sangli-sharad-pawar-devendra-fadanvis-drought | Sarkarnama

शब्दांचा खेळ करून दुष्काळाचे राजकारण नको; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा शरद पवारांना टोला

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 24 ऑक्टोबर 2018

राज्यातील भयावह दुष्काळी परिस्थिती असताना विरोधकांकडून अशा गोष्टीचेही राजकारण सुरू आहे. राज्य सरकारने दुष्काळसदृश परिस्थिती जाहीर केली आहे. आघाडी सरकारने दुष्काळ शब्दच हद्दपार केला होता. परंतु, आम्ही तो शब्द पुन्हा वापरून उपाययोजना सुरू केल्या. त्यामुळे कुणी शब्दाचा खेळ करून दुष्काळाचे राजकारण करू नये, असा टोला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवार यांचे नाव न घेता लगावला. 

सांगली : राज्यातील भयावह दुष्काळी परिस्थिती असताना विरोधकांकडून अशा गोष्टीचेही राजकारण सुरू आहे. राज्य सरकारने दुष्काळसदृश परिस्थिती जाहीर केली आहे. आघाडी सरकारने दुष्काळ शब्दच हद्दपार केला होता. परंतु, आम्ही तो शब्द पुन्हा वापरून उपाययोजना सुरू केल्या. त्यामुळे कुणी शब्दाचा खेळ करून दुष्काळाचे राजकारण करू नये, असा टोला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवार यांचे नाव न घेता लगावला. 

जिल्ह्यातील सिंचन योजनांची कामे डिसेंबर 2019 पर्यंत पूर्ण होतील, असे आश्वासनही त्यांनी यावेळी व्यक्त केले. 

सांगली जिल्हाधिकारी कार्यालयात विविध शासकीय योजनांची मुख्यमंत्री फडणवीस यांनी आज आढावा घेतला. त्यानंतर ते पत्रकार परिषदेत बोलत होते. जिल्ह्याचे पालकमंत्री सुभाष देशमुख, कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत, विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर आदी उपस्थित होते. 

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, "राज्यात शेतीसह पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे. पावसाळ्यात भूजल पातळी वाढली होती, मात्र जादा उपसा झाल्याने पाण्याची पातळी घटली. सरकारने राज्यातील 180 तालुक्‍यांत दुष्काळसदृश परिस्थिती जाहीर करून विविध आठ प्रकरच्या उपाययोजनांचे आदेश दिलेत. विरोधकांकडून दुष्काळसदृश नको, दुष्काळ जाहीर करण्याची मागणी करीत राजकारण करण्याचा डाव आहे. तत्कालीन कॉंग्रेस-राष्ट्रवादी आघाडीने दुष्काळ हा शब्द उडवून टंचाईसदृश केला होता. त्यामुळे विरोधकांना दुष्काळाबाबत किती चिंता होती, ते जनतेला समजले आहे. भाजप सरकार सत्तेत आल्यानंतर आम्ही केंद्राकडे पाठपुरावा करून पुन्हा दुष्काळसदृश हा शब्द वापरला. राज्य सरकारकडून उपाययोजना केल्या जात आहेत. केंद्राच्या पथक राज्यातील दुष्काळाची पाहणी करून आणखी मदत देईल.''
 
पुरुषार्थ दाखवणाऱ्यांचा अपमान करू नका 
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, "जलयुक्त शिवार योजनांच्या माध्यमातून राज्यात चांगले काम झाले. अनेक गावे टंचाईतून सुटली. जलयुक्त योजना सरकारची नव्हे जनतेची आहे. योजनेबाबत विरोधकांनी प्रश्नचिन्ह उभे केले ही दुर्दैवी बाब आहे. सकाळी उठून श्रमदान करून गावांनी पाणीप्रश्न सोडवला. ज्या लोकांनी पुरुषार्थ दाखवला, त्यांचा अपमान कॉंग्रेस-राष्ट्रवादीने करू नये.''
 
सिंचन योजना डिसेंबर 2019 पर्यंत पूर्ण 
सिंचन योजनाबाबत मुख्यमंत्री म्हणाले, "जिल्ह्यातील सिंचन योजनांच्या कामांना गती आली आहे. बंदिस्त पाईपलाईनमुळे योजनचे बजेट 700 कोटी रुपयांनी कमी झाले. कृष्णा खोरे विकास महामंडळाच्या माध्यमातून 1 लाख हेक्‍टर क्षेत्र ओलिताखाली आणण्याचा प्रयत्न सुरू आहे. जिल्ह्यातील सर्व सिंचन योजनांची कामे डिसेंबर 2019 पर्यंत पूर्ण करण्यात येणार आहेत. टेंभू योजनेतून सर्वाधिक क्षेत्र पाण्याखाली येईल. डिसेंबर महिन्यात टेंभूच्या चौथ्या टप्प्याचे लोकार्पण करण्यात येईल, तर टप्पा पाचचे काम मार्चपर्यंत पूर्ण करण्याचा प्रयत्न आहे, त्याबाबतच्या सूचना अधिकाऱ्यांना देण्यात आल्या.'' 
 

संबंधित लेख