जयंत पाटलांनी वारंवार सांगितले, पण जगतापांनी त्यांचे आदेश मानलेच नाहीत!

राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांचे सासरे भाजपचे आमदार शिवाजी कर्डिले हे आहेत
जयंत पाटलांनी वारंवार सांगितले, पण जगतापांनी त्यांचे आदेश मानलेच नाहीत!

मुंबई : पुणे महानगरपालिकेच्या अभद्र युती नंतर आता अहमदनगर महापौरापदासाठी राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यांच्या नगरी दणक्‍याने कॉंग्रेस - राष्ट्रवादी आघाडी घायाळ झाल्याचे चित्र आहे. राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांच्या गटाला भारतीय जनता पक्षाने सत्तेच्या सावलीत खेचताना त्यांच्यावर असलेल्या गंभीर फौजदारी गुन्ह्यांना बगल देत अभद्र युतीच्या सत्तेचं शिखर गाठले.

चौथ्या क्रमांकाचे नगरसेवक असतानाही भारतीय जनता पक्षाने राष्ट्रवादी व बसपच्या सोबतीने महापौरपद मिळवले. मात्र, राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांना या बेरजेच्या राजकारणाने हवालदिल केले असून आघाडीतल्या कुरघोडीला पुन्हा बळ मिळण्याचे संकेत आहेत. 

सर्वात मोठा पक्ष शिवसेना मात्र या निवडणूकीत तोंडघशी पडली असून भारतीय जनता पक्षाने साम- दाम- दंड नितीने शिवसेनेला सत्तेपासून दूर ठेवण्यात बाजी मारली आहे. भाजपचे रणनितीकार जलसंपदा मंत्री गिरीष महाजन यांच्या डावपेचांना पराभूत होवूनही पुन्हा एकदा यश आल्याने उत्तर महाराष्ट्रात महाजन यांच्या नेतृत्वाची छाप गडद झाली आहे. 

राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी भाजपला मतदान करू नका असे वारंवार स्थानिक नेत्यांना आदेश दिले होते. मात्र, अहमदनगर शहरात नुकतीच झालेली शिवसेना पदाधिकाऱ्यांची हत्या अन त्यातून सुरू झालेला शिवसेना राष्ट्रवादीचा कडवा संघर्ष या युतीचा आधार असल्याचे मानले जाते.

शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या हत्येचा थेट आरोप आमदार संग्राम जगताप यांच्यावर करण्यात आला होता. त्यांना अटक देखील करण्यात आली होती. मात्र, त्यांच्या कार्यकर्त्यांनी पोलिस स्टेशनवर हल्ला करून जगताप यांची सुटका केली होती. इतका गंभीर गुन्हा असतानाही भारतीय जनता पक्षाने राष्ट्रवादीला सोबत घेतल्याने राजकीय क्षेत्रात सत्तेपुढं शहाणपण चालत नसल्याची चर्चा आहे. राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांचे सासरे भाजपचे आमदार शिवाजी कर्डिले हे आहेत. त्यामुळे, सत्तेची सहानुभूती मिळण्यासाठी राष्ट्रवादीने भाजपसोबत हातमिळवणी केल्याचे बोलले जाते.   

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com