सांगली : 'म्हैसाळ' योजनेच्या वीज थकबाकीपोटी 'कनेक्शन' तोडल्यामुळे ऐन उन्हाळ्यात पाणीप्रश्न पेटला आहे. 50 कोटी रूपये मिळण्याची घोषणा खासदार संजयकाका पाटील यांनी नुकतीच केली. परंतू अद्यापही निधी मंजूर नाही. त्यामुळे काल मुंबईत झालेल्या बैठकीत संजयकाकांनी आपले दबावंतंत्र वापरले.
आमदार सुरेश खाडे यांनीही राजीनामा अस्त्र काढले. त्यामुळे खासदार-आमदरांच्या या 'कनेक्शन' जोडा नाही तर आमचे पक्षाशी 'कनेक्शन' तोडतो असाच तो इशारा होता. दबावतंत्राचा परिणाम आणि योजनेचे महत्व पटल्यामुळे कृष्णा खोरे महामंडळामार्फत वीज थकबाकीसाठी पैसे देण्याचा अखेर निर्णय आज घेतला गेला.
म्हैसाळ योजनेच्या वीज थकबाकीपोटी कनेक्शन तोडले आहे. त्यामुळे पूर्व भागातील शेतकरी आणि नेतेमंडळींनी पाणी सोडण्यासाठी धावाधाव सुरू केली आहे. संजयकाकांनी नुकतेच पत्रकार परिषद घेऊन म्हैसाळ, ताकारी आणि टेंभूच्या थकबाकीपोटी 50 कोटी रूपये देण्यास मुख्यमंत्र्यांनी संमती दिल्याचे सांगितले. तत्काळ महावितरणकडे निधी वर्ग होऊन म्हैसाळचे कनेक्शन जोडले जाईल अशी ग्वाही दिली. परंतू अद्यापही निधी मंजूर झाला नाही.
जिल्हाधिकारी कार्यालयात दोन दिवसापूर्वी बैठक झाली. तेव्हा माजी मंत्री प्रतीक पाटील आणि इतरांनी खासदारांनी घोषणा केलेले पैसे अद्याप आले नाहीत काय? असा जाब विचारला. तेव्हा पाटबंधारेच्या अधीक्षक अभियंत्यांनी पाठपुरावा सुरू असल्याचे सांगितले. म्हैसाळच्या 30 कोटीपैकी किमान 15 कोटी रूपये भरले तरच योजना सुरू होऊ शकते असे सांगून पैशाशिवाय तडजोड करण्यास असमर्थता दर्शवली.
म्हैसाळ योजना सुरू व्हावी म्हणून संजयकाका आणि आमदार सुरेश खाडे यांनी काल बुधवारी मुंबईत जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्याशी चर्चा केली. परंतू थकबाकीपोटी पैसे द्यायचे कोण? यावरून बराचवेळ चर्चा होऊनही निर्णय झाला नाही. राज्यातील आणखी काही योजनांसाठी अशाच पध्दतीने निधीची मागणी सुरू आहे.
त्यामुळे कोणाकोणाला निधी द्यायचा असा प्रश्न सरकारपुढे आहे. मात्र काकांनी संतप्त होऊन पैसे देणार नसाल तर आम्हला टोकाची भूमिका घ्यावी लागेल असेच सुनावले. त्यामुळे वातावरण गंभीर बनले. मंत्री महाजन आणि इतरांनी समजूत काढण्याचा प्रयत्न केला. गुरूवारी पुन्हा मुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत बैठक घेण्याचे आश्वासन दिले.
संजयकाकांनी काल आणि आज झालेल्या बैठकीत म्हैसाळ योजनेचे महत्व पटवून देताना पक्षासाठी किती हा प्रश्न महत्वाचा आहे याचेही भान मंत्र्यांना पटवून दिले. ऐन उन्हाळ्यात योजना बंद ठेवली तरी तर त्याचे परिणाम काय होतील? याची जाणीव करून दिली.
शेतकऱ्यांना पाणी मिळावे यासाठी काकांनी राजीनाम्याचे अस्त्र उचलल्यामुळे आजच्या बैठकीकडे सर्वांचे लक्ष लागले होते. काकांच्या दबावतंत्राचा परिणाम म्हणून अखेर कृष्णा खोरे महामंडळाच्या स्वनिधीतून म्हैसाळच्या थकबाकीसाठी निधी देण्याचा निर्णय घेतला गेला. त्यामुळे काकांचे दबावतंत्र अखेर कामी आल्याचे दिसले.
सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिका निवडणूक तोंडावर आली आहे. परंतू निवडणुकीची धुरा महसुलमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी आमदार सुधीर गाडगीळ, माजी आमदार दिनकर पाटील, माजी उपमहापौर शेखर इनामदार यांच्याकडे नुकतीच सोपवली. या निर्णयाबाबतही संजयकाका नाराज होते. अद्यापही त्याबाबत उलटसुलट चर्चा सुरू आहे. मात्र 'म्हैसाळ' च्या पाण्याची लढाई जिंकून त्यांनी आपला राजकीय खुंटा अधिक मजबूत केला असल्याची चर्चा सुरू झाली आहे.