सांगलीत  पोलिस कॉन्स्टेबलचा खून.. आता एवढेच उरले होते...  

गेल्या वर्षी सांगलीच्या पोलिसांचे अंकली टोलनाक्‍यावर टोळीयुद्ध झाले. नुकतेच पोलिसांनी कोठडीत हत्याकांड केले. कुरुंदकर नामक वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने आपल्या सहकारी महिला पोलिस अधिकाऱ्याचा बेपत्ता करून खून केला. आता चक्क एका गुंडाने वर्दीतील पोलिसाचा खून केला. आता काय उरले? पूर्वी पोलिसाची भीती दाखवून लहान मुलाला भीती घातली जायची. आता सारेच संपले. पोलिस गुन्हेगारांना रोखण्यासाठी पुढे जाण्याचे धाडस करतील काय?
sangli-police-murder
sangli-police-murder

सांगली : "रत्ना'बारमध्ये पोलिसाचा खून' या वॉटसऍपवरील एका धक्‍कादायक मेसेजने सांगलीकरांची बुधवारची सकाळ उजाडली...आता लोकांना खून ही गोष्ट फार सुन्न करत नाही. महिन्यात एक दोन म्हणजे आता सवयीचे झाले आहे.

टोळी युद्धातले, भाऊबंदकीतले, आर्थिक आणि अनैतिक संबंधातून खून पडत राहतात...पण आता चक्‍क वर्दीत असताना समाधान मांटे या  पोलिस कॉन्स्टेबलचाच खून झाला आहे, तो देखील सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या साक्षीने. किती मोठे धाडस. वाईटांना (खलांना) वाटणारा धाकसुद्धा संपल्याचे या घटनेतून स्पष्ट झाले आहे. 

"सद्रक्षणाय खलनिग्रहणाय' असे पोलिसांचे घोषवाक्‍य आहे पण खल म्हणजे गुन्हेगारच पोलिसांना संपवू लागल्याचा अत्यंत वाईट मेसेज समाजात जातो आहे. कायदा व सुव्यस्थेचा असा बोऱ्या कधीच वाजला नव्हता.  वर्षभरापूर्वी सांगली पोलिसांच्या अब्रूची लक्‍तरे ज्या कोथळे प्रकरणाने राज्याच्या वेशीवर टांगली गेली त्यातून काहीच धडा वर्दीने घेतलेला दिसत नाही. त्यावेळी राज्याच्या पोलिस महासंचालकांनी कोथळे प्रकरणाने खाकीला शरम आणली अशा शब्दात दिलगिरी व्यक्त केली होती. 

 पोलिसांचा कारभार ज्या पध्दतीने चालला आहे त्यानुसार ना काळे धंदे बंद आहेत ना गुंडांच्या टोळ्यांना आळा बसला आहे. गुंड तडीपार केले किंवा मोका लावला तरीही फळकुट दादांपासून ते नामचिन गुंडांची दहशत कायम आहे. ती सामान्यांसाठी सोडा आता पोलिसांनाही भिक घालत नाही. आता पोलिस रोज उठून कोणत्या तरी चौकात जी तपासणी करतात त्यात आतापर्यंत किती गुन्हेगार सापडलेत? का सामान्यांनाच रोज वेठीस धरायचे आणि गुंडांना मोकाट सोडत चेक पोष्टची नुसती नौटंकी करायची असा सवाल संतप्त जनतेतून व्यक्‍त होत आहे. 

 गृहखात्याने आता सांगलीची सूत्रे तरुण तडफदार आणि थेट आयपीएस असलेल्या सुहैल शर्मांकडे सोपविली. शर्मा यांनी मध्यंतरी तासगाव येथील राजकीय हाणाणारीच्या प्रकरणात कोणाचाही मुलाहिजा व दबाव न घेता काम केले. पण एकूणच बेसीक पोलिंसिंगबाबत आजही तीच रडकथा आहे. स्थानिक पोलिस आणि गुन्हेगार यांचे संबंध...हाफ्तेखोरीत सापडलेली खाकी वर्दी, काळ्या धंद्यांना दिले जाणारेअभय  यामुळे पोलिस आजही बदनामच होत चालले आहेत. 

मध्यतंतरी दोन पोलिसांत सिनेमास्टाईल गॅंगवॉरसारखी मारामारी लोकांनी पाहिली. वारणानगर प्रकरणात तर एलसीबीचे अधिकारी तपासाठी गेले आणि स्वत:च दरोडा टाकून रक्‍कम हडप करून बसले. कोथळे प्रकरणात तर पोलिसांनी खून केला असे आरोप झाले आणि आता तर पोलिसाचा वर्दीत असतानाच खून झाला आहे. ही घटना अत्यंत दुर्दैवी आहे. 

पण यातून एक प्रक्रियाही घडते आहे ती म्हणजे एका दुष्टचक्राची आहे.  सांगलीचा संजयनगर भाग आणि मिरजतील काही ठिकाणी रात्री उशीरापर्यंत काही हॉटेल-बार हे कोणाच्या कृपने चालू राहतात? काही बारचे मालक तर अनेक गुन्ह्यात अडकलेलेच आहेत. अशांच्या बारमध्ये पोलिस अधिकारी व त्यांचे कनिष्ट यांची उठबस असल्याचीही चर्चा ऐकायला मिळत असते.

गुन्हेगारांचे धाडस असे एका दिवसात वाढत नसते. बारवाल्यांचाही आता पोलिसांना धाक राहिलेला नाही. सध्या सांगलीत आचारसंहिता सुरू असताना साडे दहा वाजता बार बंद करायचा नियम असताना इथेच का सवलत? यातले सारे तपशिल महत्वाचे नाहीत. तर पोलिस यंत्रणा अशा प्रकारांबाबत किती हलगर्जी वागते हे महत्वाचे. पोलिस यंत्रणा आता यातून काय धडा घेते यावर समाजाच्या सुरक्षेचे भवितव्य अवलंबून असेल. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com