sanjay dhotre and modi | Sarkarnama


ब्रेकिंग न्यूज

विनोद तावडे कृष्णकुंजवर . राज ठाकरे आणि विनोद तावडे यांच्यात चर्चा .

केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारात धोत्रेंना संधी मिळेल काय?

श्रीकांत पाचकवडे
शनिवार, 2 सप्टेंबर 2017

अभ्यासू, शेतकरी प्रश्नांची जाण असणारे आणि पश्‍चिम विदर्भात पक्ष संघटनशक्ती वाढवीत उत्कृष्ट कामगिरी केल्याने खासदार धोत्रे यांच्यावर सध्या केंद्रात महाराष्ट्रातील भाजप खासदारांचे प्रतोद म्हणून महत्वपूर्ण जबाबदारी दिली आहे. यासोबतच संसदीय सल्लागार समिती सदस्य पदावरही त्यांची नियुक्ती करण्यात आली

अकोला : केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारात महाराष्ट्रातून कोणाची वर्णी लागेल, याबाबत राजकीय वर्तुळात उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. मराठा, ओबीसी समाजाला खूष करण्यासाठी राज्यातून मराठा, ओबीसी समाजाच्या खासदाराला संधी मिळेल काय? अशी चर्चा अकोल्याच्या राजकीय वर्तुळात कालपासून सुरू आहे. आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुका लक्षात घेता मराठा, ओबीसी नेत्याला मंत्रिमंडळ विस्तारात संधी मिळाल्यास राज्यातील भाजपचे ज्येष्ठ खासदार खासदार संजय धोत्रे यांची वर्णी लागण्याची दाट शक्‍यता आहे. 

कोपर्डी येथील मराठा भगिनीवरील अत्याचाराचे प्रकरण आणि मराठा आरक्षणाच्या मुद्यावर राज्यातील मराठा समाजाने मराठा क्रांती मोर्चाच्या माध्यमातून सत्ताधारी भाजप सरकारच्या अडचणी वाढवल्या होत्या. सरकारविषयी मराठा समाजाच्या संतापाचा वाढता उद्रेक कमी करण्यासाठी आणि आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मराठा, ओबीसी समाजाला केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान देऊन त्यांना आपल्या बाजुला वळवण्याचा प्रयत्न भाजप श्रेष्ठींकडून होऊ शकतो. हे प्रत्यक्षात झाल्यास राज्यातील भाजपच्या काही खासदारांची लॉटरी लागू शकते. महाराष्ट्रात भाजपचे 23 खासदार आहेत. 

यामध्ये मराठा, ओबीसी समाजाचे खासदार म्हणून मराठवाड्यातून प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे चार वेळा, विदर्भातून खासदार संजय धोत्रे तीन वेळा आणि पश्‍चिम महाराष्ट्रातून संजय काका पाटील एकदा विजयी झाले आहेत. डॉ. सुभाष भामरे, नाना पटोले, ए.टी. नाना पाटील, रक्षा खडसे, कपिल पाटील हे पहिल्यांदाच लोकसभा निवडणुकीत विजयी झाले आहेत. 

यापैकी डॉ. भांमरे यांची संरक्षण राज्यमंत्री पदावर वर्णी लागली आहे. तर रावसाहेब दानवे यांना यापूर्वी केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान मिळाले असल्याने आणि महाराष्ट्र भाजपाच्या अध्यक्षपदाची त्यांच्याकडे महत्वपूर्ण जबाबदारी असल्याने त्यांना पुन्हा संधी मिळणे कठीण आहे. त्यापाठोपाठ अकोला लोकसभा मतदार संघातून सलग तिसऱ्यांदा विजयाची हॅटट्रीक करणारे खासदार संजय धोत्रे हे सध्या पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्या गुड बुक मध्ये आहेत. 

अभ्यासू, शेतकरी प्रश्नांची जाण असणारे आणि पश्‍चिम विदर्भात पक्ष संघटनशक्ती वाढवीत उत्कृष्ट कामगिरी केल्याने खासदार धोत्रे यांच्यावर सध्या केंद्रात महाराष्ट्रातील भाजप खासदारांचे प्रतोद म्हणून महत्वपूर्ण जबाबदारी दिली आहे. यासोबतच संसदीय सल्लागार समिती सदस्य पदावरही त्यांची नियुक्ती करण्यात आली असून नुकत्याच झालेल्या राष्ट्रपती पदाच्या निवडणूकीत पक्षाने त्यांच्याकडे झारखंड राज्याच्या प्रचाराची दिलेली जबाबदारी त्यांनी यशस्वीपणे पूर्ण केली आहे. त्यामुळे खासदार धोत्रे यांची मंत्रिमंडळ विस्तारात संधी मिळण्याची शक्‍यता वाढली आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्ताराच्या जोरदार हालचाली सुरू असून राज्यातून कोणाचा पत्ता कट होतो आणि कोणाला संधी मिळते ? याकडे सर्वसामान्य नागरिकांचे लक्ष लागले आहे. 
 

संबंधित लेख