पक्षांतर टाळण्यासाठीच्या गेममुळेच बंडखोरीला उधाण ;नेत्यांचे कसब लागले  पणाला 

बंडखोरीचे आव्हान प्रामुख्याने दोन्ही कॉंग्रेसपुढे अधिक आहे. कॉंग्रेसमधील बंडखोरी शमवण्यासाठी पक्षनिरीक्षक अभय छाजेड यांनी सांगलीच्या मैदानात उडी घेतली आहे.
 पक्षांतर टाळण्यासाठीच्या गेममुळेच बंडखोरीला उधाण ;नेत्यांचे कसब लागले  पणाला 

सांगली :  भाजपला उमेदवारांची आयती रसद मिळू नये यासाठी दोन्ही कॉंग्रेसमधील नेत्यांनी आपल्याकडील सर्वच इच्छुक तयार कार्यकर्ते आणि मातब्बरांना अर्ज भरण्यास सांगण्याची आयडिया केली. मात्र आता ती कॉंग्रेस नेत्यांच्या चांगलीच अंगलट आली आहे. दुसरीकडे आयारामांचे स्वागत करण्याच्या नादात भाजपलाही बंडखोरीने ग्रासले आहे. उद्या (ता.17) दुपारी तीनपर्यंत अर्ज माघारीची मुदत असून त्याआधी बंडोबांना थंड करण्यासाठी नेत्यांचे कसब पणाला लागले आहे. 

बंडखोरीचे आव्हान प्रामुख्याने दोन्ही कॉंग्रेसपुढे अधिक आहे. कॉंग्रेसमधील बंडखोरी शमवण्यासाठी पक्षनिरीक्षक अभय छाजेड यांनी सांगलीच्या मैदानात उडी घेतली आहे. प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांचा थेट बंडखोरांशी संपर्क घडवून चर्चा करवण्यासाठी शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांनी पुढाकार घेतला आहे. कॉंग्रेसमधील मदनभाऊनिष्ठ राजेश नाईक यांनी बंडखोरांचा झेंडा खांद्यावर घेतला आहे. खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली त्यांनी बंडखोरांची महाआघाडी करण्यात आली आहे.

यात सर्वपक्षीय बंडखोर सहभागी झाले आहेत. कॉंग्रेसचे किरण जगदाळे, अशोक शेठ, अशोक माने, शेवंता वाघमारे, गजानन मगदूम, अतुल माने, उपमहापौर विजय घाडगे, बाहुबली कबाडगे, नंदू देशमुख, शहाजी भोसले, महेश कर्णी, आनंदा लेंगरे तर राष्ट्रवादीच्या किरण सूर्यवंशी, संदीप दळवी, माधुरी कलगुटगी, प्रसाद मदभावीकर, अल्लाउद्दीन काझी, धनंजय पाटील यांनी बंडाचा पवित्रा घेतला आहे. 

महापालिका निवडणुकीत प्रथमच 77 जागा चिन्हावर लढवत असलेल्या भाजपला उमेदवारांची अंतिम यादी जाहीर करण्यासाठी शेवटपर्यंत वाट पाहावी लागली. सुमारे 600 इच्छुकांच्या मुलाखती वाजत-गाजत झाल्यानंतरही भाजपच्या गोटात अस्वस्थता होती. कारण इच्छुकामध्ये "विनिंग मेरीट'ची उणीव होती.

त्यामुळे शेवटच्या क्षणी "एबी' फॉर्म दिले. 11 विद्यमान आणि 9 माजी नगरसेवकांना भाजपने संधी दिली. जवळपास निम्मे उमेदवार आयात केल्यामुळे भाजपमधील अनेक निष्ठावंत नाराज झाले. त्यामुळे त्यांनी बंडखोरीचा पवित्रा घेतला. भाजपमध्ये सक्रिय असताना सुद्धा उमेदवारी नाकारल्यामुळे 20 जणांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. 

अंकुश जाधव, संदीप कुकडे, रणजित सुधीर पाटील, सुधीर पाटील, छाया हाक्के, आरती दिवाण, माजी नगरसेवक बालाजी काटकर, सुवर्णा कदम, अमित देसाई आदींसह 20 जण बंडाच्या पवित्र्यात आहेत. आमदार सुधीर गाडगीळ यांनी नाराजांच्या घरी जाऊन त्यांना विनंती केली जाईल, असे जाहीर केले आहे.

तसेच महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनीही तिकीट मिळालेल्या उमेदवारांनी प्रथम नाराजांना पटवा मगच तुम्हाला यश मिळेल असा सल्ला दिला आहे. त्यामुळे भाजपची कोअर समिती नाराजांच्या संपर्कात आहे. मिरजेत ओंकार शुक्‍ल, शीतल पाटोळे अशा काहींनी बंडखोरी केली आहे तर काहींनी थेट शिवसेनेत आश्रय घेत भाजपला आव्हान दिले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com