30 नगरसेवक भाजपमध्ये जाणार, सांगलीत बहुरंगी लढत होणार! 

30 नगरसेवक भाजपमध्ये जाणार, सांगलीत बहुरंगी लढत होणार! 

सांगली : महापालिका निवडणुकीसाठी सर्व पक्षांच्या उठाबशांना सुरवात झाली आहे. यावेळी कधी नव्हे ते भाजप स्वतंत्रपणे निवडणुकीच्या मैदानातील प्रमुख स्पर्धक झाला आहे. त्यासाठी येत्या महिन्यात कॉंग्रेस-राष्ट्रवादीतील किमान तीस आजी माजी नगरसेवकांचा पक्षप्रवेश होणार असल्याचे आमदार सुधीर गाडगीळ यांनी जाहीर केले आहे. शिवसेनेनेही स्वतंत्रपणे लढण्यासाठी कंबर कसली आहे. सांगलीच्या मैदानातील अनुभवी मल्ल असलेल्या कॉंग्रेस-राष्ट्रवादीनेही आघाडीचे स्पष्ट संकेत दिले आहेत. आप आणि जिल्हा सुधार समितीची युतीही मैदानात असेल. एकूणच यावेळचे मैदान बहुरंगी असेल हे नक्की. 

महापालिकेची प्रभाग रचना जाहीर झाली त्यावरील सुचना हरकतींची प्रक्रियाही पुर्ण झाली आहे. किरकोळ दुरुस्तीनंतर पुढील आठवड्यात तिला अंतिम स्वरुप मिळेल. त्याआधी सर्वच पक्षांच्या उठाबशांना सुरवात झाली आहे. निवडणुका समोर ठेवून सर्वाधिक तयारी सुरु आहे ती भाजपची. यापूर्वी भाजपचे पालिकेत स्वतंत्र असे अस्तित्व नव्हते. स्वाभीमानी आघाडीचा तो भाग होता. आता मात्र महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी भाजपच्या नेत्यांचा बैठकांचा सपाटा लावला आहे. सध्या भाजपकडे चेहरे असलेले उमेदवार नाहीत. त्यामुळे जवळपास 30 आजी माजी कॉंग्रेस-राष्ट्रवादीच्या लोकांचा स्वागत समारंभ पुढील महिन्यात होणार आहे. 

प्रत्येक घरात भाजपची "भेट'वस्तू गेली पाहिजे असे सांगून चंद्रकांत पाटील यांनी मध्यंतरी वाद ओढवून घेतला होता. मात्र आता सांगली-मिरजेत भाजपचे दोन आमदार आणि जिल्ह्याचा एक खासदार आहे. त्यांच्यावर महापालिका सर करण्याचे आव्हान असेल. 

शिवसेनेकडूनही निवडणुकीची जोरदार तयारी सुरु आहे. माजी आमदार संभाजी पवार शिवसेनेत असले तरी त्यांचे चिरंजीव पृथ्वीराज आणि गौतम यांच्यावरच आता धुरा आहे. त्यांचे अद्याप तळ्यात मळ्यात सुरु आहे. नुकतेच शिवसेनेचे नेते अनिल देसाई आणि गजानन किर्तीकर यांचा जिल्हा दौरा झाला. शिवसेनेचा स्वबळावरचा नारा आहे. दिगंबर जाधव, शेखर माने या कॉंग्रेसजनांनी काही महिन्यांपुर्वी सेनेत प्रवेश करुन शहरात पक्षाला चेहरा दिला आहे. पुर्वाश्रमीच्या शिवसैनिकांची मोट बांधून एक संघटन उभे करण्यासाठी सध्या सेनेतील सर्वच नेत्यांची धडपड सुरु आहे. 

सांगलीच्या मैदानातील सर्वाधिक अनुभवी मल्ल असलेले सत्ताधारी कॉंग्रेस आणि विरोधी राष्ट्रवादी कॉंग्रेस यांच्यात राज्यातील सत्ता गेल्यापासून मोठी मरगळ आली आहे. या दोघांनीही पाच वर्षे पालिकेत सत्ता राबवली आहे. त्यामुळे त्यांना विरोधक मानता येणार नाही. त्यातच राज्यस्तरावर कॉंग्रेस आघाडीची चर्चा सुरु झाल्याने पालिका निवडणूकही एकत्र लढवण्याबाबत बहुतांशी एकमत झाले आहे. मात्र दोन्ही कॉंग्रेस एकत्र आल्या तर भाजपला आयते उमेदवार मिळतील असाही एक मतप्रवाह आहे. त्यामुळे भाजप-शिवसेनेतील अनेक उमेदवार या दोन्ही पक्षांच्या आघाडीनंतरच ठरतील असे दिसते. 

कॉंग्रेस-राष्ट्रवादीतून भाजपमध्ये जाण्यासाठी लाट तयार होते की काय अशी स्थिती निर्माण झाली होती. ती स्थिती मात्र आता उरलेली नाही. कॉंग्रेसने आजपासूनच इच्छुकांची, कार्यकर्त्यांची मते जाणून घेण्यासाठी बैठकांना प्रारंभ केला आहे. आता पक्षाची धुरा जयश्री पाटील, विश्‍वजीत कदम, विशाल पाटील, प्रतीक पाटील, पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांच्यावर असेल. पारंपरिक गटबाजीचे राजकारण संपवून निवडणुकीला सामोरे जाणे हेच या नेत्यांसमोरचे पहिले आव्हान तर असेलच पण महापालिकेच्या गेल्या पाच वर्षातील बोगस कारभार, घोटाळे याबाबत होणाऱ्या टीकेवर लोकांना काय सांगायचे हा देखील प्रश्‍न असेल. 

पालिकेतील राष्ट्रवादी शहर जिल्हाध्यक्ष संजय बजाज आणि सांगलीचे शहर जिल्हाध्यक्ष कमलाकर पाटील यांच्यातील गटबाजीने ग्रासली आहे. एकहाती आणि एकमुखी वर्चस्व गाजवण्याची सवय असलेल्या माजी मंत्री जयंत पाटील यांच्यासाठी सध्या पालिकेतील पक्षामधील गटबाजी मोठी डोकेदुखी झाली आहे. आजवर जिल्ह्यातील भाजपला त्यांचे थेट किंवा अप्रत्यक्ष बळ असायचे. मात्र आता पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले आहे. आर.आर.पाटील यांच्या निधनानंतर जिल्ह्यातील राष्ट्रवादी आणखी दुबळी झाली आहे. भाजपमध्ये झालेला भरणा राष्ट्रवादीतूनच झाला आहे. त्यामुळे सांगलीसह जिल्हाभरात राष्ट्रवादीची नव्याने उभारणी करणे जयंत पाटील यांच्यासमोरचे आव्हान आहे. 

प्रस्थापित पक्षांबरोबरच आम आदमी पार्टी आणि स्थानिक संघटन असलेल्या जिल्हा सुधार समितीने युती करून निवडणूक लढवण्याचा इरादा जाहीर केला आहे. चौकटीबाहेरचे नवे कोरे चेहरे ही त्यांची जमेची आणि वजाबाकीचीही बाजू आहे. पुरोगामी चळवळीचा वारसा असलेल्या ऍड अमित शिंदे या धडपड्या युवकाने ही मोट बांधण्यासाठी पुढाकार घेतला आहे. एकूण महापालिकेची निवडणूक यावेळी बहुरंगी आणि बहुआयामी असेल हे नक्की. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com