sanjay nirupam one man show in congress | Sarkarnama

राहुल गांधीच्या दौऱ्यात सबकुछ संजय निरुपम!

मृणालिनी नानिवडेकर
बुधवार, 13 जून 2018

संजय निरुपम हे शिवसेनेतून कॉंग्रेसमध्ये आलेले धडाकेबाज नेते आहेत. पक्षासाठी उत्तम वातावरण नसतानाही त्यांनी मेळावा यशस्वी करून दाखविला, असे त्यांच्या समर्थकांकडून सांगितले जाते आहे. मात्र या संपूर्ण मेळाव्यात निरुपम वगळता अन्य कोणालाही संधी दिली गेली नाही, असे त्यांचा विरोधी गट सांगतो आहे.

मुंबई : कॉंग्रेस पक्षाध्यक्ष राहुल गांधी यांच्या भेटीत मुंबई कॉंग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांनी स्वतःचे शक्तीप्रदर्शन केले आहे. संपूर्ण मुंबईवर भावी पंतप्रधान राहूल गांधी यांना सुभेच्छा असे फलक लावण्यापासून तर स्वतःच्या मर्जीतील नेत्यांना बुथ कार्यकर्ता संमेलनात बोलण्याची संधी येथपर्यंत "सबकुछ निरुपम' असे या भेटीचे सूत्र राहिले. बूथ मेळावा हा यशस्वी झाला तरी निरुपम यांनी आम्हाला संधी दिली नाही, अशी भावना आता कॉंग्रेस कार्यकर्ते व्यक्त करीत आहेत.
 
निवडणुकीचे दिवस जवळ आल्याने सर्वांनी मिळून कॉंग्रेसला सावरण्याचे दिवस आले असतानाही निरुपम केवळ स्वतःचीच बाजू मांडत असल्याचा आरोपही एका कॉंग्रेस पदाधिकाऱ्यांनी केला. महाराष्ट्राचे प्रभारी मोहन प्रकाश यांनाही डावलण्यापर्यंत निरुपम यांची मजल गेली असल्याची तक्रार श्रेष्ठींकडे करण्यात आली आहे.

मुंबई कॉंग्रेसमध्ये शक्तीशाली नेते मानले जाणारे माजी खासदार गुरुदास कामत या मेळाव्याकडे फिरकलेही नाही. त्यांना मेळाव्यात बोलावण्याचा कोणताही प्रामाणिक प्रयत्न केला गेला नाही, असे कॉंग्रेस नेते आता सांगत आहेत. राहूल गांधी यांचे अत्यंत विश्‍वासू सहकारी माजी केंद्रिय मंत्री मिलिंद देवरा यांना जेमतेम स्थान देण्यात आले. मंचावर बसवले, पण बोलण्याची संधी मात्र दिली नाही, याकडेही या गटाने लक्ष वेधले आहे. पश्‍चिम उपनगरातील लोकप्रिय नेत्या माजी खासदार प्रिया दत्त याचीही भूमिका या दौऱ्यात नगण्य राहिली, त्या बाहेरगावी होत्या काय? हे मात्र समजू शकले नाही.
 
मुस्लीम मते मिळविण्यासाठी कॉंग्रेस प्रयत्न करते आहे हे समजण्यासारखे आहे, मात्र बूथ कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात ज्येष्ठ नेते माजी मंत्री नसिम खान यांना संधी नाकारून निरुपम यांनी आपल्या सोईच्या आमदार असलम खान यांना बोलण्याचे निमंत्रण दिले, असाही आक्षेप घेतला जात आहे. गांधी परिवाराशी असलेले जवळचे संबंध लक्षात घेता गायकवाड यांना दलित मतांची मदार राखण्यासाठी बोलू दिले, एवढाच काय तो निरुपम यांचा सर्वसमावेशक प्रयत्न होता, अशी तिरकस प्रतिक्रियाही एका नेत्याने नाव न सांगण्याच्या अटीवर दिली.

दरम्यान संजय निरुपम यांच्या कार्यकर्त्यांनी मात्र पक्षाच्या प्रतिकूल दिवसात संघटना जागी ठेवण्यासाठी कोणीही कार्यकर्ते पुढे आले नाहीत. निरुपम यांनी भारतीय जनता पक्षाकडून निमंत्रण आले असतानाही तिथे न जाता कॉंग्रेसमध्ये राहून सच्चा शिपायाप्रमाणे काम सुरू ठेवणे कायम केले असले तरी त्यांचे हितशत्रू अपप्रचार करीत आहेत. राहूल गांधी यांना या मेळाव्यानिमित्त झालेले जनजागरण महत्त्वाचे वाटले हे विरोधक लक्षात घेत नाहीत, असे एका निरुपम समर्थकाने सांगितले.
 

संबंधित लेख