Sanjay Raut Criticises BJP in Pune | Sarkarnama

दावूद, हाफीज सईदही उद्या भाजपात येतील : संजय राऊत

अश्विनी जाधव
मंगळवार, 3 ऑक्टोबर 2017

भारतीय जनता पक्षात ज्या पद्धतीने 'इनकमिंग' सुरु आहे, ते पाहता उद्या या पक्षात दावूद इब्राहिम, हाफिज सईद सुद्धा येऊ शकतील, अशी बोचरी टीका शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी पुण्यात बोलताना केली.

पुणे : भारतीय जनता पक्षात ज्या पद्धतीने 'इनकमिंग' सुरु आहे, ते पाहता उद्या या पक्षात दावूद इब्राहिम, हाफिज सईद सुद्धा येऊ शकतील, अशी बोचरी टीका शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी पुण्यात बोलताना केली.

राऊत आज पुणे जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. त्यानंतर त्यांनी शहरात पत्रकार परिषद घेतली. त्यात बोलताना त्यांनी आपला 'मित्रपक्ष' असलेल्या भारतीय जनता पक्षावर टीका केली. गेल्या निवडणुकांपासून आजपर्यंत अन्य राजकीय पक्षांमधील अनेक नेते भाजपमध्ये गेले आहेत. काँग्रेसमध्ये आधी असलेले नारायण राणेही भाजपमध्ये जाऊ इच्छित होते. त्या पार्श्वभूमीवर राऊत यांनी या इनकमिंगचा समाचार घेतला. ते म्हणाले, ''उद्या भाजपमध्ये कुणीही येईल. दावूद येईल, हाफिज सईद येईल, अण्णा येतील. कदाचित 'ते' डोनाल्ड ट्रम्प यांच्याही संपर्कात असतील,''

राजकीय वातावरणाबाबत आणि शिवसेना भाजप संबंधांबाबत बोलताना राऊत म्हणाले, ''राज्यातले आणि देशातले वातावरण हे निवडणुका लवकर येतील असेच आहे. देशात आणि राज्यात भाजप सत्ताधारी आहे. आता निवडणुकांच्या वातावरणाची जाणीव झाल्याने भाजपचे थापा मारण्याचे प्रमाण वाढले आहे. विधानसभा आणि लोकसभा निवडणुका दोन्ही सोबत झाल्या तरी आम्ही त्याला तयार आहोत. आज देशात भाजपविरोधात असंतोष नक्कीच आहे. अण्णा हजारे त्याच्याविरोधातच पुन्हा उभे राहिले आहेत.''

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसवरही राऊत यांनी टीका केली. ते म्हणाले, ''शरद पवाराना होकायंत्र म्हटले जाते. पण आता ते धोकायंत्र कुणासाठी ठरेल हे लवकरच कळेल. मात्र, विरोधी पक्ष म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसने चोख भूमिका बजावली नाही हे सत्य आहे,''

राऊत पुढे म्हणाले, '' मंत्रीमंडळ विस्ताराचे आता पर्यंत 19 मुहूर्त आले. मात्र विस्तार झाला नाही. आता तो कधी होईल ते मुख्यमंत्र्यांनाच माहित,'' शिवसेना सरकारमधून बाहेर का पडत नाही, या प्रश्नावर 'राज्यात राजकीय अस्थिरता नको म्हणुन आम्ही सत्तेत आहोत,' असा दावा राऊत यांनी केला. सध्या चित्रपटाचा मध्यंतर सुरु आहे, अशी टिपण्णीही राऊत यांनी केली.

मुंबईत एल्फिस्टनरोड स्थानकावर झालेल्या अपघाताच्या पार्श्वभूमीवर 'बुलेट ट्रेनची वीटही रचू देणार नाही,' असा इशारा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिला होता. या विधानाचीही राऊत यांनी खिल्ली उडवली. ते म्हणाले, ''
बुलेट ट्रेन वर पहिला दगड शिवसेनेनं मारला. आता अनेकांची मनगट शिवशिवत आहेत. बुलेट ट्रेनला पहिल्या दिवशीच शिवसेनेनं विरोध केला होता...आणि बुलेट ट्रेनला रोखण्यासाठी विटा लावणं रोखून भागत नाही तर रेल्वे रूळ उखडावे लागतात आणि ती धमक शिवसेनेत आहे,''

पुण्याच्या पदाधिकाऱ्यांचे खूप लाड झाले
पुण्याच्या शिवसेनेबाबत विचारले असता राऊत म्हणाले, ''पुण्यातील वातावरण आगामी निवडणुकीसाठी आशादायक वाटते. पण पुण्यातल्या  पदाधिकाऱ्यांचे अति लाड झाले आहेत. त्यांना शिस्त लावण्याचा प्रयत्न सुरु आहे. लवकरच शिवसेनेचा नवा चेहरा पुण्यात दिसेल.''

 

 

 

 

 

संबंधित लेख