Sanjay joshi again active in politics | Sarkarnama

संजय जोशी पुन्हा सक्रिय ? 

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 7 एप्रिल 2017

नागपूर : भाजपचे माजी सरचिटणीस व आता पक्षात कोणतीही जबाबदारी नसलेले संजय जोशी पुन्हा सक्रिय झाले आहेत. दिल्लीत त्यांचा वाढदिवस मोठ्या प्रमाणावर साजरा करण्यात आला. यासाठी नागपुरातील भाजपचे अनेक कार्यकर्ते व रा. स्व. संघाचे स्वयंसेवक गेले होते. 

नागपूर : भाजपचे माजी सरचिटणीस व आता पक्षात कोणतीही जबाबदारी नसलेले संजय जोशी पुन्हा सक्रिय झाले आहेत. दिल्लीत त्यांचा वाढदिवस मोठ्या प्रमाणावर साजरा करण्यात आला. यासाठी नागपुरातील भाजपचे अनेक कार्यकर्ते व रा. स्व. संघाचे स्वयंसेवक गेले होते. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी व अमित शहा यांचे वर्चस्व भाजपवर आल्यापासून संजय जोशी यांची वाट बिकट झाली आहे. एकेकाळी नरेंद्र मोदी यांचे जवळचे सहकारी म्हणून संजय जोशी ओळखले जात होते. संजय जोशी यांच्याकडे गुजरातमध्ये पक्षाच्या संघटनात्मक बांधणीची जबाबदारी होती. नरेंद्र मोदी मुख्यमंत्री झाल्यानंतर संजय जोशी यांना दूर सारण्यात आले. नितीन गडकरी पक्षाचे अध्यक्ष झाल्यानंतर पुन्हा संजय जोशी मुख्य प्रवाहात आले होते व त्यांच्यावर उत्तर प्रदेशची जबाबदारी सोपविण्यात आली होती. 

नरेंद्र मोदी यांनी संजय जोशी यांना हटविल्याशिवाय गोवा येथील पक्षाच्या कार्यकारिणीच्या बैठकीला उपस्थित राहणार नाही, असा इशारा दिला होता. संजय जोशी यांना सरचिटणीसपदावरून हटविण्यात आले. तेव्हापासून त्यांना पक्षात कोणतेही पद मिळालेले नाही. 

काही महिन्यांपूर्वी दिल्लीत संजय जोशी यांच्या समर्थनार्थ पोस्टर लागले होते. त्यावेळीही पक्षात खळबळ उडाली होती. पक्षाच्या वरिष्ठांनी आक्षेप घेतल्यानंतर हे पोस्टर हटविण्यात आले. आता पुन्हा त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने नागपुरातील त्यांना हार्दिक शुभेच्छा देणारे फलक लागले आहेत. या फलकांवर नरेंद्र मोदी, अमित शाह, नितीन गडकरी वा देवेंद्र फडणवीस यापैकी कुणाचेही छायाचित्र नाही. दिल्लीत मोठा कार्यक्रम झाला. संजय जोशी यांचे संघटनेवर अद्यापही पकड असल्याचे दाखविण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन होते काय? असा प्रश्‍न आता विचारला जात आहे. 
 

संबंधित लेख