sanjay kenekar | Sarkarnama


ब्रेकिंग न्यूज

विनोद तावडे कृष्णकुंजवर . राज ठाकरे आणि विनोद तावडे यांच्यात चर्चा .

खैरे जनतेची दिशाभूल करत आहेत - संजय केणेकर 

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 18 ऑगस्ट 2017

खैरे यांची राजकारणात जितकी वर्ष झाली आहेत, तेवढीच वर्ष मला भाजपमध्ये झाली आहेत. त्यामुळे माझ्या पक्षनिष्ठेवर त्यांनी बोलू नये. युतीचा पाईक या नात्याने मी माझ्या वार्डातून शिवसेनेच्या उमेदवाराला निवडून आणण्याचे काम केले होते. खैरे यांच्या विजयात देखील भाजपच्या कार्यकर्त्यांचा सिंहाचा वाटा होता, त्यामुळे या सर्वांना शिवसैनिक समजू नये असे स्पष्ट केले. 

औरंगाबाद : माझा राजकीय जन्म राष्ट्रीय स्वयंसेवक संघातून झाला आहे. गेली 27-28 वर्ष मी भाजपमध्ये काम करतोय, पण मला शिवसैनिक ठरवून खासदार चंद्रकांत खैरे जनतेची दिशाभूल करीत आहेत. मी शिवसैनिक होते हे त्यांनी सिध्द करावे किंवा राजकारण सोडावे असे जाहीर आव्हान भारतीय जनता पार्टीच्या कामगार मोर्चाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष संजय केणेकर यांनी शिवसेनेचे खासदार चंद्रकांत खैरे यांना दिले आहे. 

स्वातंत्र्य दिनानिमित्त जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे पर्यावरणमंत्री रामदास कदम ध्वजारोहणासाठी औरंगाबादेत आले होते. ध्वजारोहणाच्या कार्यक्रमानंतर दुपारी त्यांच्या हस्ते शहरातील विविध वार्डांमध्ये विकासकामांचे उद्‌घाटन करण्यात झाले. दरम्यान, पुंडलीकनगर भागातील केणेकर यांच्या निवासस्थानी रामदास कदम, चंद्रकांत खैरे, आमदार अतुल सावे, अंबादास दानवे गेले होते. अल्पोपहार घेत असतांना उभयंतामध्ये लोकसभा, विधानसभा उमेदवारीवर चर्चा देखील रंगली. तत्पुर्वी बालाजीनगर येथील व्हाईट टॅपिंग रस्त्याच्या उद्‌घाटन समारंभा प्रसंगी बोलतांना चंद्रकांत खैरे यांनी महापौर घडामोडे, गजानन बारवाल, संजय केणेकर हे पुर्वी शिवसैनिकच होते असा उल्लेख केला होता. हाच धागा पकडत रामदास कदम यांनी केणेकर यांना शिवसेनेत येण्याची ऑफर देऊन टाकली. हा सगळा प्रकार उपस्थितांनी सहज घेतला, पण या चर्चेचे वृत्त 17 ऑगस्टच्या काही स्थानिक वृत्तपत्रांमध्ये प्रसिध्द झाले आणि संजय केणेकर यांना आपला गेम झाल्याची जाणीव झाली. 

खैरेंना माझी भिती वाटते 
चंद्रकात खैरे यांनी आपल्याला शिवसैनिक ठरवल्यामुळे याचा राजकीय फटका बसू शकतो हे केणेकर यांनी ओळखले. शिवाय भाजपमध्ये आपल्याबद्दल संशयाचे वातावरण निर्माण होऊ शकते हा धोका लक्षात घेऊन त्यांनी तातडीने प्रसिध्दी पत्रक काढून खुलासा केला. आपण सुरुवातीपासूनच कसे भाजपचे होतो हे पटवून देण्याचा त्यांनी या पत्रकाद्वारे प्रयत्न केला. बापू घडामोडे, गजानन बारवाल हे पुर्वाश्रमीचे शिवसैनिक होते, पण चंद्रकांत खैरे यांनी मी शिवसैनिक असल्याचा केलेला दावा खोटा आणि माझी राजकीय प्रतिमा मलीन करणारा असल्याचे संजय केणेकर म्हणाले. मी सुरुवातीपासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, भारतीय विद्यार्थी परिषद आणि त्यानंतर युवा मोर्चाशी जोडले गेलो होतो. त्यामुळे खैरे यांनी मी शिवसैनिक व जुना शाखाप्रमुख असल्याचा केलेला दावा खोटा आहे. खैरे यांची राजकारणात जितकी वर्ष झाली आहेत, तेवढीच वर्ष मला भाजपमध्ये झाली आहेत. त्यामुळे माझ्या पक्षनिष्ठेवर त्यांनी बोलू नये. युतीचा पाईक या नात्याने मी माझ्या वार्डातून शिवसेनेच्या उमेदवाराला निवडून आणण्याचे काम केले होते. खैरे यांच्या विजयात देखील भाजपच्या कार्यकर्त्यांचा सिंहाचा वाटा होता, त्यामुळे या सर्वांना शिवसैनिक समजू नये असे स्पष्ट केले. 

केणकरांची डोकेदुखी वाढली 
राजकारणात उतावीळपणा नेहमीच अडचणीचा ठरतो. असाच काहीसा प्रकार संजय केणेकर यांच्या बाबतीत महिनाभरापुर्वी घडला होता. आपल्या वाढदिवसाच्या निमित्ताने संजय केणेकर यांनी आपल्या निवासस्थानी पुर्वचे भावी आमदार अशी अक्षरे लिहलेला केक कापला होता. तो देखील पुर्वचे विद्यमान भाजप आमदार अतुल सावे यांच्या समक्ष. या संदर्भात सावे यांनी पक्षश्रेष्ठीकंडे केणेकर यांची तक्रार केल्याची देखील चर्चा होती. भावी आमदार केक प्रकरण शांत होत नाही, तोच खैरे यांच्या या नव्या दाव्याने केणेकरांची डोकेदुखी वाढली आहे. 

संबंधित लेख