Sangli : Jayant Patil enter's Vishwajeet Kadam's house for first time | Sarkarnama

सांगली : जयंतराव पहिल्यांदाच विश्वजीत कदमांच्या बंगल्यावर 

सरकारनामा
बुधवार, 11 जुलै 2018

आज मात्र प्रदीर्घ काळानंतर हा बंगला गर्दीने फुलला. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आघाडीची घोषणा केली. पतंगराव कदम यांच्या पश्‍चात प्रथमच ते अस्मिता बंगल्यात आले. जयंतराव अपवादाने इथे आले आहेत.

सांगली  : कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री पतंगराव कदम यांचा जिल्ह्याच्या कॉंग्रेसच्या राजकीय घडामोडींचा गेल्या पंधरा वर्षांपासून साक्षीदार आहे. जिल्ह्याच्या राजकारणात पतंगरावांचे वर्चस्व वाढत गेल्याबरोबरच या बंगल्याचेही महत्त्व वाढत गेले. पतंगरावांच्या निधनानंतर सुनसान झालेला हा बंगला आज पुन्हा एकदा कार्यकर्त्यांच्या उपस्थितीने बहरला. 

सांगलीत वसंतदादा घराण्याचे कॉंग्रेसमधील वर्चस्व. खासदार प्रकाशबापू यांचा कारखान्यासमोरील साई बंगला आणि विष्णूअण्णांचा वसंत कॉलनीतील विजय बंगला हे दीर्घकाळ राजकीय केंद्र राहिले. त्यानंतर पतंगरावांच्या वर्चस्वाबरोबर "अस्मिता'चे वलय वाढत गेले. पतंगरावांनी जिल्हा नेतृत्वापर्यंत मजल मारल्यानंतर मुख्यमंत्र्यांसह दिग्गजांची उपस्थिती याच बंगल्यावर राहिली.

 या नेत्यांची राजकीय खलबते आणि पत्रकार बैठकाही इथेच व्हायच्या. पालकमंत्री म्हणून पतंगरावांनी जिल्ह्यातील पंधरा वर्षांच्या काळात तर या बंगल्यावर प्रशासनाच्याही बैठका होत होत्या. सकाळी पतंगरावांचा इथे भरणारा दरबार राज्य मंत्रिमंडळाचे निर्णय जाहीर करणारा असायचा. राज्यातील सत्ताबदलानंतर मात्र "अस्मिता'चे वलय कमी झाले. तथापि पतंगराव असतील तेव्हा हा बंगला कार्यकर्त्यांनी वेढलेला असायचा. मात्र पतंगराव गेले आणि अस्मिता सुनासुना वाटू लागला. 

आज मात्र प्रदीर्घ काळानंतर हा बंगला गर्दीने फुलला. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आघाडीची घोषणा केली. पतंगराव कदम यांच्या पश्‍चात प्रथमच ते अस्मिता बंगल्यात आले. जयंतराव अपवादाने इथे आले आहेत. आज ते कॉंग्रेस आघाडीचे नेते म्हणून आले होते. त्यांच्यासोबत आमदार सतेज पाटील, आमदार विश्‍वजित कदम, माजी मंत्री प्रतीक पाटील, विशाल पाटील, पृथ्वीराज पाटील तसेच राष्ट्रवादीचे संजय बजाज, कमलाकर पाटील, सुरेश पाटील, श्रीनिवास पाटील, पद्माकर जगदाळे अशी दोन्ही कॉंग्रेसमधील नेत्यांची प्रभावळ होती.

संबंधित लेख