sangali-sadhabhau-khot-jayant-patil | Sarkarnama

महाराष्ट्र लुटणाऱ्यांची झोळी रिकामी कशी? :  सदाभाऊ खोत

सरकारनामा ब्युरो
रविवार, 29 जुलै 2018

महापालिकेची निवडणूक धनशक्ती विरुद्ध जनशक्ती अशीच आहे. निवडणुकीत जनतेसाठी झोळी घेऊन आलो असे सांगणाऱ्यांची झोळी एवढी मोठी आहे, की महाराष्ट्र लुटला तरी ती भरली नाही, अशा शब्दांत कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचे नाव न घेता टीका केली. 

सांगली : महापालिकेची निवडणूक धनशक्ती विरुद्ध जनशक्ती अशीच आहे. निवडणुकीत जनतेसाठी झोळी घेऊन आलो असे सांगणाऱ्यांची झोळी एवढी मोठी आहे, की महाराष्ट्र लुटला तरी ती भरली नाही, अशा शब्दांत कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचे नाव न घेता टीका केली. 

विश्रामबाग येथील स्फूर्ती चौकात भाजप उमेदवारांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत ते बोलत होते. आमदार शिवाजीराव नाईक, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष वैभव शिंदे, सुधीर पाटील आदींची प्रमुख उपस्थिती होती.

श्री. खोत म्हणाले, "महापालिकेत गेली अनेक वर्षे सत्तेत राहून सत्ताधारी मंडळी पुन्हा सेवा करण्याची संधी मागत आहेत. त्यांनी जर येथे सेवा केली नसेल तर त्यांना काशी यात्रेला पाठवावे लागेल. त्यांनी आता तिकडे जाऊन सेवा करावी. शेरीनाला प्रश्‍न गेली काही वर्षे सोडवता आला नाही. त्यांनी नागपूरला भेट देऊन विकास बघावा. नसेल तर इस्त्राईलला भेट देऊन तिथल्या सांडपाणी प्रकल्पाची पाहणी करावी. शेरीनाल्याचे पाणी शेतीला दिले असते तर शेतकऱ्यांचा आशीर्वाद मिळाला असता. नागरिकांनाही पाणी मिळाले असते.''
 
ते पुढे म्हणाले, "सांगली ऐतिहासिक व शैक्षणिक शहर आहे. ग्रामीण भागातून इथे येणारे विद्यार्थी सुरक्षित नाहीत. गुंडागर्दीने थैमान घातले आहे. जनता पोलिसाच्या दारात न जाता गुंडाच्या दारात जाते. त्यामुळे भयमुक्त शहर करण्याची गरज आहे. शहराचा चेहरा मोहरा बदलायचा असेल तर भाजपच्या हातात सत्ता दिली पाहिजे. निवडणुकीत काहीजण झोळी घेऊन आलेत. परंतु त्यांनी अख्खा महाराष्ट्र लुटला तरी झोळी भरली नाही. साखर कारखाने, बॅंका, सूतगिरण्या खाल्या. माती मुरूमही खाल्ला. इंग्रजाच्या काळातील रस्ते अजून काही ठिकाणी आहेत. परंतु त्यांनी केलेले डांबरी रस्ते दीड वर्षात उखडले. डांबरसुद्धा त्यांनी खाल्ले. एवढी मोठी त्यांची झोळी आहे.''

संबंधित लेख