मागच्या दारातून आलेल्यांना शिवसेनेत मानाचे स्थान 

मागच्या दारातून आलेल्यांना शिवसेनेत मानाचे स्थान 

मुंबई ः थेट लोकांमधून आलेल्यांना "दरवाज्याबाहेर स्थान तर मागील दारातून आलेल्यांना मानाचे पान' ही पंरपंरा शिवसेनेने कायम राखल्याचे संसदीय पक्षाच्या नेतेपदी राज्यसभा खासदार संजय राऊत यांची निवडीने पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. 

राज्य मंत्रिमंडळात सहभागी होण्याचे निश्‍चित झाल्यानंतर विधान परिषदेचे सदस्य आमदार सुभाष देसाई यांना उद्योग, दिवाकर रावते यांना परिवहन, रामदास कदम यांना पर्यावरण तर डॉ. दिपक सावंत यांना आरोग्य ही कॅबिनेट खाती शिवसेनेने बहाल केली. याउलट भाजपशी काडीमोड घेतल्यानंतर लोकांमधून निवडून आलेल्या 63 आमदारापैकी एकनाथ शिंदे यांना कॅबिनेट खाते देण्यात आले. तर आमदार रविंद्र वायकर, विजय शिवतारे, दादा भुसे, संजय राठोड, दिपक केसरकर यांना राज्यमंत्री करण्यात आले आहे. यामुळे मागील दारातून आलेले आणि थेट लोकांतून आलेले असा वाद शिवसेनेत रंगला होता. 

त्यावेळी शिवसेनेच्या काही आमदारांनी नाराजी व्यक्‍त केली होती. तरीही शिवसेनेच्या नेतृत्वाने खांदेपालट केले नाही अथवा याकडे कानाडोळा करत यावर पडदा टाकल्याचे सांगितले जाते. मात्र आज राऊत यांची संसदीय पक्षाच्या नेतेपदी निवडीची घोषणा झाल्यानंतर पुन्हा एकदा पक्षात मागील दारातून आणि थेट जनतेतून आलेले लोकप्रतिनिधी याबाबत चर्चा सुरू झाली आहे. 

शिवसेनेचे दिल्लीत लोकसभेचे 16 खासदार आहेत. यामध्ये ज्येष्ठ खासदार अनंत गिते हे सहावेळा निवडूण आलेले असून केंद्रीय अवजड खात्याचे मंत्री आहेत. तर उर्वरितामध्ये चंद्रकांत खैरे, भावना गवळी, आनंद अडसूळ, शिवाजीराव आढळराव-पाटील आदी दोन-तीन टर्म झालेले खासदार असताना त्यांना डावलून राऊत यांची निवड केल्याने या खासदारांमध्ये नाराजी पसरली असल्याचे बोलले जाते. सध्या लोकसभेतील गटनेते आनंद अडसूळ आहेत.  
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com