sarkarnama effect - officer transfer | Sarkarnama

कौशल्य विकास, आरोग्य खात्यांच्या सचिवांची बदली

तुषार खरात
सोमवार, 10 जुलै 2017

दोन्ही खात्यांच्या सचिवांचा बेजाबदारपणा "सरकारनामा'ने चव्हाट्यावर आणल्यानंतर अवघ्या आठवडाभरातच त्यांची उचलबांगडी करण्यात आली आहे. 

मुंबई : कौशल्य विकास खात्याचे प्रधान सचिव दीपक कपूर व आरोग्य खात्याचे अपर मुख्य सचिव डॉ. विजय सतबीर सिंग यांच्या निराशाजनक कामाचे कारनामे "सरकारनामा'ने उघड केल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज कपूर यांची तडकाफडकी बदली केली. तर आरोग्य खात्यात नव्या सचिवांची नियुक्ती केली. 

कपूर यांच्याकडे झोपडपट्टी पुनवर्सन प्राधिकरणाचे (एसआरए) मुख्य कार्यकारी पद दिले आहे, तर आरोग्य खात्याचे प्रधान सचिव म्हणून डॉ. पी. के. व्यास यांची नियुक्ती केली आहे. दीपक कपूर व डॉ. सतबीर सिंग यांच्या निष्काळजीपणाचा पर्दापाश "सरकारनामा'ने गेल्या आठवड्यात केला होता. पंतप्रधानांच्या स्वप्नातील 
"स्कीलिंग इंडीया'सारखे महत्त्वाकांक्षी उपक्रम राबविण्याची जबाबदारी कौशल्य विकास खात्याकडे आहे. पण कपूर यांच्याकडून महिनोंमहिने फाईल्सचा निपटारा होत नव्हता. ते त्यांच्यात खात्यातील कक्ष अधिकारी, उपसचिव, संचालनालयातील अधिकारी यांना कार्यालयात येऊ देत नव्हते. 

त्यांच्या निष्काळजीपणामुळे राज्यातील पंधराशे आयटीआय तुकड्यांच्या संलग्नतेचा प्रश्‍न लोंबकळत पडला आहे. जागतिक बॅंकेचा एक प्रकल्प प्रलंबित आहे. कपूर यांच्या कारभाराचे किस्से "सरकारनामा'ने चव्हाट्यावर आणले होते. डॉ. सतबीर सिंग दीड महिन्यांपासून सतत रजेवर व परदेश दौऱ्यावर होते. त्यामुळे आरोग्य खात्याचे महत्त्वाचे निर्णय घेता येत नव्हते. 

ऐन पावसाळ्यात साथीच्या आजारांची शक्‍यता असल्याने त्याबाबतचेही काही निर्णय घेता येत नव्हते. त्यामुळे आरोग्य मंत्री दीपक सावंत यांनी एका बैठकीत संताप व्यक्त करीत मुख्य सचिव सुमीत मल्लिक यांच्याकडेच तक्रार केली होती. आमच्या खात्याला दुसरा सचिव द्या, अशी आग्रही मागणी सावंत यांनी केली होती.

दरम्यान, डॉ. सतबीर सिंग या महिनाअखेरीला निवृत्त होणार होते. पण त्यांनी त्यापूर्वीच स्वेच्छानिवृत्ती घेतली. पंधरवड्यापूर्वी "रेरा' प्राधिकरणाचे सदस्य म्हणून त्यांची पाच वर्षांसाठी नियुक्ती करण्यात आली होती. या पार्श्‍वभूमीवर डॉ. सतबीर सिंग यांचे आरोग्य खात्याकडे दुर्लक्ष झाले होते. त्यामुळे आरोग्य खात्याचा बोजवारा उडाला होता. परिणामी मुख्यमंत्र्यांनी तातडीने डॉ. व्यास यांची डॉ. सतबीर सिंग यांच्या जागेवर नियुक्ती केली. 

या दोन्ही खात्यांच्या सचिवांचा बेजाबदारपणा "सरकारनामा'ने चव्हाट्यावर आणल्यानंतर अवघ्या आठवडाभरातच त्यांची उचलबांगडी करण्यात आली आहे. 

संबंधित लेख