sanyogitarje plays major role in sambhajiraje politics | Sarkarnama

खासदार संभाजीराजेंचा 'किल्ला' लढविणाऱ्या संयोगिताराजे! 

सदानंद पाटील 
शनिवार, 21 जुलै 2018

पंचगंगा नदी प्रदूषणाचा मार्गी लावण्यासाठी केंद्र आणि राज्य शासनाकडे पाठपुरावा करणाऱ्या, कोल्हापूरची विमानसेवा सुरळीत होण्यासाठी नागरी हवाई उड्डाण मंत्रालय आणि एअर डेक्कनच्या संपर्कात असणाऱ्या, शिवाजी पूल बांधकामासाठी भारतीय पुरातत्व अधिकाऱ्यांशी पत्रव्यवहार करणाऱ्या संयोगिताराजे. 

कोल्हापूर : राजघराण्यातील व्यक्तीमत्वाबद्दल कुतूहल असते. त्यातही जी व्यक्ती सार्वजनिक कार्यक्रमात असत नाही त्या व्यक्तीबद्दल ते अधिक निर्माण होते आणि त्यापैकीच एक म्हणजे खासदार युवराज संभाजीराजे यांच्या पत्नी संयोगिताराजे. 

संयोगिताराजे यांचा सार्वजनिक कार्यक्रमात फारसा वावर नव्हता. मात्र, रायगडावर होणारा शिवराज्याभिषेक सोहळा आणि पन्हाळगडावरील स्वच्छता मोहिमेत मात्र त्यांचा सक्रिय सहभाग राहिला. खरे तर या मोहिमांचे मायक्रो प्लॅनिंगपासून अंमलबजावणीपर्यंतचे काम त्यांनी केले. 

संभाजीराजे राज्यसभा सदस्य झाले आणि संयोगिताराजे यांच्या व्यवस्थापन कौशल्याला वाव मिळाला. यातच भर पडली ती आदर्श सांसद ग्राम योजनेची. या कामात झोकून देण्यापूर्वी त्यांनी महात्मा गांधींचे विचार आत्मसात केले. खेड्याकडे चला असे गांधीजींनी का सांगितले, त्यावर चिंतन करूनच त्यांनी ग्रामविकासाच्या दिशेने पाऊल उचलले. अनेक गावांचे ऑप्शन असताना त्यांनी गाव निवडले ते जिल्ह्यातील सर्वात दुर्गम तालुका असलेल्या शाहूवाडी येथील. 12 वाड्यांचे येळवण जुगाई हे गाव. 

केंद्र आणि राज्य पातळीवरील प्रश्न सोडवत असतानाच जिल्ह्यातील गोर-गरीब जनतेचे, तरुणांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी त्या कटिबद्ध आहेत. म्हणूनच अण्णासाहेब पाटील महामंडळ असो की मुद्रा योजना, यातील जाचक अटी रद्द करण्यासाठी त्यांचा पाठपुरावा सुरूच आहे. 

शहरात फिरत असताना प्रत्येकालाच ओसंडून वाहणाऱ्या कचराकुंड्या, अस्वच्छता, पाण्याची डबकी, खड्डे, वाहतुकीला अडथळा असणारी उभी-आडवी वाहने याबद्दल जागृत नागरीक म्हणून टोल फ्री नंबरवर व्यक्तिशः सर्वाधिक तक्रारी नोंदवून, संयोगिताराजे यांनी बोलण्यापेक्षा कृतीतून कामाची दिशा स्पष्ट केली आहे. 

वर्षोनुवर्षे अंबाबाईच्या मंदिरात साडी चोळीचे खण येतात. ते ट्रस्टकडे जमा होतात. पुन्हा त्यांची विक्री होते. एकेदिवशी ट्रस्ट मधील हजार साड्या येळवण जुगाईला नेल्या. तेथील महिलांना शिवणकाम प्रशिक्षण दिले. शिलाई मशीन दिले आणि त्यांच्याकडून कापडी पिशव्या शिवून घेतल्या. गेले वर्षभर या गावातून नाममात्र पैशात लाखो कापडी पिशव्या शिवून घेऊन कृतीतून प्लास्टिक बंदी त्यांनी करून दाखवली आहे. शासनाने जरी आता प्लास्टिक बंदी केली असली तरी राजघराण्याने 11 वर्षापूर्वीच प्लास्टिक बंदी केल्याचे त्या अभिमानाने सांगतात. 

संबंधित लेख