडून सत्कार होऊ लागले आहेत. त्यामुळे आपण नक्की कुणाचे असा प्रश्न त्या सरपंचांनाच पडला नाही तर नवल!

नगर : जिल्ह्यात तिनही प्रमुख पक्षांनी अनेक सरपंच आमचेच असल्याचा दावा करून आपल्या समर्थकांचा आकडा वाढविला आहे. भारतीय जनता पक्षाने तर २०४ जागांपैकी तब्बल १०८ सरपंच आमचेच असल्याचे सांगून आघाडी घेतली आहे. मात्र, आता एकाच सरपंचाचे वेगवेगळ्या पक्षांकडून सत्कार होऊ लागले आहेत. त्यामुळे आपण नक्की कुणाचे असा प्रश्न त्या सरपंचांनाच पडला नाही तर नवल!

जिल्ह्यात नुकत्याच झालेल्या १०५ ग्रामपंचायतींचे निकाल हाती आल्यानंतर भारतीय जनता पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस या तिन्ही पक्षांच्या प्रदेशाध्यक्षांनी आपल्याच जास्त जागा असल्याचे ठामपणे सांगितले. प्रत्यक्षात अनेक सरपंचांचे विविध पक्षाच्या पदाधिकाऱ्यांकडून सत्कार झाले आहेत. त्यामुळे सत्कार झाला, की तो आपल्याच पक्षाचा असे संबंधितांनी गृहित धरून आकडेवारी वाढविली आहे. अनेक सरपंच नव्याने नियुक्त झाले आहेत. निवडणुकीत पक्षाचे चिन्ह वापरण्यात आले नसल्याने सर्वच अपक्ष म्हणूनच निवडून आले. त्यामुळे निवड झाल्यानंतर प्रत्येकाने आपल्या नेत्यांची भेट घेऊन त्यांच्याकडून सत्कार करून घेतला. तो सोशल मिडीयावर 'व्हायरल' करुन आपण संबंधित पक्षाचे आहोत, हे जाहीर करून टाकले.

पारनेर तालुक्यातील कोहकडी गावचे नव्याने नियुक्त झालेले सरपंच डाॅ. साहेबराव पानगे यांचा तीन दिवसांत तीन वेगवेगळ्या पक्षांनी सत्कार केला. त्यांनी नेत्यांच्या गाठीभेटी घेतल्या. तिनही सत्कार त्यांनी स्विकारल्याने हे सरपंच नेमका कोणत्या पक्षाचे, याबाबत संभ्रम निर्माण झाला. डाॅ. पानगे हे पुर्वाश्रमीचे समाजवादी पक्षाचे कार्यकर्ते. निवडीनंतर त्यांचा सत्कार शिवसेनेचे आमदार विजय औटी यांच्या हस्ते करण्यात आला. त्यामुळे त्यांच्याच मार्गदर्शनाखाली काम करणार असल्याचे जाहीर झाले. त्यामुळे ते आता शिवसेनेत गेल्याचे जाहीर झाले. दुसऱ्याच दिवशी राष्ट्रवादीचे नेते जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुजीत झावरे यांच्या हस्ते त्यांचा सत्कार झाला. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी डाॅ. पानगे आमच्या पक्षाचे असल्याचे जाहीर करून टाकले. तिसऱ्या दिवशी पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांच्या हस्ते त्यांचा सत्कार झाला. त्यामुळे भाजपने आपल्या यादीत डाॅ. पानगे यांचा समावेश करून टाकला. मग नेमका ते कोणत्या पक्षाचे, हा प्रश्न सर्वांनाच पडला. नंतर त्यांनी आपली भूमिका जाहीर करून 'आपण कोणत्याच पक्षाचे नसून, अपक्षच आहोत. गावचा विकास हेच ध्येय असल्याने सर्वच पक्षातील नेते मित्र आहेत. त्यामुळे सर्वांची भेट घेतली,' असे सांगितल्याने या वादावर पडदा पडला.

नगर तालुक्यातील आगडगाव येथील नव्याने सरपंच म्हणून निवडून आलेले मच्छिंद्र कराळे पुर्वाश्रमीचे भाजपचे माजी मंत्री बबनराव पाचपुते यांचे कार्यकर्ते. निवडणूक झाल्यानंतर मात्र विद्यमान राष्ट्रवादीचे आमदार राहुल जगताप यांच्या हस्ते सत्कार स्विकारतानाचे छायाचित्र सोशल मिडियावर झळकू लागले. त्यामुळे ते आता राष्ट्रवादीचे झाले, असे जाहीर झाले. जिल्ह्यात असे अनेक किस्से घडले आहेत.

जिल्ह्यात भाजपचे १०८ सरपंच निवडून आल्याचे जिल्हाध्यक्ष प्रा. भानुदास बेरड यांनी 'सरकारनामा'शी बोलताना सांगितले. राष्ट्रवादी काँग्रेसने ६४ ग्रामपंचायतींवर आपले सरपंच निवडून आल्याचा दावा केला असल्याचे जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर घुले यांनी सांगितले, तर काँग्रेसने ६८ सरपंच आपलेच निवडून आल्याचे सांगितले. सरपंच पातळीवर पक्षाला जास्त महत्त्व दिले जात नाही. संपूर्ण गावातून निवडून यायचे असल्याने सर्वच पक्षाच्या कार्यकर्त्यांना बरोबर घेऊन निवडणूक लढविल्याशिवाय पर्याय नाही, हेच यावरून स्पष्ट झाले आहे.

 

संबंधित लेख