थेट सरपंच निवडणूक : साडेसात हजार ग्रामपंचायतींसाठी दोन टप्प्यांत मतदान 

सरपंचपदासाठी फिकी निळी मतपत्रिकापहिली मतपत्रिका सरपंचपदाच्या जागेसाठी असेल. सरपंचपदासाठीच्या मतपत्रिकेचा रंग फिका निळा असेल. सदस्यपदाच्या मतपत्रिकांचे रंग पूर्वीप्रमाणेच असतील अनुसूचित जातीच्या जागेसाठीच्या मतपत्रिकेचा रंग फिका गुलाबी, अनुसूचित जमातीच्या राखीव जागेसाठीच्या मतपत्रिकेचा रंग फिका हिरवा; तर नागरिकांचा मागासप्रवर्गाच्या जागेसाठीच्या मतपत्रिकेचा रंग फिका पिवळा असेल. सर्वसाधारण जागेसाठीच्या मतपत्रिकेचा रंग पांढरा असेल.
SARPANCH
SARPANCH

मुंबई    : राज्यात नोव्हेंबर व डिसेंबर 2017 मध्ये मुदत संपणाऱ्या सात हजार 576 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी दोन टप्प्यांत 7 आणि 14 ऑक्‍टोबर 2017 रोजी मतदान होणार आहे. 

यात सदस्यांसह थेट सरपंचपदांच्या निवडणुकांचाही समावेश आहे. पहिल्या टप्प्यात विविध 18 जिल्ह्यांतील तीन हजार 884 तर दुसऱ्या टप्प्यात 16 जिल्ह्यांतील तीन हजार 692 ग्रामपंचायतींसाठी मतदान होईल.

त्यासाठी संबंधित ठिकाणी आजपासून आचारसंहिता लागू झाली आहे, अशी घोषणा राज्य निवडणूक आयुक्त ज. स. सहारिया यांनी शुक्रवारी येथे पत्रकार परिषदेत केली. 

सहारिया म्हणाले की, ऑक्‍टोबर 2017 ते फेब्रुवारी 2018 या कालावधीत राज्याभरातील सुमारे 8,500 ग्रामपंचायतींच्या मुदती संपत आहेत. घटनेतील तरतुदीनुसार मुदत संपण्यापूर्वी त्यांच्या निवडणुका घेणे आवश्‍यक आहे.

यापैकी ऑक्‍टोबर 2017 मध्ये मुदत संपणाऱ्या 114 ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम यापूर्वीच जाहीर करण्यात आला आहे. त्यासाठी 23 सप्टेंबर रोजी मतदान होत आहे.

नोव्हेंबर व डिसेंबर 2017 मध्ये मुदती संपणाऱ्या ग्रामपंचायत निवडणुकांचा कार्यक्रम आज जाहीर केला आहे. जानेवारी व फेब्रुवारी 2018 मध्ये मुदत संपणाऱ्या 689 आणि नव्याने स्थापित झालेल्या 37 ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचा कार्यक्रम नंतर जाहीर करण्यात येईल. 

तीन ते चार मते देणे आवश्‍यक 
थेट सरपंचपदासाठी पहिल्यांदाच मोठ्या प्रमाणावर मतदान होत असल्याने आचारसंहितेबाबत विशेष दक्षता घेण्याचा आदेश दिला आला आहे. एका मतदाराला कमीत कमी तीन व जास्तीत जास्त चार मते द्यावी लागतील. एक मत थेट सरपंचपदासाठी असेल; तर अन्य मते आपल्या प्रभागातील सदस्यपदांसाठी द्यावी लागतील. पूर्वीप्रमाणेच सदस्यांसह थेट सरपंचपदाच्या निवडणुकीसाठीदेखील निवडणूक चिन्ह म्हणून मुक्त चिन्हांचा वापर केला जाईल. राजकीय पक्षांसाठी आरक्षित असलेल्या चिन्हांचा या निवडणुकीत वापर होणार नाही. 

पहिला टप्पा 
पहिल्या टप्प्यासाठी उमेदवारी अर्ज 15 सप्टेंबर ते 22 सप्टेंबर या कालावधीत दाखल करता येतील. ते 27 सप्टेंबरपर्यंत मागे घेता येतील. त्याच दिवशी निवडणूक चिन्हांचे वाटप होईल. 7 ऑक्‍टोबर रोजी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 या वेळेत मतदान होईल. 9 ऑक्‍टोबर रोजी मतमोजणी होईल. 

पहिल्या टप्यात 7 ऑक्‍टोबर रोजी मतदान होणाऱ्या ग्रामपंचायतींची जिल्हानिहाय संख्या : नाशिक- 170, धुळे- 108, जळगाव- 138, नंदुरबार- 51, अहमदनगर- 204, औरंगाबाद- 212, बीड- 703, नांदेड- 171, परभणी- 126, उस्मानाबाद- 165, जालना- 240, लातूर- 353, हिंगोली- 49, अमरावती- 262, अकोला- 272, यवतमाळ- 93, वाशीम- 287 आणि बुलडाणा- 280. एकूण- 3,884. 


दुसरा टप्पा 

दुसऱ्या टप्प्यासाठी नामनिर्देशनपत्रे 22 सप्टेंबर ते 29 सप्टेंबर या कालावधीत दाखल करता येतील. 5 ऑक्‍टोबर 2017 पर्यंत मागे घेता येतील. त्याच दिवशी निवडणूक चिन्हांचे वाटप होईल. 14 ऑक्‍टोबर 2017 रोजी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 या वेळेत मतदान होईल. मात्र गडचिरोली जिल्ह्यासाठी मतदानाची वेळ सकाळी 7.30 ते दुपारी केवळ 3.00 वाजेपर्यंत असेल. या सर्व ठिकाणी 16 ऑक्‍टोबर रोजी मतमोजणी होईल. 

दुसऱ्या टप्यात 14 ऑक्‍टोबर रोजी मतदान होणाऱ्या ग्रामपंचायतींची जिल्हानिहाय संख्या अशी: ठाणे- 41, पालघर- 56, रायगड- 242, रत्नागिरी- 222, सिंधुदुर्ग- 325, पुणे- 221, सोलापूर- 192, सातारा- 319, सांगली- 453, कोल्हापूर- 478, नागपूर- 238, वर्धा- 112, चंद्रपूर- 52, भंडारा- 362, गोंदिया- 353 आणि गडचिरोली- 26. एकूण- 3,692. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com