Sanjay Raut criticises BJP | Sarkarnama

भाजपचे सरकार ओळखीच्या चोरासारखे : संजय राऊत 

सरकारनामा ब्युरो
सोमवार, 12 जून 2017

साहेब आपण असे बोलले होते, त्याचे काय?' असे विचारतो, तर त्यांना राग येतो. चोरांकडून हिशेब मागितला, तर त्याच्या जिव्हारी लागते. तसेच चित्र महाराष्ट्रात आहे. 
- खासदार संजय राऊत 

नंदुरबार : "पूर्वी आम्ही आघाडी सरकारच्या कॉंग्रेस, राष्ट्रवादीच्या लोकांना चोर म्हणायचो. पण, ज्यांना तीन वर्षांपूर्वी वाजत-गाजत सत्तेवर बसवले, तेच "भाजप'वाले आता ओळखीच्या चोरासारखे वागत आहेत. तेच जनतेचा अपेक्षाभंग करून लुटायला निघाले आहेत,'' अशी खरमरीत टीका शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी येथे आपल्याच मित्रपक्षावर केली. 

शिवसेनेतर्फे कर्जमुक्ती अभियानांतर्गत रविवारी शेतकरी मेळावा झाला, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे, शिवसेनेचे संपर्क प्रमुख बबनराव थोरात, सहसंपर्क प्रमुख दीपक गवते, माजी जिल्हाप्रमुख अरुण चौधरी, जिल्हाप्रमुख डॉ. विक्रांत मोरे, आमशा पाडवी, महिला आघाडी प्रमुख रीना पाडवी आदी उपस्थित होते. 

श्री. राऊत म्हणाले, की एवढी वर्षे आम्ही कॉंग्रेसवाल्यांच्या नावाने ओरडत होतो, त्यांच्यावर ठपका ठेवत होतो. "गोरे गेले अन्‌ काळे आले', अशा शब्दांत त्यांना हिणवत होतो. मात्र त्यांच्याहीपेक्षा वाईट चित्र या तीन वर्षांत पाहावयास मिळत आहे. आम्ही सत्तेत नुसतेच सोबत आहोत, मात्र सत्ता भाजपकडे आहे. निर्णय त्यांच्याकडे आहे. त्यांनी निवडणुकीच्या काळात जनतेला ओरडून-ओरडून जी आश्‍वासने दिली, ती पूर्ण करण्याची आम्ही त्यांना आठवण करून देतो. त्यांना त्यांच्याच व्हीडीओ क्‍लीप दाखवतो. "साहेब आपण असे बोलले होते, त्याचे काय?' असे विचारतो, तर त्यांना राग येतो. चोरांकडून हिशेब मागितला, तर त्याच्या जिव्हारी लागते. तसेच चित्र महाराष्ट्रात आहे. 

वाल्यांची टोळी 
खासदार राऊत म्हणाले, की एकीकडे पारदर्शकतेची भाषा करायची आणि दुसरीकडे त्यांच्याकडे आलेले अनेक जण हे काय आहेत? ती वाल्यांची टोळी आहे. वाल्यांना वाल्मीकी बनविण्याची मशिन भाजपकडे आहे. त्याने कितीही गुन्हे केले असतील, मात्र वॉशिंग मशिनसारखे यंत्र त्यांच्याकडे आहे. त्यात टाकले की कपडे स्वच्छ होतात, तसे स्वच्छ प्रतिमेचे वाल्मीकी तयार होतात. अशा या वाल्यांचे राज्य महाराष्ट्रात आले आहे. त्यांना जनतेने निवडून दिले, याचेही भान ते ठेवत नाहीत. एकही राज्यकर्ता सामाजिक भावनेने किंवा संवेदनेने वागत नाहीत. हे दृष्टचक्र थांबवले पाहिजे. यावेळी राज्यमंत्री दादा भुसे, बबनराव थोरात, दीपक गवते, डॉ. विक्रांत मोरे, अरुण चौधरी, आमशा पाडवी यांनीही मनोगत व्यक्त केले.

संबंधित लेख