sanjay raut alligation on girish mahajan | Sarkarnama

गिरीश महाजन हे इव्हीएम हॅकर : संजय राऊत  

निखिल सूर्यवंशी  
शुक्रवार, 28 सप्टेंबर 2018

मोदी आणि फडणवीस या जोडगोळीने देशासह राज्य खड्ड्यात घातले. ते पंचवीस वर्षे मागे नेऊ ठेवले, असा टीकेचा प्रहार करताना वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन हे इव्हीएम मशिन हॅकर असल्याचा गंभीर आरोप शिवसेना नेते व उत्तर महाराष्ट्राचे संपर्कप्रमुख खासदार संजय राऊत यांनी आज (शुक्रवार) केला

धुळे : मोदी आणि फडणवीस या जोडगोळीने देशासह राज्य खड्ड्यात घातले. ते पंचवीस वर्षे मागे नेऊ ठेवले, असा टीकेचा प्रहार करताना वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन हे इव्हीएम मशिन हॅकर असल्याचा गंभीर आरोप शिवसेना नेते व उत्तर महाराष्ट्राचे संपर्कप्रमुख खासदार संजय राऊत यांनी आज (शुक्रवार) केला.

त्यावर खासदार राऊत यांचे विधान बालीशपणाचे असून त्यांनी, शिवसेनेने "बॅलेट'ची मागणी करून निवडून येऊन दाखवावे, असे प्रतिआव्हान मंत्री महाजन यांनी "सरकारनामा'च्या माध्यमातून दिले. 
 
आगामी महापालिकेसह विविध निवडणुकांच्या पार्श्‍वभूमीवर शिवसेनेच्या महानगर शाखेचा मेळावा, दिलखुलास गप्पा, प्रतिष्ठितांशी संवाद आदी उपक्रमात खासदार राऊत हे सहभागी झाले. 
 
खासदार राऊत म्हणाले, की इव्हीएम मशिन हॅक करून जळगाव, सांगली पालिका निवडणुकीत विजय मिळविणाऱ्या मंत्री महाजन यांना धुळे महापालिकेच्या डिसेंबरमध्ये होणाऱ्या निवडणुकीत असे काही करता येणार नाही. इव्हीएम मशीनबाबत जनताच बोलायला लागली आहे. भाजपने पालघरची निवडणूक इव्हीएममध्ये फेरफार करून जिंकली. शेवटच्या क्षणाला दोन तास शंभर ते दीडशे इव्हीएम मशिन बंद पडले आणि पाचनंतर मतदान सुरू होते. त्याच भागात भाजपला मतदान जास्त पडले. त्याच मतांवर भाजपचे उमेदवार जिंकून येतात, हे स्पष्ट झाले. इव्हीएम मशिनमध्ये घोटाळा करून भाजपने निवडणुका जिंकल्याचा आरोप आहे. 
 
भाजपमध्ये अनेक लुटारू झाले आहेत, असे सांगत खासदार राऊत यांनी धुळे जिल्ह्यात या पक्षाचे लोकप्रतिनिधी "खा- खा खात' आहेत, अशी टीका केली. निवडणुकीत पॅकेज द्यायचे, त्या बळावर इच्छुकांची संख्या वाढवायची, पैशाचा पाऊस पाडायचा आणि निवडणूक जिंकायची, असा भाजपचा फंडा झाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देश, राज्य चालवीत नसून आपला भाजप पक्ष वाढवत आहेत. ते जनकल्याणासाठी नव्हे तर भाजप पक्षासाठी काम करीत आहेत. सैनिकांच्या रक्ताचा, राष्ट्रभक्तीचा व्यापार करून लढाऊ तीनशे राफेल विमान खरेदीत दोन ते लाख कोटी रुपयांचा घोटाळा करून त्यातील पैसा ठिकठिकाणच्या निवडणुका जिंकण्यासाठी भाजपकडून होत असेल तर तो देशद्रोहच आहे. त्यामुळे भाजपच्या नेत्यांना धडा शिकवावाच लागेल. शेतकरी, कुपोषित बालके, आजारी उद्योग, बेरोजगारीचे प्रश्‍न सोडविण्यासाठी भाजप सरकारकडे पैसा नाही. परंतु, निवडणुकीत पाऊस पाडण्यासाठी त्यांच्याकडे पैसा येतो कोठून हाच प्रश्‍न धुळेकरांनी संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांना विचारावा, असेही खासदार राऊत म्हणाले.  

संबंधित लेख