sangita thombare and gauri festival | Sarkarnama

...आणि गौरीपुढच्या सजावटीसाठी त्यांनी गाडी थांबवून केली खेळण्याची खरेदी

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 14 सप्टेंबर 2018

उत्सवप्रिय असणाऱ्या आमदार संगीता ठोंबरे गृहिणी म्हणून महालक्ष्मी, गणेशोत्सव, रक्षाबंधन, महालक्ष्मी पूजन असे विविध पारंपरिक पद्धतीने साजरे करतात. 

बीड : महालक्ष्मी अर्थात गौरी आगमनाची सर्वत्र जोरदार तयारी सूरु आहे. सणासाठी लागणाऱ्या वस्तू खरेदी करण्याची सध्या महिलांमध्ये लगबग सुरु आहे. आमदार संगीता ठोंबरे यांनीही आपल्या कामकाजाच्या प्रचंड घाईतही खरेदी केली. 

गौरींचे आगमन शनिवारी होत आहे. गृहिणींसाठी हा सर्वात आनंदाचा सण आहे. सणाच्या निमित्त लागणाऱ्या वस्तूंच्या खरेदीसाठी सध्या महिलांच्या गर्दीने बाजारपेठ फुलून गेल्या आहेत. गौरींसमोर आकर्षक आरास करण्यासाठी महिला वर्ग वस्तू जुळविण्यात आणि खरेदी करण्यात दंग आहेत. गृहिणी म्हणून उत्सवप्रिय असणाऱ्या आमदार संगीता ठोंबरे देखील महालक्ष्मीच्या सणाच्या तयारीला लागल्याचे शुक्रवारी दिसले. 

एका आंदोलनातील सहभागासाठी त्या बीडला येत होत्या. बिंदुसरा नदी पुलाजवळ आरास सजावटीच्या वस्तू मांडलेल्या त्यांना दिसले. चालकाला त्यांनी अचानक गाडी थांबवायला सांगितले. इथे कुठले कार्यालय नाही, जिथे जायचे ते ठिकाण पुढे असल्याने थांबायची सूचना का, अशा गोंधळात हा चालक पडला. "अरे इथे मातीची सुंदर खेळणी आहेत, मला खरेदी करायची आहेत" असे सांगून गाडी थांबवली. रस्त्यावर मांडलेल्या दुकानातून त्यांनी मातीपासून बनविलेले आणि सुंदर रंगरंगोटी केलेले पोपट, कबुतर, हत्ती, बाहुल्या खरेदी केल्या. आता त्यांच्या लक्ष्मी समोरील आरास कसा दिसतो ते पहावे लागणार आहे. 
 

संबंधित लेख