sangli bjp success analysis | Sarkarnama

#SangliResult कमळ फुलले, मात्र मोदी लाटेतले खासदार कोमेजले! 

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 3 ऑगस्ट 2018

महापालिकेच्या निवडणुकीत भाजपने स्पष्ट बहुमत मिळवत पहिल्यांदा महापालिकेत कमळ फुलवले असले तरी खासदार संजयकाका पाटील यांचे नातेवाईक पराभूत झाले आहेत. प्रभाग पंधराचा निकाल संजयकांसाठी धक्‍कादायक ठरला. त्यांचे मामेभाऊ रणजीत सावर्डेकर पराभूत झाले. हे घराणे सांगलीतील प्रतिष्ठित असून भारतभीम जोतीरामदादा पाटील यांच्या नातसून सोनल पराभूत झाल्या. 

सांगली : महापालिकेच्या निवडणुकीत भाजपने स्पष्ट बहुमत मिळवत पहिल्यांदा महापालिकेत कमळ फुलवले असले तरी खासदार संजयकाका पाटील यांचे नातेवाईक पराभूत झाले आहेत. प्रभाग पंधराचा निकाल संजयकांसाठी धक्‍कादायक ठरला. त्यांचे मामेभाऊ रणजीत सावर्डेकर पराभूत झाले. हे घराणे सांगलीतील प्रतिष्ठित असून भारतभीम जोतीरामदादा पाटील यांच्या नातसून सोनल पराभूत झाल्या. 

संजय पाटील यांच्यासाठी प्रतिष्ठेचा हा प्रभाग होता. इथे युवक कॉंग्रेसचे शहराध्यक्ष मंगेश चव्हाण, फारुक पठाण यांनी खासदारांना धक्का देत कॉंग्रेसला इथे एकहाती यश मिळवून दिले. खासदारांनी या प्रभागात पंधरा दिवस तळ ठोकला होता. प्रामुख्याने लोकसभेला संजयकाकांनी जो विजय मिळवला होता तो ऐतिहासिक होता. कारण त्यांचे मताधिक्‍य अडीच लाखाच्या घरात होते. यातील महापालिकाक्षेत्रातील वाटा 42 टक्‍के इतका होता. त्याच शहरात त्यांनी आपलेच नातेवाईक आणि त्यांचे वर्चस्व असलेल्या गल्यांमध्ये मोठा पराभव सहन करावा लागला आहे. 

संजयकाकांचे विरोधक नेहमीच मोदी लाटेत स्वार झालेले खासदार अशी टीका त्यांच्यावर करत असतात. महापालिकाक्षेत्रात कॉंग्रेसने आपला गड राखण्यासाठी राष्ट्रवादीच्या मदतीने आघाडी करूनही त्यांना भाजपचा विजय रथ रोखता आले नाही, ही जमेची बाजू असली तरी चंद्रकांतदादांनी महापालिका निवडणुकीची धुरा आमदार सुधीर गाडगीळ सांभाळतील असे जाहीर केले होते त्यामुळे खासदार संजयकाका नाराज असल्याची चार्चा होती. मात्र त्यानंतर संजयकाकांना कृष्णाखोरे महामंडळाचे उपाध्यक्ष करण्यात आले. अर्थात या निवडणुकीत संजयकाका प्रचारात तसे अपवादात्मक दिसले. त्यांच्या मागणीनुसार प्रभाग 15 मध्ये उमेदवारी देण्यात आली होती. तेथे ते प्रचारात लक्ष घालत होते. पण येथील चारही नगरसेवक पराभूत झाले. त्यामुळे खासदार व आमदारांची तोंडे एकमेकाविरोधात होती, अशा चर्चाही होत्या. 

निवडणुकपूर्व मुख्यमंत्र्यांसमवेत एक मेळावा येथे होणार होता तो देखील रद्द झाला. ऐन प्रचारात मराठा आरक्षण आंदोलकांनी सभा उधळण्याचा इशारा दिल्याने येथे इच्छा असूनही मुख्यमंत्री सभा घेवू शकले नाहीत. भाजपच्या सर्वच सभांना नेते आणि कार्यकर्ते अशीच उपस्थिती होती. कॉंग्रेसचे महापलिकेत अनेक घोटाळे असतानाही त्यावर न खासदार बोलले ना आमदार बोलले. राज्याचे नगरविकास खाते असताना कारभाराची चौकशी करण्याचेही धाडस कोणीच दाखविली नाही. भाजप जिंकला तरी खासदारांचे मामेभाऊ हारले. 
 

संबंधित लेख