राहुल गांधी यांच्या भेटीसाठी निरुपम दिल्लीत दाखल 

राहुल गांधी यांच्या भेटीसाठी निरुपम दिल्लीत दाखल 

मुंबई ः पक्षांतर्गत वादामुळे चर्चेत आलेले मुंबई कॉंग्रेसचे प्रदेश अध्यक्ष संजय निरुपम हे हायकमांडच्या भेटीसाठी दिल्लीत दाखल झाले आहेत. उपाध्यक्ष राहुल गांधी यांना उद्या (1 मार्च) भेटून मुंबईतील पराभवाचा अहवाल सादर केला जाणार आहे. या भेटीत पराभवाबाबत चर्चा होणार असली तरीही मुख्य म्हणजे मुंबईत कॉंग्रेस, महापौरपदासाठी शिवसेना किंवा भाजपला मदत करणार? की थेट आपला उमेदवार रिंगणात उतरविणार? याविषयीचा निर्णयही घेतला जाण्याची शक्‍यता आहे. 

मुंबईत तिसऱ्या क्रमांकाचा पक्ष ठरलेल्या कॉंग्रेसला निकालानंतर भलतेच महत्त्व प्राप्त झाले आहे. शिवसेना आणि भाजपमध्ये केवळ 5 जागांचा फरक असल्याने कॉंग्रेसचे 31 नगरसेवक ज्या पक्षाला प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे मदत करतील, त्या पक्षाचा महापौर मुंबईत बसणार आहे. त्यामुळे महापौरपदासाठी कॉंग्रेसचा पाठिंबा कोणत्या पक्षाला मिळणार ? कॉंग्रेसकडून महापौर पदासाठी स्वतःचा उमेदवार रिंगणात उतरविला जाणार का ?, की अनुपस्थित राहून कॉंग्रेस शिवसेनेला अप्रत्यक्ष मदत करणार ? या प्रश्‍नांवरही राहुल गांधी आणि निरुपम यांच्यात चर्चा होणार आहे. त्यामुळे उद्याच्या भेटीत मुंबई कॉंग्रेसची आगामी राजकीय वाटचाल ठरविली जाणार आहे. 

मुंबई महानगरपालिकेच्या यंदाच्या निवडणुकीबाबत सर्व निर्णय घेण्याचे अधिकार मुंबई प्रदेश अध्यक्ष संजय निरुपम यांना देण्यात आले होते. मात्र, त्यांनी आपल्या अधिकाराचा गैरवापर करत केलेल्या मनमानीमुळे नगरसेवकांचा आकडा 52 वरुन 31 वर गेल्याचा आरोप मुंबईतील अनेक कॉंग्रेस नेत्यांनी केला. त्यामुळे निकालानंतर नैतिक जबाबदारी स्वीकारून निरुपम यांनी "हायकमांड'कडे राजीनामा पाठविला. या राजीनाम्यावरही उद्याच्या भेटीदरम्यान चर्चा होणार आहे. ऐन निवडणुकीच्या तोंडावर अंतर्गत राजकारणामुळे मुंबई कॉंग्रेसमध्ये माजलेल्या यादवीला आवर घालण्यात निरुपम यांना अपयश आले आहे. त्यावरून उद्याच्या भेटीत यावरुन निरुपम यांची कानउघाडणी केली जाऊ शकते, अशीही चर्चा कॉंग्रेसच्या गोटात आहे. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com