santosh danve | Sarkarnama

आमदार संतोष दानवे शेतकऱ्यांशी संवाद न साधताच निघून गेले

सरकारनामा ब्युरो
रविवार, 28 मे 2017

औरंगाबाद : "एवढी तूर खरेदी केली तरी रडतेत साले' या वक्तव्यामुळे भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या विरोधात शेतकऱ्यांमध्ये असलेल्या असंतोषाचा फटका त्यांचे पुत्र आमदार संतोष दानवे यांना देखील बसला आहे. भाजपच्या शिवार संवाद यात्रेच्या निमित्ताने शेतकऱ्यांच्या भेटीगाठी घेण्यासाठी जाणाऱ्या संतोष दानवे यांच्यावर शेतकऱ्यांनी प्रश्‍नांचा भडिमार केला. परिणामी शेतकऱ्यांशी संवाद न साधताच माघारी फिरण्याची त्यांच्यावर वेळ आली. 

औरंगाबाद : "एवढी तूर खरेदी केली तरी रडतेत साले' या वक्तव्यामुळे भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या विरोधात शेतकऱ्यांमध्ये असलेल्या असंतोषाचा फटका त्यांचे पुत्र आमदार संतोष दानवे यांना देखील बसला आहे. भाजपच्या शिवार संवाद यात्रेच्या निमित्ताने शेतकऱ्यांच्या भेटीगाठी घेण्यासाठी जाणाऱ्या संतोष दानवे यांच्यावर शेतकऱ्यांनी प्रश्‍नांचा भडिमार केला. परिणामी शेतकऱ्यांशी संवाद न साधताच माघारी फिरण्याची त्यांच्यावर वेळ आली. 

भाजपच्या वतीने 25 ते 28 मे दरम्यान संपूर्ण राज्यात शेतकऱ्यांशी "शिवार संवाद' साधण्यासाठी यात्रेची मोहीम हाती घेण्यात आली आहे. त्यानुसार प्रत्येक पंचायत समिती गणामध्ये स्थानिक आमदारांच्या चार सभाचे आयोजन करण्यात आले आहे.

शनिवारी (ता.27) जालना तालुक्‍यातील रेवगाव येथे आमदार संतोष दानवे यांच्या उपस्थितीत कार्यक्रम व सभेचे आयोजन करण्यत आले होते. स्वागत समारंभ पार पडल्यानंतर संतोष दानवे भाषणाला उभे राहणार तोच समोर बसलेल्या शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करायला सुरुवात केली.

शेतकऱ्यांना कर्जमुक्त करा यासह अकरा मागण्या करत घोषणाबाजी सुरू झाल्याने गोंधळ उडाला आणि संवादाचे रूपांतर विसंवादात झाले. 
शेतकऱ्यांचे अकरा प्रश्‍न 
शेतकऱ्यांना कर्जमुक्त कधी करणार?, शेती मालाला हमी भाव देऊन त्याचे उत्पन्न दुप्पट कसे होणार, शेवटच्या दाण्यापर्यंत तूर खरेदी करणार या  घोषणेचे काय झाले? शरद जोशी यांच्या टास्क फोर्सचे काय झाले? कांदा, बटाटा जीवनावश्‍यक वस्तू आहेत का? गोवंश हत्या बंदीने सरकार काय साध्य करू पाहते, शासकीय कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू केल्यावर विकास कामासाठी पैसे कुठून आणणार आदी अकरा प्रश्‍न शेतकरी संघटनांनी उपस्थित करत त्याची उत्तरे आमदार साहेबांनी द्यावीत असा आग्रह धरला होता.

शेतकऱ्यांशी संवाद साधण्यासाठी तुम्ही आला असाल तर प्रश्‍नाची उत्तरे दिली पाहिजे अशी मागणी शेतकरी संघटनेने केली. परंतु भाषण व प्रश्‍नांची उत्तरे टाळून आमदार व त्यांच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी संवादा शिवाय कार्यक्रमस्थळ सोडून जाणे पसंत केले. 
खासदार, आमदारांची पंचाईत 
विरोधकांची संघर्ष यात्रा, मित्रपक्ष शिवसेनेची शिवसंपर्क मोहिम व "मी कर्जमुक्त होणारच' हे अभियान या पार्श्‍वभूमीवर भाजपने शिवार संवाद यात्रा सुरू केली. त्याद्वारे केंद्र व राज्य सरकारने केलेली विकास कामे व शेतकऱ्यांविषयीचे धोरण सांगण्यासाठी मुख्यमंत्र्यांसह राज्यातील भाजपचे सर्वच खासदार, आमदार खेड्यापाड्यात जात आहेत. चार दिवसांच्या या शिवार संवाद यात्रेचा आज समारोप होत आहे. शिवार संवाद यात्रेच्या काही दिवस आधीच प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी शेतकऱ्यांच्या विरोधात केलेल्या भयंकर विधानाने दुधात मिठाचा खडा 
टाकण्याचे काम केले होते. त्यावर रावसाहेब दानवे यांना मराठवाड्यापासून दूर उत्तर महाराष्ट्राची जबाबदारी देत लांब ठेवण्यात आले होते. तरी देखील तिकडच्या शेतकऱ्यांनी रावसाहेब दानवे यांच्यावर प्रश्‍नांची सरबत्ती करून त्यांना चांगलेच हैराण केले होते. मराठवाड्यात देखील भाजप खासदार व आमदारांची शेतकऱ्यांना तोंड देतांना पंचाईत झाली. 

शिवार संवाद फसला? 
विरोधकांची संघर्ष यात्रा व शिवसेनेची शिवसंपर्क मोहीम जेवढी चर्चेत आली तेवढी भाजपची शिवार संवाद यात्रा चर्चिली गेली नाही. या यात्रांना ग्रामीण भागातून फारसा प्रतिसाद नसल्याची चर्चा आहे. रावसाहेब दानवे यांच्या विधानामुळे शेतकऱ्यांमध्ये एकूणच सरकार विरोधात असलेला रोष, मुख्यमंत्री फडणीस यांच्या हेलिकॉप्टरचा लातुरात झालेला अपघात या घटनांचा देखील शिवार संवाद यात्रेवर परिणाम झाल्याचे दिसून आले. 

संबंधित लेख