माढ्यात 'पवार विरुद्ध फडणवीस' लढत कशी होऊ शकते? 

माझ्या उमेदवारीसाठी मागे लागणाऱ्यांची लढत पवारसाहेबांविरुद्ध होऊच शकत नाही.- संजय शिंदे
माढ्यात 'पवार विरुद्ध फडणवीस' लढत कशी होऊ शकते? 

सोलापूर : भाजपच्या मागील पाच वर्षांच्या कामावर जनतेत प्रचंड राग आहे. माढा लोकसभा मतदारसंघावर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचा असलेला पगडा तसेच राष्ट्रवादीसह मित्र पक्षांची या मतदारसंघात असलेली संघटनात्मक बांधणी यामुळे मला या निवडणुकीत यश निश्‍चित मिळणार असल्याचे माढा लोकसभेचे राष्ट्रवादी कॉंग्रेस व मित्र पक्षाचे उमेदवार संजय शिंदे यांनी सांगितले.

कृष्णा-भीमा स्थिरीकरणाबाबत श्री. शिंदे म्हणाले, "स्थिरीकरणाच्या मुद्द्याचे केवळ राजकरण केले जात असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सोलापूर जिल्ह्यात मागे झालेल्या एका कार्यक्रमात स्थिरीकरण होणार नाही असे सांगितले होते. आता ते ही योजना करू म्हणतायत हे केवळ राजकारण आहे. स्थिरीकरणाला माझा कधीच विरोध नाही. त्यामागील राजकारणाला विरोध आहे. रणजितसिंह मोहिते-पाटलांबाबत राष्ट्रवादीचे मूल्यमापन चुकत होते. भाजपने योग्य मूल्यमापन करून रणजितसिंह मोहिते-पाटील यांना तिकीट न देता रणजिसिंह निंबाळकरांना दिले. मोहिते-पाटलांनी केलेल्या चुकांमुळे सामान्य जनतेला त्रास होत होता. या चुकांविरुद्ध कोणीतरी भूमिका घेतली पाहिजे ही लोकांची भावना होती. त्या हेतूने समविचारी एकत्र आलो होतो.

जिल्हा मध्यवर्ती बॅंकेत दोषींवर कारवाई केली जाईल काय असे विचारले असता ते म्हणाले, जिल्हा मध्यवर्ती बॅंकेत चुका करणारी मंडळीच भाजपने गोळा केली आहेत. त्यामुळे भाजपला जिल्हा बॅंकेचा कारभार पारदर्शी करायचा की नाही याबाबत साशंकता आहे. कॉंग्रेसमुक्त देश असा भाजपचा अजेंडा होता. मात्र आता कॉंग्रेसचे अनेकजण भाजपने आयात केल्याने आता कॉंग्रेसयुक्त भाजप झाली असून यात निष्ठावंतांवर अन्याय झाल्याची भावना भाजपच्या मूळ कार्यकर्त्यांत आहे. याचा मला नक्कीच फायदा होणार आहे. भाजपत गेलेल्या काही नेत्यांमागे विविध आर्थिक कारवाईंचा ससेमिरा लागल्याचे जनतेला माहिती असल्याने अशा लोकांच्या विरोधात जनतेने ही निवडणुक हाती घेतली आहे. सत्ता व पैशाचा दबाव सहन न झाल्याने समविचारीतील काहीजण भाजपसोबत गेले. 

शरद पवार हे देशपातळीवरील सर्वच पक्षातील ज्येष्ठ नेतृत्व आहे. भाजपलाही शरद पवारांची भीती वाटणे स्वाभाविक आहे. पक्षाकडे कमी खासदार असणारेही नेते पंतप्रधान झाले आहेत. पवारसाहेबांचा राजकीय अनुभव व कारकीर्द पाहता पवारसाहेब देशातील राजकारणात काहीही घडवू शकतात. पंतप्रधान मोदींनी केवळ शरद पवारांना टार्गेट केले. या भागातील मुद्दयाला पंतप्रधानांनी हात न घातल्याने लोकांचा भ्रमनिरास झाला. 

पुढील काळात कोणती विकासकामे करणार याबाबत विचारले असता श्री. शिंदे म्हणाले, माळशिरस तालुक्‍यातील पाण्यापासून वंचित असलेल्या गावांना पाणी मिळवून देऊन न्याय देणार, कुर्डुवाडी येथील रेल्वे कारखाना व पंढरपूर-लोणंद रेल्वे मार्ग याबाबत लक्ष घालणार आहे. मतदारसंघातील विविध तालुक्‍यातील शेतीच्या पाण्याचे प्रश्‍न मार्गी लावण्याचा प्रयत्न करणार, उजऩी धरणावरील ताण कमी करण्यासाठी विविध नद्यांवर बंधारे बांधण्याचा प्रयत्न करणार, माण खटाव तालुक्‍यातील सिंचनाच्या योजना व उद्योग व्यवसाय व शैक्षणिक क्षेत्रात काम करणार. 

जिल्ह्यात नऊ बंधारे बांधून वाहून जाणारे 36 टीएमसी पाणी अडवण्यासाठी 400 कोटी रुपये लागतील. आम्ही मुख्यमंत्र्यांकडे याची मागणी केली होती. मुख्यमंत्र्यांनी ही व्यवहार्य मान्य केली नाही तर, ते हजारो कोटींच्या कृष्णा-भीमा स्थिरीकरणाला निधी काय देणार? माढा मतदारसंघात पवार विरुद्ध फडणवीस अशी लढत आहे का, याबाबत विचारले असता ते म्हणाले, माढा मतदारसंघातील निवडणूक ही पवार विरुद्ध फडणवीस कशी होऊ शकते. कारण, भाजपच त्यांच्या तिकिटावर निवडणूक लढविण्यासाठी चार वेळा माझ्या मागे लागले होते. माझ्या उमेदवारीसाठी मागे लागणाऱ्यांची लढत पवारसाहेबांविरुद्ध होऊच शकत नाही. 
 

 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com