Sangharsh Yatra begins tomorrow | Sarkarnama

शेतकरी कर्जमाफीसाठी संघर्ष यात्रेचा दुसरा टप्पा उद्यापासून 

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 14 एप्रिल 2017

शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी मिळेपर्यंत लढा सुरूच ठेवण्याचा निर्धार राज्यातील सर्व विरोधी पक्षांनी केला असून संघर्ष यात्रेचा दुसरा टप्पा उद्या शनिवार वऱ्हाडातील राजमाता जिजाऊ यांचे जन्मस्थळ सिंदखेड राजा येथून सुरू होत आहे.

अकोला : शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी मिळेपर्यंत लढा सुरूच ठेवण्याचा निर्धार राज्यातील सर्व विरोधी पक्षांनी केला असून संघर्ष यात्रेचा दुसरा टप्पा उद्या शनिवार वऱ्हाडातील राजमाता जिजाऊ यांचे जन्मस्थळ सिंदखेड राजा येथून सुरू होत आहे. या यात्रेत राज्यातील कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस, शेकापसह सर्वच विरोधी पक्षातील दिग्गज नेत्यांची उपस्थिती राहणार असल्याची माहिती महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटीचे प्रवक्ते डॉ. सुधीर ढोणे यांनी दिली आहे. 

अर्थसंकल्प सादर होत असताना विरोधी पक्षांच्या सदस्यांनी कर्जमाफीच्या घोषणा दिल्यामुळे विरोधी पक्षाच्या आमदारांना निलंबित करण्यात आले होते. तेव्हापासून विरोधी पक्षांच्या सदस्यांनी सभागृहातील कामकाजावर विधानसभेत बहिष्कार घातला होता. सरकार सभागृहात न्याय देत नसल्यामुळे हा प्रश्न जनतेच्या न्यायालयातच मांडायचा निर्णय घेऊन चांदा ते बांदा अशी संघर्ष यात्रा काढण्यात आली होती. संघर्ष यात्रेचा दुसरा टप्पा शनिवारपासून सुरू होत आहे. ही यात्रा बुलडाणा, जळगाव, धुळे, नंदुरबार, नाशिक आणि पालघर जिल्ह्यांतून जाणार असल्याचे डॉ. सुधीर ढोणे यांनी सांगितले. 

संघर्ष यात्रेचा कार्यक्रम 
शनिवार : सिंदखेड राजा, जि. बुलडाणा येथे राजमाता जिजाऊ यांच्या जन्मस्थळास भेट व जाहीर सभा. त्यानंतर चिखलीमार्गे बुलढाणाकडे प्रयाण आणि बुलडाणा येथे जाहीर सभा. बुलडाणा येथून मुक्ताईनगर जि. जळगावकडे प्रयाण. वरणगाव येथे जाहीर सभा व जळगाव येथे मुक्काम. 

रविवार : जळगाव येथून मोटारीने एरंडोलकडे प्रयाण. पारोळा येथे जाहीर सभा. पाळोरा येथून मोटारीने अमळनेर-बेटावद मार्गे शिरपूरकडे प्रयाण. अमळनेर, बेटावद व नरडाना येथे आगमन व स्वागत. दुपारी शिरपूर जि. धुळे येथे आगमन. दुपारी शिरपूर येथून मोटारीने शहादा जि. नंदुरबारकडे प्रयाण. नंदुरबार येथे जाहीर सभा. नंदुरबार येथून साक्रीमार्गे धुळेकडे प्रयाण. सायं. शेवाळी फाटा येथे आगमन व स्वागत. सायंकाळी धुळे येथे जाहीर सभा व मुक्काम. 

सोमवारी : सकाळी धुळे येथून मोटारीने मालेगाव जि. नाशिककडे व मालेगाव येथे जाहीर सभा. दुपारी नामपूर ता. बागलण येथे आगमन. सटाणा येथे जाहीर सभा. त्यानंतर देवळा येथे आगमन. पिपळगाव बसवत येथे जाहीर सभा. सायंकाळी आडगाव येथे शेतकऱ्यांसमवेत चर्चा करून पुढील येथे मुक्काम असेल. 

मंगळवारी : काळाराम मंदिरास भेट तर दुपारी घोटी येथे जाहीर सभा. मोटारीने शहापूरकडे प्रयाण. सायंकाळी ठाणे येथे प्रयाण करणार आहे. 

संबंधित लेख