sankat mochak laxan jagtap | Sarkarnama

पिंपरी पालिकेचे संकटमोचक आमदार लक्ष्मणभाऊ जगताप 

उत्तम कुटे 
रविवार, 29 जुलै 2018

पिंपरीः भाजप सत्ताधारी पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या अडचणीत पक्षाचे आमदार लक्ष्मणभाऊ जगताप हे वारंवार धावून जात असल्याचे गेल्या काही महिन्यात आढळून आले आहे. त्यामुळे पालिकेचे संकटमोचक अशी त्यांची इमेज तयार झाली आहे. आताही खड्ड्यांवरून पालिका व सत्ताधारी लक्ष होताच पुन्हा भाऊंनी आपली संकटमोचकाची भुमिका पार पाडली. 

पिंपरीः भाजप सत्ताधारी पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या अडचणीत पक्षाचे आमदार लक्ष्मणभाऊ जगताप हे वारंवार धावून जात असल्याचे गेल्या काही महिन्यात आढळून आले आहे. त्यामुळे पालिकेचे संकटमोचक अशी त्यांची इमेज तयार झाली आहे. आताही खड्ड्यांवरून पालिका व सत्ताधारी लक्ष होताच पुन्हा भाऊंनी आपली संकटमोचकाची भुमिका पार पाडली. 

एक खड्डा बुजविण्यासाठी 18 हजार रुपये खर्च येणाऱ्या प्रणालीवर टीका होताच फक्त पावसाळयातच ती वापरा,असा आदेश भाऊंनी पालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांना काल दिला. गेल्यावर्षी भाजप प्रथमच पिंपरी पालिकेत सत्तेत आली. पहिल्या वर्षीच त्यांचा व त्यातही स्थायी समितीचा कारभार वादग्रस्त ठरला. त्याविरोधात विरोधकांच्या जोडीने स्वपक्षातूनही थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तक्रारी गेल्या.त्यातील तीन प्रकरणात चौकशी लागली. तोपर्यंत भाऊंनी थेट व प्रत्यक्ष लक्ष पालिकेच्या कारभारात दिले नव्हते.मात्र, पहिल्याच वर्षी कारभारावर टीका झाल्याने त्यांनी दुसऱ्या वर्षी त्यात लक्ष घालण्यास सुरवात केली. 

वादाची व पालिका तिजोरीवर ताण येणारी कामे टाळण्याच्या सुचना त्यांनी आपल्या पदाधिकाऱ्यांना दिल्या. खर्चात काटकसर करण्यास सांगितले.त्याचा थोडा चांगला परिणाम लगेचच दिसून आला. स्थायीत काहीसे विचारपूर्वक विषय मंजूर होऊ लागले. खर्चिक व वादाचे विषय तहकूब होऊ लागले. परिणामी तुलनेने नव्या स्थायीचे निर्णय वादाचे ठरत नाहीत. मात्र, गत स्थायीने मंजूर केलेले विषय आता टीकेचे लक्ष्य होत आहेत. 

त्यात संकटमोचक म्हणून शहराचे कारभारी असलेल्या भाऊंना वारंवार धावून जावे लागत आहे. वादाच्या भोवऱ्यात सापडलेल्या पंतप्रधान आवास योजनेचे भुमीपूजन त्यातूनच त्यांनी नुकतेच पुढे ढकलले.परिणामी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणारे हे नियोजित भुमीपूजन होऊ शकले नाही. वेस्ट टू एनर्जी या दुसर्या कामाचेही तसेच झाले.समाविष्ट गावातील रस्तेबांधणीच्या निविदेत गोलमाल झाल्याच्या आरोपाचाही त्यांनी असाच प्रतिकार केला होता. 

नुकताच विरोधकांचा असाच आणखी एक हल्ला भाऊंनी परतवून लावला आहे. पावसाळ्यात खड्डे बुजविण्याचे सव्वाआठ कोटी रुपयांचे तीन वर्षांचे काम गत स्थायीने नागपूर येथील मे.अंजनी लॉजिस्टिक या फर्मला दिले आहे. ते जेट पॅचर पोथॉल पॅचिग मशीनने खड्डे बुजविणार आहेत. त्यासाठी त्यांना एक खड्ड्याकरिता पालिका 18 हजार रुपये मोजणार आहे. त्यामुळे पालिका तिजोरीला खड्डा पाडणारी ही नवी यंत्रणाही वादात सापडली. 

विरोधकांकडून ती लक्ष्य करण्यात आली.त्याविरुद्ध मुख्यमंत्र्यांकडे तक्रार करण्यात आली. त्यामुळे पावसाळ्यात खड्डे बुजविणाऱ्या या यंत्रणेचा वापर पाऊस सुरु असतानाच करा, असा आदेश भाऊंनी काल आयुक्तांना दिला. इतर वेळी नेहमीची पद्धत वापरा, असे त्यांनी बजावले आहे.त्यातून लाखो रुपये वाचतील,असा अंदाज आहे.  

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख