Sarpanch claimed by Harshwardhan attends NCP function | Sarkarnama

हर्षवर्धन पाटील यांनी दावा केलेले सरपंच आमदार भरणेंच्या बंगल्यावर

राजकुमार थोरात
बुधवार, 18 ऑक्टोबर 2017

माजी मंत्री हर्षवर्धन पाटील आणि आमदार दत्तात्रेय भरणे यांच्यात इंदापूर तालुक्यातील किती ग्रामपंचायती निवडणुकीत ताब्यात आल्या, यावरून वाद सुरू झाला आहे. दोघांनीही समान ग्रामपंचायतींवर दावा केला होता. मात्र भरणे यांनी यात बाजी मारत पाटील यांनी दावा केलेल्या सरपंचांना थेट आपल्या घरी बोलावून घेतले. 

वालचंदनगर : राष्ट्रवादी कॉंग्रेस पुरस्कृत पॅनेलमधून निवडून आलेल्या नवनिर्वार्चित सरपंचांचा भरणेवाडी (ता.इंदापूर) येथे आमदार दत्तात्रेय भरणे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रमास काॅंग्रेस पक्षाने दावा केलेल्या पाच ग्रामपंचायतीचे सदस्यही उपस्थित राहिले होते.

आमदार भरणे यांनी काॅंग्रेस पक्षाने दावा केलेल्या ग्रामपंचायतीच्या सरपंचांचा सत्कार करून त्यांचा दावा फोल ठरवून ग्रामपंचायतीच्या झालेल्या निवडणूकीमध्ये तालुक्‍यावरती राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे वर्चस्व असल्याचे भरणे यांनी सिद्ध केले. 
इंदापूर तालुक्‍यातील 26 ग्रामपंचायतीच्या निवडणुका जाहीर झाल्या होत्या. यातील गंगावळण, पडस्थळ, झगडेवाडी, सराटी या गावच्या निवडणुका बिनविरोध झाल्याने 22 ग्रामपंचायती निवडणुका पार पडल्या. निवडणुकीच्या निकालानंतर राष्ट्रवादी कॉंग्रेस व कॉंग्रेस पक्षामध्ये संख्याबळासाठी चढाओढ सुरू झाली. दोन्ही पक्षांनी 17 ग्रामपंचायतीवर आमचाच झेंडा फडकल्याचा जाहीर केले. 

आमदार भरणे यांनी आज (बुधवार) रोजी नवनिर्वार्चित सरपंच व ग्रामपंचायत सदस्यांचा भरणेवाडी येथे सत्काराच्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमामध्ये कॉंग्रेस पक्षाने दावा केलेल्या कुरवली, डाळज नंबर - 2 व डाळज नंबर - 3, झगडेवाडी, पिंपरी - शिरसोडी या गावांतील सरपंचांनी हजेरी लावल्याने या ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचा झेंडा फडकला असल्याचे सिद्ध झाले. गंगावळण व पडस्थळच्या सरपंचांना कार्यक्रमास येण्यास उशीर झाल्याने आमदार दत्तात्रेय भरणे यांची इंदापूर शहरामध्ये भेट घेऊन आम्ही राष्ट्रवादीचेच सरपंच असल्याचे सांगितल्याने तालुक्‍यातील 15 ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचा झेंडा फडकला आहे. 

कॉंग्रेसच्या सत्काराला कोणते सरपंच जाणार? 

राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाने सरपंचाच्या सत्काराच्या कार्यक्रमानंतर तालुक्‍यामध्ये लवकरच कॉंग्रेस पक्षाच्या वतीने नवनिर्वार्चित सरपंच,सदस्यांचा सत्कारही होण्याची शक्‍यता आहे. या कार्यक्रमाला कोणत्या गावाचे सरपंच उपस्थित राहणार याकडे तालुक्याचे लक्ष लागले आहे. 
 

संबंधित लेख