राजकीय वैर विसरून प्रतीक पाटीलांचा विश्वजीत कदमांना मैत्रीचा हात !

पतंगराव कदम यांच्या अकाली निधनानंतर मात्र वसंतदादांचे नातू, माजी केंद्रीय राज्यमंत्री प्रतीक पाटील यांनी विश्‍वजीत कदम यांच्यासाठी सर्वप्रथम मैदानात उडी घेतली आहे. पलूस-कडेगाव या पतंगरावांच्या पारंपारिक मतदार संघातून पोटनिवडणूकीत विश्‍वजीत यांना बिनविरोध निवडून द्यावे, असे आवाहन त्यांनी सर्वपक्षियांना केले आहे.
Pratik-Patil-Vishwajeet
Pratik-Patil-Vishwajeet

सांगली :जिल्ह्याच्या राजकारणात कॉंग्रेसअंतर्गत वसंतदादा घराणे आणि पतंगराव कदम घराण्यात गेल्या दोन दशकांपासून राजकीय संघर्ष पहायला मिळतोय. विविध निवडणुकांपासून ते राजकीय मेळाव्यांपर्यंत दोन्ही गटांनी जेथे शक्‍य असेल तेथे एकमेकांची जिरवण्याची भूमिका घेतली.

आता पतंगराव कदम यांच्या अकाली निधनानंतर मात्र वसंतदादांचे नातू, माजी केंद्रीय राज्यमंत्री प्रतीक पाटील यांनी विश्‍वजीत कदम यांच्यासाठी सर्वप्रथम मैदानात उडी घेतली आहे. पलूस-कडेगाव या पतंगरावांच्या पारंपारिक मतदार संघातून पोटनिवडणूकीत विश्‍वजीत यांना बिनविरोध निवडून द्यावे, असे आवाहन त्यांनी सर्वपक्षियांना केले आहे.

वसंतदादांच्या निधनानंतर जिल्ह्याच्या राजकारणात दादा घराण्याचा वरचष्मा कमी होत असताना पतंगरावांचे येथे प्रभुत्व वाढत गेले होते. जिल्ह्याच्या कॉंग्रेसमध्ये दोन समांतर शक्ती कार्यरत होत्या आणि त्यात एकमेकांविरुद्ध अनेकदा उघड संघर्षही केला, मात्र संकट काळात एकमेकांच्या पाठीशी उभे राहण्याची संस्कृती असल्याचे सांगत प्रतीक यांनी विश्‍वजीत यांच्यासाठी पुढाकार घेतला आहे.

वसंतदादांचे पुत्र, तथा माजी खासदार प्रकाशबापू पाटील यांच्या निधनानंतर पतगरावसाहेबांनी आम्हा भावांना आधार दिला, पाठबळ दिले, अशी भावनिक भूमिका प्रतीक यांनी प्रसिद्धी पत्रकातून मांडली आहे. विश्‍वजीतच्या या संकट काळात आम्ही त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहू, असे त्यांनी स्पष्ट केले आहे.

त्यांनी पुढे म्हटले आहे, की पतंगराव कदम यांचे कार्य राज्य व जिल्ह्यात आदर्श होते. त्यांच्या निधनाने कॉंग्रेसची मोठी हानी झाली आहे. ती भरून निघणे अशक्‍य आहे. शैक्षणिक, सामाजिक, राजकीय, सहकार क्षेत्रात त्यांनी मोठी कामगिरी केली आहे. संस्थात्मक उभारणी व विकासाचे डोंगर उभे करून त्यांनी अव्दितीय कामगिरी केली. सामान्यातील सामान्य माणसाला उभे केले. त्यांचे अचानक निधन झाल्याने एक मोठी पोकळी निर्माण झाली आहे. नियतीसमोर नाईलाज आहे. या संकट काळात आम्ही विश्‍वजीत यांच्यासोबत खंबीरपणे उभे आहोत.

पलूस-कडेगाव विधानसभा मतदार संघातून कदमसाहेबांनी अनेकदा विजय मिळविला. इथल्या जनतेने त्यांच्यावर मनापासून प्रेम केले. महाराष्ट्राचे नेते वसंतदादा पाटील यांनीही आपली शक्ती साहेबांच्या पाठीशी उभी केली होती. त्यांच्या मतदार संघात पोटनिवडणूक होईल. त्यात कॉंग्रेसकडून विश्वजित यांची उमेदवारी असेल.

विश्वजित यांच्यावरही इथल्या जनतेने विश्‍वास दाखवला आहे, प्रेम केले आहे. युवक कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष म्हणून त्यांनी छाप सोडली आहे. पतंगरावांच्या कार्याचा वारसा ते समर्थपणे पेलत आहेत. प्रकाशबापूंच्या निधनातंतर आम्हाला कदमसाहेबांनी आधार दिला. विश्‍वजीत यांच्या संकटकाळात आम्ही त्यांच्यासोबत खंबीरपणे उभे राहू. आर. आर. पाटील यांच्या निधनानंतर सुमनताईंसाठी सर्व पक्षियांनी पाठिंबा दिला होता. तसाच तो विश्‍वजीत यांना द्यावा, हीच कदमसाहेबांना श्रद्धांजली ठरेल.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com