Sangli Politics Sadabhau Khot Raju Shetty | Sarkarnama

जयंतराव- शेट्टी एकच : सदाभाऊ खोत यांची टीका

सरकारनामा ब्युरो
शनिवार, 1 जुलै 2017

मी अजूनही स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा प्रतिनिधी म्हणूनच राज्य मंत्रिमंडळात काम करत आहे. गोपनीयतेची शपथ घेतल्याने चौकटीत राहून शेतकाऱ्यांचे प्रश्न सोडवत आहे. काहींना मी केंद्रस्थानी ठेवून काम करावे असे वाटते. जे मला जमणार नाही. मला अल्टीमेटमची गरज नाही.- सदाभाऊ खोत

इस्लामपूर : आमदार जयंत पाटील आणि खासदार राजू शेट्टी एकत्रच आहेत, यात नवे काहीच नाही. जिल्हा परिषद बागणी गट निवडणुकीत ते दिसले आहे, अशी टीका कृषी व पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी आज येथे प्रसारमाध्यमांशी बोलताना केली. तुपकर यांचा राजीनामा देखील त्यांनी तो कुणाकडे दिला यावर असल्याचे सांगून विषय टोलवला.

आमदार जयंत पाटील आणि खासदार राजू शेट्टी एकत्र येण्याच्या शक्‍यतेवर विचारले असता मंत्री खोत म्हणाले, ''त्यांना एकत्र यायला नव्या मुहूर्ताची गरज नाही. ते एकच आहेत. जिल्हा परिषद बागणी गट निवडणुकीत ते सिद्ध झाले आहे.''

वस्त्रोद्योग महामंडळ अध्यक्ष रविकांत तुपकर यांनी राजीनामा दिल्याच्या वृत्ताबाबत ते म्हणाले, "राजीनामा मंजूर व्हावा किंवा नको याबाबत काय वाटते यावरून तो नेमका कुणाकडे दिला आहे. याला महत्त्व आहे. खरेच मंजूर व्हावा असे वाटत असेल तर त्यांनी तो राज्यपाल किंवा मुख्यमंत्री यांच्याकडे द्यायला हवा होता."

ते म्हणाले, "मी अजूनही स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा प्रतिनिधी म्हणूनच राज्य मंत्रिमंडळात काम करत आहे. गोपनीयतेची शपथ घेतल्याने चौकटीत राहून शेतकाऱ्यांचे प्रश्न सोडवत आहे. काहींना मी केंद्रस्थानी ठेवून काम करावे असे वाटते. जे मला जमणार नाही. मला अल्टीमेटमची गरज नाही. समिती आणि चौकशी हे वैचारिक मुद्यांवर असते. इथे व्यक्तिद्वेषातून चौकशी होत आहे. त्याला काय करायचे?"
सरकार शेतकऱ्यांचे आहे. स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस लोकांच्या बांधावर जाऊन शेतकऱ्यांचे प्रश्न समजावून घेत आहेत. केंद्र सरकारच्या मदतीशिवाय दिलेली ही ऐतिहासिक कर्जमाफी आहे. सरकारी धोरणामुळेच कोणतीही मागणी नसताना एफआरपी वाढवून मिळाली आहे, असेही ते म्हणाले.

आंब्याच्या झाडावरच दगड मारले जातात
मी काम करतोय म्हणून माझ्यावर टीका होतेय. सत्ता नसल्याने काहींना कोणतेच काम नाही. मोकळे मन म्हणजे सैतानाचे घर असते. काहीतरी करायचे म्हणून ते टीका करत आहेत, अशी टीका आमदार जयंत पाटील यांना उद्देशून मंत्री खोत यांनी केली.

संबंधित लेख