sarita more new meyor in kolhapur | Sarkarnama

चंद्रकांतदादांची जादू चालली नाही; राष्ट्रवादीच्या सरिता मोरे 'एकतर्फी' महापौर

सरकारनामा ब्युरो
सोमवार, 10 डिसेंबर 2018

गोंधळात पोलीस आणि आमदार मुश्रीफ, आमदार सतेज पाटील यांच्यात धक्‍काबुक्‍की झाली. 

कोल्हापूर : अत्यंत अटीतटीची व अंतीम क्षणी एकतर्फी झालेल्या कोल्हापूर महापालिकेच्या महापौर निवडीत कॉंग्रेस राष्ट्रवादी आघाडीच्या सरिता मोरे यांनी बाजी मारली. तर उपमहापौरपदी आघाडीच्या भुपाल शेटे यांची निवड झाली. महापौर निवड प्रक्रियेमध्ये मोरे यांना 41 तर ताराराणी आघाडीच्या जयश्री जाधव यांना 33 मते मिळाली. या निवडीनंतर कॉंग्रेस राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला. पाच नगरसेवकांच्या अपात्रतेचा आदेश अखेरपर्यंत आला नाही. या निवडणूकीत शिवसेनेचे चार नगरसेवक अनुपस्थित राहीले. 

महापौर निवडणूक जाहीर झाल्यानंतर राष्ट्रवादीचे नगरसेवक अपात्र करण्याचा मुददा चांगलाच गाजला. सात नगरसेवक अपात्र करण्यावर सोमवारी सकाळी काय निर्णय होणार, याची नेत्यांसह नगरसेवकांना धास्ती होती. सोमवार सकाळी साडे दहाच्य सुमारास महापालिकेत प्रवेश करताना असताना या 5 अपात्र नगरसेवकांना पोलीसांनी आडवल्याने एकच गोंधळ आणि आरोप प्रत्यारोप सुरु झाले. तीन वर्षे काही कारवाई केली नसताना, आताच कारवाई कशी करता, अशी विचारणा आमदार मुश्रीफ यांनी केली. तसेच पालकमंत्र्यांची हुकूमशाही सुरु असून या हुकूमशाही सरकारच्या निषेध करत असल्याच्या घोषणा आमदार मुश्रीफ व त्यांच्या समर्थकांनी दिल्या. या सर्व गोंधळात पोलीस आणि आमदार मुश्रीफ, आमदार सतेज पाटील यांच्यात धक्‍काबुक्‍की झाली. 

सभागृहाबाहेरील मोठ्या गोंधळानंतर कॉंग्रेस राष्ट्रवादीचे नगरसेवक सभागृहात दाखल झाले. त्यापाठोपाठ भाजप ताराराणी आघाडीचे नगरसेवसक सभागृहात दाखल झाले. यावेळी अजिंक्‍य चव्हाण, अफजल पिरजादे, अश्‍विनी रामाणे यांना सभागृहाच्या कामकाजात भाग घेता येणार नाही, असे सांगण्यात आले. तसेच अपात्र नगरसेवकांबाबत शासन स्तरावरुन काहीच निर्णय न आल्याने त्यांना मतदान करण्याचा अधिकार देण्यात आला. त्याचेवळी सरिता मोरे यांच्या महापौर पदाचा मार्ग मोकळा झाला. मोरे यांना 41 तर भाजप ताराराणी आघाडीच्या जयश्री जाधव यांना 33 मते मिळाली.महापौरांना ज्या पध्दतीने मतदान झाले तेवढेच मतदान उपमहापौर पदासाठी कॉंग्रेस राष्ट्रवादीच्या भूपाल शेटे यांना झाले. पिठासन अधिकारी अमन मित्तल यांनी सरिता मोरे यांना महापौर म्हणून तर भूपाल शेटे यांना उपमहापौर म्हणून घोषित केले.
 

संबंधित लेख