'वसंतदादांची सांगली' नांदेडची पुनरावृत्ती करणार कां ? 

'वसंतदादांची सांगली' नांदेडची पुनरावृत्ती करणार कां ? 

लातूर, सोलापूर, पिंपरी, चिंचवड, पुणे, पालघर,नागपूर असा चांदा ते बांद्यापर्यंत अनेक महापालिकांवर भाजपने विजयाचे निशान रोवले. त्यांचा विजयाचा अश्‍वमेध नांदेड महापालिकेत रोखला गेला. गलितगात्र कॉंग्रेसला जणू संजिवनीच मिळाली. "दिवा विझताना फडफडतो..' अशी या विजयाची भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी खिल्ली उडवली असली तरी या दिव्याची मशाल करून भाजपची लंका दहन होईल का अशी आशा निराशाग्रस्त कॉंग्रेसजनांमध्ये निर्माण झाली आहे. त्यात वसंतदादांचा गड असलेल्या सांगलीतही अशी अंधूकशी आशा निर्माण झाली आहे. आणखी दहा महिन्यानंतरचा सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महापालिकेच्या निवडणुकांच्या मैदानाची तयारी आता सुरु झाली आहे. जिल्हा परिषदेच्या यशाची पुनर्रावृत्ती करायचा भाजपचा होरा आहे. त्याला विद्यमान कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीजन या आव्हानांला कसे सामोरे जातात, हे रंजक असेल. 

राज्य आणि केंद्रातील भाजप सत्तेमुळे पश्‍चिम महाराष्ट्रातील सर्व सत्तास्थानांवरील मांडणी नव्याने झाली. त्याचा अनुभव गेल्या तीन वर्षातील सर्व निवडणुकांमधून आला आहे. आता महापालिकेतही येईल याबद्दल शंका नाही. दोन्ही कॉंग्रेसमधील निवडणुकांमधील मैदान म्हणजे ताटातील वाटीत..आणि वाटीतले ताटात असा प्रकार असे. आता मात्र सारे पत्ते विस्कटले आहेत. भाजपला सर्वत्र मिळालेल्या यशामुळे स्वतंत्रपणे आगामी महापालिका निवडणूक लढवण्याची जय्यत तयारी भाजपकडून सुरु झाली आहे. 

सुमारे तीस पस्तीस वर्षे पालिकेच्या राजकारणावर वट ठेवून असणाऱ्या मदन पाटील यांच्या निधनानंतर प्रथमच ही निवडणूक असेल. सध्या त्यांच्या पत्नी जयश्री पाटील यांचे नेतृत्वाचा टिळा लावून महापालिकेतील कॉंग्रेस काम करीत असली तरी आता पुढच्या निवडणुकीत त्यांचे किती शिलेदार कॉंग्रेसच्या तंबूत असतील याची शाश्‍वती जयश्री पाटील देखील देऊ शकणार नाहीत. जयश्री पाटील यांना राजकीय महत्वाकांक्षा आहेत. मात्र पुढचे राजकारण कोणत्या पक्षातून करायचे याबद्दल मात्र त्यांच्या मनात अद्याप संभ्रम आहे. कॉंग्रेसचे महिला आघाडीचे अध्यक्षपद जाहीर झाल्यानंतरही त्यांनी नाकारले. सध्या त्या सत्ताधारी पक्षाच्या नेत्या आहेत मात्र त्यांचा शब्द पालिकेत फक्त तोंडी लावण्यापुरताच आहे. मदन पाटील यांच्या पश्‍चात त्यांनी एकमेव पालिकेत आढावा बैठक घेतली आहे. सध्या सत्ताधारी गटाच्या नेत्या म्हणून एखाद दुसऱ्या विकास कामाच्या उद्‌घाटन एवढाच त्यांच्या पालिकेतील सत्तेशी संबंध उरला आहे. 

मदन पाटील यांच्या पश्‍चात आता विशाल पाटील यांनी महापालिकेच्या राजकारणात लक्ष घातले. त्यासाठी त्यांनी उपमहापौर गटाच्या नावाने शेखर माने यांच्यासोबत स्वतंत्र गट बांधला. मात्र माने यांनी मोहनराव कदम यांच्याविरोधात सांगली-सातारा स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या निवडणुकीनंतर बंडखोरी केल्यानंतर दोघांच्याही वाटा वेगळ्या झाल्या आहेत. विशाल पुन्हा एकदा कॉंग्रेसच्या माध्यमातूनच आपले राजकारण रेटतील अशी शक्‍यता आहे. त्यांचे विधानसभेसाठी लढण्याचे मनसुबे आहेत. वसंतदादा कारखाना यंदा भाडेतत्वावर चालवायला देऊन गळ्यातील पिढीजात लोढणे त्यांनी सोडवून घेतले आहे. कॉंग्रेसकडे कार्यकर्त्यांची मोठी फळी कायम आहे. त्याचवेळी त्याचा भ्रष्टाचाराने बरबटलेले चेहरेही कायम आहेत. कॉंग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांनी कॉंग्रेसची नवी घडी बसवण्यासाठी विभागनिहाय आढावा बैठका सुरु केल्या आहेत. मात्र त्यांचा कॉंग्रेसमधील भ्रष्टाचाराने बरबटलेली यंत्रणा गुंडाळून ठेवण्याचीच शक्‍यता अधिक. कॉंग्रेसपुढे सर्वात मोठे आव्हान तेच आहे. 

कॉंग्रेसमधून निलंबित झालेले शेखर माने यांनी सत्तेत राहताना गटाच्या नगरसेवकांची कामे करायची, त्याचवेळी महापालिकेतील भ्रष्ट कारभाराविरोधात विरोधक म्हणून उभे रहायचे असे सूत्र आखले आहे. त्यांची सध्या महापालिकेत स्वाभीमानी आघाडीसोबत म्हणजे गौतम पवार यांच्यासोबत आघाडी आहे. मात्र ही आघाडी निवडणुकीपर्यत राहीलच याची कोणीही शाश्‍वती देऊ शकत नाही. गौतम पवार यांनी स्वाभीमानी आघाडीच्या रुपाने सतीश साखळकर यांच्यासारखे नवे चेहरे सोबत घेत सांगलीत मोर्चेबांधणी सुरु केली आहे. त्याचवेळी ते पुन्हा भाजपमध्ये परततील अशीही अटकळ बांधली जाते. माजी आमदार संभाजी पवार यांनी शिवसेनेचे बंधन बांधले. मात्र विधानसभेनंतर त्यांचा शिवसेनेशी राजकीय संबंध उरलेला नाही. आता कॉंग्रेसमधून शिवसेनेत जाऊन जिल्हा संघटक पदी आलेले दिगंबर जाधव सेनेत जाण ओतण्यासाठी खटपट करीत आहेत. 

मदन पाटील यांच्यानंतर राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील महापालिकेचे राजकारणातील महत्वाचे नेते असतील असे महाआघाडीच्या सत्ताकाळात म्हटले जायचे. त्यांच्याच नेतृत्वाखाली यापुर्वीची म्हणजे महाआघाडीची सत्ता होती मात्र आता पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले आहे. कधी काळी त्यांची ज्या भाजपसोबत, संभाजी पवारांसोबत आणि मिरजेतील कारभाऱ्यांसोबत आघाडी होती...असे सारेच आता त्यांचे प्रमुख विरोधक झाले आहेत. राष्ट्रवादीची उडालेली रया पाहता त्यांच्यासाठी स्वबळावर पालिकेच्या निवडणुका लढवणे मुश्‍किल आहे. त्यामुळे जयंत पाटील आता कोणासोबत आघाडी करतील असाच सवाल पालिकेच्या वर्तुळातील प्रत्येकाचा असतो. त्यांच्यासाठी पुन्हा महाआघाडीचा प्रयोग अशक्‍यप्राय आहे. जिल्हा परिषदेवेळीच "नो जेजेपी ओन्ली बिजेपी' असा नारा खासदार संजय पाटील यांनी दिला सर्व भाजपच्या मंडळींनी तो अंमलातही आणला. आजघडीला जयंत पाटील कॉंग्रेससोबतच आघाडी करतील असा अंदाज आहे. कारण आता उघडपणे भाजपवर टिका करू लागले आहेत. 

सांगलीत सुधीर गाडगीळ आणि मिरजेत सुरेश खाडे असे भाजपकडे दोन आमदार असूनही ते महापालिकेचे नेतृत्व करतील असे मात्र कोणीही म्हणत नाहीत. माजी आमदार दिनकर पाटील, खासदार संजय पाटील, माजी उपमहापौर शेखर इनामदार, पक्षाचे प्रदेश सरचिटणीस मकरंद देशपांडे अशी नेत्यांची यादी भाजपकडे आहे. गत विधानसभेपुर्वीपर्यंत ते जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली काम करीत होते. आता त्यांना भाजपचा झेंडा स्वतःच्या खांद्यावर घेऊन विजय मिळवावा लागेल. मात्र त्यांची सारी भिस्त आता कॉंग्रेस-राष्ट्रवादीतील आयातीवरच आहे. पडद्याआड भाजपने त्यासाठी आवश्‍यक ती सर्व तयारी सुरु केली आहे मात्र त्यात एकवाक्‍यता नाही. 
जिल्हा सुधार समितीच्या नावाने ऍड. अमित शिंदे यांनी गेल्या दोन तीन वर्षात महापालिका क्षेत्रातील रस्त्यावरचे विरोधक अशी प्रतिमा निर्माण केली आहे. ते स्वतंत्रपणे लढतील की आघाडी करतील याबद्दल मात्र वेगवेगळे आडाखे बांधले जात आहेत. दिल्लीमध्ये आम आदमी पार्टीप्रमाणेच चमत्कार करण्याचा त्यांचा इरादा आहे. मात्र निवडणुकीसाठीची म्हणून गणिते वेगळी असतात. ती जमवणे हेच त्यांच्यापुढचे आव्हान असेल. 

यावेळी थेट महापौर निवडणूक असेल. मात्र त्यासाठीची आरक्षण प्रक्रिया अद्याप झालेली नाही. आरक्षण जाहीर झाल्याशिवाय महापौर पदाच्या उमेदवाराबद्दल अटकळ बांधणे अस्थयी ठरेल. आता महापालिकेत सत्ता आलीच अशा थाटात भाजप नेते वावरत आहेत. अनेकांना महापौर झाल्याची स्वप्नेही पडत आहे. महापालिकेतील गैरकारभाराविरोधात दोन्ही आमदारांनी ब्र काढलेला नाही. सत्ताधारी जितके बदनाम होतील तेवढे आपण सत्तेच्या जवळ जाऊ असा भाजप नेत्यांचा होरा आहे. खुंटीला टांगलेल्या शिकाळे तुटते कधी आणि तोंडात पडते कधी या आशेवर ते बसले आहेत. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com