अजित पवार आले आणि गेले... 

माजी उपमुख्यमंत्री अजित पवार हे जिल्हा परिषद आणि पालिका निवडणुकीनंतर मौनात गेले आहेत. ते या विषयावर बोलायलाच तयार नाहीत.
AJIT-PAWAR
AJIT-PAWAR

माजी उपमुख्यमंत्री अजित पवार हे जिल्हा परिषद आणि पालिका निवडणुकीनंतर मौनात गेले आहेत. ते या विषयावर बोलायलाच तयार नाहीत. अधिवेशन सुरू असल्याने ते सरकार विरोधात तोफ डागतील. कोणत्या तरी विषयावर सरकारला धारेवर धरतील, अशी अपेक्षा होती. पण आज ते सभागृहात आले आणि लगेच गेले. मिडीयाच्या मंडळींना त्यांना थांबविण्याचा प्रयत्न केला. पण अजितदादांनी त्यांच्या दिशेने हात हलविला आणि ते निघून गेले. 

आमदार परिचारकांच्या बडतर्फीसाठी 
विधान परिषदेत विरोधक आक्रमक 

भाजपचे सहयोगी आमदार प्रशांत परिचारक यांनी निवडणूक प्रचारात लष्करी जवानांचा अपमान करणारे वक्तव्य केले होते. यावरून त्यांचे सदस्यत्व कायमस्वरूपी रद्द करण्याच्या मागणीसाठी विधान परिषदेतील विरोधकांनी आजचं सभागृहाचं कामकाज बंद पाडलं. विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी तर परिचारकांचा एकेरी उल्लेख करीत टिकेची तोफ डागली. सभागृहानं ठराव करून एखाद्या आमदाराची बडतर्फी करणं हे दुर्मिळ मानलं जातं. आता विरोधक हा पवित्रा शेवटपर्यंत ठेवतात की परिचारकांच्या माफीनंतर तोडगा निघेल हे पाहायला हवे. 

सदाभाऊ खोतांचा चेहरा पडला 
विधीमंडळाचे कामकाज सुरू होण्याअगोदरच स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे आंदोलन सुरू होते. शेतीमालाला भाव मिळत नसल्याने स्वाभिमानी संघटनेने शेतकऱ्यांच्या विधानभवनावर मोर्चा काढला. यावेळी कांदा, डाळ रस्त्यावर टाकून विधानभवनाचा रस्ता रोखला होती. शेतकरी संघटनेची हा गनिमी कावा भलताच चर्चेला आला. माध्यमांची पळापळ, पोलीसांची गडबड यातच खासदार राजू शेट्टींचा तीर निशाण्याला लागल्याचे जाणवले. गेल्याकाही दिवसापासून मंत्रिपदी बसलेले सदाभाऊ खोत हे स्वाभिमानीच्या निशाणावर आहेत. आता आपल्याच्या मंत्र्यांच्या नाकर्तेपणा विरोधात संघटनेने मोर्चा काढला. यामुळे सदाभाऊ मात्र चांगलेच अस्वस्थ झालेले दिसले. मी शेतकऱ्यांचा प्रतिनिधी असून यातून मार्ग काढत असल्याचे सांगत सदाभाऊ यांनी बचाव करण्याचा प्रयत्न केला. सदाभाऊंची देहबोली मात्र कमालीची खालावली होती. यामुळे प्रश्नोत्तराच्या तासातून सदाभाऊंनी काढता पाय घेतला. 

"माल त्याचं हालं, चोरटं खुशाल' 
मंत्रालयाच्या आवारात फिरत असताना खासदार राजू शेट्टीचा यांचा एका सामान्य माणसासोबतचा हा डायलॉग! ""कुणी म्हणतंय राज्यातील शेतकरी सुखात हाय. सरकारबी शेतकऱ्यांसाठी लय काय करायला लागलयं. तरं कुणी म्हणतय शेतकऱ्याकडं बघायला सरकारला टाइम न्हाय. या सगळ्या गोंधळामुळं मी मुंबईला आलुयं. नक्की काय चाललयं ते बघायला. राजू शेट्टींच्या या उद्‌गारावर सामान्य शेतकऱ्याने खोचक सवाल करत विचारलं, ""मग या सरकारमधील तुम्हाला काय खबर खुशाली दिसली? त्यावर मिश्‍किलपणे हसत राजू शेट्टींनी उत्तर दिलं. ""माल त्याचं हाल आणि चोरटं खुशाल.'' 


मंत्र्यांचे आडनाव मेहता की महेता? 
विधानसभेत प्रश्‍नोत्तराच्या तासात जुन्या इमारतींच्या पुनर्विकासासंबंधीच्या प्रश्नाला मंत्री रविंद्र वायकर यांनी पारदर्शी उत्तर देतो म्हणत विरोधकांचे मनोरंजन केले. त्यांच्या प्रश्नांच्या छापील उत्तरात मंत्री प्रकाश मेहता यांचे नाव " महेता " असे छापण्यात आले. हाच धागा पकडत आमदार जयदत्त क्षीरसागर यांनी मंत्री मेहता यांच्या नाव ही पारदर्शकपणे सांगा म्हणत छापील उत्तरातील चूक लक्षात आणून दिली. पण मेहता हे त्यांचे आडनाव महेता असे लावत असल्याचे पारदर्शीपणामुळे उघड झाले. 

चर्चा राज्याच्या सिंचनाची; 
पण आमदाराला प्यायला पाणी नाही 

विधानसभेत भाजपचे आमदार अनिल बोंडे राज्याच्या सिंचनावर बोलत होते. आमदार बोंडे यांचे आवाज बसत होता शेतकऱ्यांच्या पाण्याचा प्रश्न गंभीर झाला असल्याचे सांगतानाच आपल्याला पाणी देण्याची मागणी आमदार बोंडे यांनी केली. त्याला तालिका अध्यक्ष शिवाजी देशमुख यांनी नकार देत सभागृहात पाणी पिता येणार नसल्याचे सांगितले. इतर सदस्यांनी विरोधकांना पाणी पाजण्यासाठी अनिल बोंडेंना पाणी द्या. बिचारे आजारी आहेत, असे म्हणतं बोंडेंची बाजू लावून धरली. तरीही अध्यक्षांनी ठामपणे नकार दिल्यानंतर आपला मुद्द अर्धवट सोडत बोंडेंना पाणी पिण्यासाठी सभागृहाबाहेर जावे लागले. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com