Sanjay turde is the lone Manase corporator in BMC | Sarkarnama

संजय तुर्डे : मनसेचे मुंबईतील एकमेव शिलेदार

समीर सुर्वे
रविवार, 15 ऑक्टोबर 2017

मनसे फोडण्याचा प्लॅन हा महिनाभर आधीच सुरू होता. मात्र मी मनसेचा आवाज मुंबई महापालिकेत बुलंद ठेवेल, असा दावा मनसेचे एकमेव नगरसेवक संजय तुर्डे यांनी केला. मी राज यांच्यासोबतच राहणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

मुंबई : मनसेच्या सातपैकी सहा नगरसेवकांनी पक्षाची साथ सोडल्यामुळे कुर्ला येथील संजय तुर्डे हे एकमेव मनसेचे नगरसेवक राहीले आहेत. महापालिकेत पक्षाचा किल्ला एकटाच लढवू, अशी ग्वाही त्यांनी दिली आहे.

तुर्डे एकटेच निष्टावंत ठरल्यामुळे मुंबईच्या राजकरणातही ते चर्चेचा विषय झाले आहे. यापूर्वीही त्यांनी पक्षासाठी जीवघेणा हल्ला सहन केला आहे. मनसेशी ते का एकनिष्ठ राहिले, याचेही स्पष्टीकरण त्यांनी या निमित्त दिले.

सहा नगरसेवक का फुटून गेले, याबाबत त्यांना विचारले असता `सरकारनामा`सोबत बोलतान त्यांनी या संपूर्ण घडामोडीची माहिती दिली. तुर्डे यांच्या म्हणण्यानुसार महिनाभरापूर्वीच उर्वरित नगरसेवकांचा हा कट शिजला असावा. पक्षाच्या दादर येथील कार्यालयात बंडखोर गटनेते दिलीप लांडे यांनी बैठक घेतली होती. त्यात पक्षाच्या नेत्यावर कोण कोण नाराज आहात का, असे त्यांनी विचारले होते. नाराज असाल तर आपण, राज साहेबांना भेटू असेही त्यांनी सांगितले होते. पक्ष आणि अध्यक्षांबाबत मी कधीच नाराज नव्हतो. त्यामुळे तेव्हा त्यांना स्पष्टपणे मी तसे  सांगितले.

त्यानंतर पुन्हा एक दोन वेळा फोनवरुन नाराजी बद्दल विचारले. पण,मी नाराज नव्हतोच.त्यातून काहीतरी शिजतयं असं वाटतं होतं. त्यानंतर शुक्रवारी अचानक हा प्रकार कळला. सातपैकी सहा नगरसेवक शिवसेनेत गेले.

``मी पक्ष आणि राज ठाकरेंशी बांधील आहे. त्यांच्यामुळेच मी नगरसेवक झालो आहे. त्यांना सोडून जाण्याचा प्रश्नच नाही. मी प्रभागात तर काम करेलच. त्याच बरोबर पालिकेतही एकटाच मनसेचा किल्ला लढवेल,`` असा दावा त्यांनी केला.

मुंबई महापालिकेतील नगरसेवक पदाचा निकाल जाहीर झाल्यावर तुर्डे यांच्यावर जीवघेणा हल्ला झाला होता. त्यावेळी राज ठाकरे स्वत: त्यांना भेटायला रुग्णालयात गेले होते. अशा प्रकार जिवघेणा हल्ला झेलणारे तुर्डे हे मुंबईतील एकमेव नगरसेवक आहेत.

संबंधित लेख