congress-yatra
congress-yatra

शिवसेना ढोंगी : विखे पाटील 

शेतकरी कर्जमाफीसाठी शिवसेनेने दाखविलेला कळवळा शेवटी ढोंगी सिद्ध झाला आहे. कर्जमाफी मिळेपर्यंत शिवसेना एनडीएच्या सर्व कार्यक्रमांवर बहिष्कार टाकेल, अशी अपेक्षा होती. परंतु, त्याऐवजी उद्धव ठाकरे पंतप्रधानांसोबत स्नेहभोजन घेताना दिसून आल्याने मोदींचे मीठ खाऊन शिवसेनेने कर्जमाफीच्या मागणीला "जय महाराष्ट्र' केल्याचे दिसून येते, अशी घणाघाती टीका विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली आहे.

अकोला : शेतकरी कर्जमाफीसाठी शिवसेनेने दाखविलेला कळवळा शेवटी ढोंगी सिद्ध झाला आहे. कर्जमाफी मिळेपर्यंत शिवसेना एनडीएच्या सर्व कार्यक्रमांवर बहिष्कार टाकेल, अशी अपेक्षा होती. परंतु, त्याऐवजी उद्धव ठाकरे पंतप्रधानांसोबत स्नेहभोजन घेताना दिसून आल्याने मोदींचे मीठ खाऊन शिवसेनेने कर्जमाफीच्या मागणीला "जय महाराष्ट्र' केल्याचे दिसून येते, अशी घणाघाती टीका विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली आहे. 

बुलडाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा येथे शेतकरी कर्जमाफीच्या मागणीसाठी राज्यातील विरोधी पक्षांनी काढलेल्या संयुक्त संघर्ष यात्रेच्या दुसऱ्या टप्प्याचा प्रारंभ करताना ते बोलत होते. दुसऱ्या संघर्ष यात्रेची सुरवात होण्यापूर्वी विरोधी पक्षातील सर्व प्रमुख नेत्यांनी राजमाता जिजाबाईंच्या जन्मस्थळावर जाऊन आशीर्वाद घेतले. त्यानंतर नजीकच्या एका मैदानावर शेतकऱ्यांच्या विशाल समुदायाला संबोधित करताना विखे पाटील यांनी सरकारवर चौफेर हल्ला चढवला. याप्रसंगी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, ज्येष्ठ कॉंग्रेस नेते रोहिदास पाटील, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे गटनेते माजी मंत्री आ. जयंत पाटील, पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष आ.प्रा. जोगेंद्र कवाडे, समाजवादी पक्षाचे नेते आ. अबू असीम आझमी आदी उपस्थित होते. 

रयतेचे कल्याण हेच पहिले कर्तव्य, असे संस्कार देऊन शिवाजी महाराजांना घडविणाऱ्या जिजाऊंना वंदन करून विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी भाषणाची सुरवात केली. त्यानंतर अनेक ताज्या घटना व घडामोडींचा संदर्भ देत त्यांनी राज्य सरकारवर हल्लाबोल केला. शेतकरी पित्याकडे लग्नाला पैसा नाही म्हणून लातूर जिल्ह्याच्या भिसे वाघोली या गावातील 21 वर्षीय तरुणीने आत्महत्या करण्याच्या घटनेसाठी त्यांनी सरकारला जाब विचारला. रोज 9-10 शेतकरी आत्महत्या करीत आहेत, त्यांची मुले-बाळेही विहिरीत उड्या घेत आहेत. तरीही राज्याच्या मुर्दाड सरकारला जाग येत नाही, या इतके दुसरे दुर्दैव काय असू शकते?अशी संतप्त विचारणा त्यांनी केली. 

भाजप-शिवसेनेने सरकारने प्रत्येक कामाचा इव्हेंट केला आहे. सरकारचे निर्णय, घोषणा, कारभार आदी सर्व बाबी इव्हेंट मॅनेजमेंटने सुरू आहेत. भाजपचा सहकारी असलेल्या शिवसेनेने तर आपल्या विदुषकी चाळ्यांनी राज्याचे मनोरंजन सुरू केले आहे. कधी ते कर्जमाफीच्या मुद्यावर बहिष्कार टाकतात, मध्येच दिल्लीला जाऊन जेटलींना भेटून येतात, नंतर अर्थसंकल्पाच्या कामकाजात सहभागी होतात, कर्जमाफी विसरून मंत्रिमंडळ फेरबदलांमध्ये मश्‍गूल होतात, नंतर पुन्हा मंत्र्यांना घाबरून फेरबदल थांबवतात, पंतप्रधानांसोबत बैठकीसाठी दिल्लीला जातात, कधी मोदींना शिव्या देतात तर कधी "मेरे नरेंद्र भाई' म्हणत त्यांच्याशी भाऊबंदकी जोडतात. अशी परस्परविरोधी भूमिका घेत शिवसेनेने महाराष्ट्रात लोकप्रिय असलेल्या "चला हवा येऊ द्या' कार्यक्रमालाही मनोरंजनात मागे टाकल्याची बोचरी टीका विखे पाटील यांनी केली. 

गेल्याच आठवड्यात अभिनयाचे राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाले.ती बातमी वाचून मला वाटले की,भाजप आणि शिवसेनेने भांडणाची जी नौटंकी केली होती, शेतकरी आणि सर्वसामान्यांप्रती कमालीचा कळवळा असल्याचा जो अभिनय केला होता, त्यासाठी देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांना उत्कृष्ट अभिनयाचा राष्ट्रीय पुरस्कारच दिला पाहिजे, असा घणाघात राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला. 

मुंबई महापालिकेतील दोन्ही पक्षांनी एकमेकांची औकात काढली. गावगुंड देतात तशा पाहून घेण्याच्या धमक्‍या दिल्या. पुढे काय झाले? कर्जमाफीसाठी शिवसेनेचे मंत्री राजीनामे खिशात घेऊन फिरत होते. मुंबईचे महापौर पद मिळाले अन्‌ राजीनामे कचऱ्याच्या पेटीत गेले. आपल्या खासदाराला विमानात बसता यावे म्हणून शिवसेनेने संसदेत गोंधळ घातला. शिवसेनेच्या मंत्र्यांनी भाजपच्या विमान वाहतूक मंत्र्याची कॉलर पकडल्याचे वर्तमानपत्रात छापून आले. पण याच शिवसेनेने कर्जमाफीसंदर्भात महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची फसवणूक केल्याच्या विरोधात केंद्रातील अर्थमंत्र्यांची किंवा कृषिमंत्र्यांची कॉलर पकडल्याचे कोणी कधी ऐकले आहे का? 

राज्यभरात सध्या कर्जमाफीचा, शेतमालाच्या भावाचा, खरेदी केंद्रांचा प्रश्न पेटला आहे.पण युती सरकारची जनतेत जाऊन बोलायची हिंमत राहिलेली नाही. हे फक्त टीव्हीवरून "मन की बात' करतात. आता मुख्यमंत्र्यांनीही "मुख्यमंत्री बोलतोय' म्हणून कार्यक्रम सुरू केला आहे. या नौटंकीबाज सरकारने इव्हेंट बंद करून रयतेचे कल्याण, शेतकऱ्यांचे हित केंद्रस्थानी ठेवून राज्य कारभार करणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श स्वीकारला पाहिजे. अन्यथा शेतकरी तुम्हाला माफ करणार नाहीत, असा सज्जड इशारा विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिला. 

दरम्यान, सिंदखेड राजावरून बुलडाणाकडे जाताना चिखली येथे शेतकऱ्यांनी संघर्ष यात्रेचे प्रचंड मोठे स्वागत केले. बाइकस्वारांनी प्रमुख नेत्यांसह शहरातून रॅली काढली. या वेळी संघर्ष यात्रेतील सर्व नेते व आमदार ट्रॅक्‍टर-ट्रॉलीवर आरूढ झाले होते. बुलडाणा येथेही शेतकऱ्यांची विशाल सभा झाली. मुख्य रस्त्यापासून सभास्थळापर्यंत सर्व नेते बैलगाडीवर बसून गेले. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com