शरद पवारांची तारीख भेटली आणि संदीप क्षीरसागर समर्थकांच्या उत्साहाला उधाण आले

आगामी विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसची उमेदवारी संदीप क्षीरसागर यांना भेटावी यासाठी पक्षातील काही नेते जोर लावत आहेत. शरद पवारांचा होऊ घातलेल्या दौऱ्यात उमेदवारीचे चित्र स्पष्ट होईल असा त्यांचा समर्थकांचा अंदाज आहे. शरद पवार हे ३० सप्टेंबर रोजी बीडमध्ये मुक्कामाला येणार आहेत. एक आॅक्टोबरला मेळावा होणार आहे.
शरद पवारांची तारीख भेटली आणि संदीप क्षीरसागर समर्थकांच्या उत्साहाला उधाण आले

बीड : विधानसभा निवडणुकीत बीड मतदार घातून उमेदवारी कोणाला या चर्चेला आता आणखीच उधाण आले आहे. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची तारीख मिळाल्याने संदीप क्षीरसागर समर्थकांच्या आशा अधिकच उंचावल्या असून त्यांच्या उत्साहाला उधाण आले आहे. 

क्षीरसागरांच्या घरात मागच्या दोन वर्षांपासून  ‘काका विरुद्ध पुतणे’ असा राजकीय संघर्ष सुरु आहे. नगर पालिका व जिल्हा परिषद निवडणुकांत दोघांचे समर्थक आमने - सामने उभारले. दोघांनीही एकमेकांविरोधात आरोप - प्रत्यारोपांच्या तोफा डागल्या. या दोन्ही निवडणुकांत जयदत्त क्षीरसागर समर्थकांना राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे सिम्बॉल मिळाला. तर, संदीप क्षीरसागर यांनी ‘काकू - नाना आघाडी’ची स्थापना करुन समर्थकांना निवडणुक मैदानात उतरविले. या निवडणुकांत दोघांनीही आपापल्या राजकीय ताकदीसह राजकीय कौशल्यही दाखवून दिले.

त्यानंतर आमदार जयदत्त क्षीरसागर हे राष्ट्रवादी काँग्रेसचे विधिमंडळात उपनेते आणि आता पुन्हा त्यांना पक्षाचे प्रदेउपाध्यक्षपद मिळाले आहे. तर, संदीप क्षीरसागर राष्ट्रवादीचे नेते असले तरी काकू - नाना आघाडीचे नेतृत्व करतात. त्यामुळे मागच्या वर्षभरापासून विधानसभा निवडणुकीची तयारी दोघांकडून सुरु असली तरी उमेदवार कोण असा प्रश्न आहे.

विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, प्रदेश सरचिटणीस अमरसिंह पंडित आणि उपाध्यक्ष प्रकाश सोळंके यांच्याकडून संदीप क्षीरसागर यांना बळ दिले जात आहे. पक्षाची उमेदवारी संदीप क्षीरसागर यांना भेटावी यासाठीही जोर लावला जात आहे. अगदी निवडणुकीत प्रतिस्पर्ध्याच्या तुलनेत आर्थिक कुवतही आम्ही पुरवू असे ही मंडळी खासगीत सांगत असते.

दरम्यान, गेल्या वर्षी अजित पवार आणि तत्कालिन प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या उपस्थित झालेल्या दोन कार्यक्रमांत संदीप क्षीरसागर यांचाच बोलबाला राहीला. आता महिनाअखेर शरद पवार यांचा दौरा निश्चित झाला आहे. जयदत्त क्षीरसागर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन त्यांच्या गणपतीची आरती केल्यानंतर या दौऱ्याची घोषणा होणे आणि दौऱ्याची माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत आमदार जयदत्त क्षीरसागर नसणे या गोष्टी बरेच काही सांगून जातात. त्यामुळे दौऱ्याच्या नियोजनात धनंजय मुंडे, अमरसिंह पंडित आणि प्रकाश सोळंके यांची छाप असणार हे निश्चित आहे.

पवारांचा बीड मुक्काम, संदीप क्षीरसागर यांच्या दवाखान्याचे उद॒घाटन आणि बीडमध्ये राष्ट्रवादीचा विजयी संकल्प मेळावा असे दौऱ्याचे स्वरुप आहे. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत बीडमधून पक्षाच्या उमेदवारीसाठी मुंडे, पंडित व सोळंके यांच्याकडून संदीप क्षीरसागर यांचे प्रमोशन केले जाणार हेही निश्चित आहे. त्यातच संदीप क्षीरसागर यांच्या दवाखाना उद॒घाटनासाठी शरद पवारांनी वेळ तर दिलीच शिवाय यासाठी पवार बीडमध्ये मुक्काम ठोकणार असल्याने संदीप क्षीरसागर यांच्यावर पवारांची मेहनजर असल्याचा अंदाज त्यांचे समर्थक बांधत आहेत. तरीही पवार काही सुतोवाच करतात कि पुन्हा नेहमीच्या शैलीत भिजत घोंगडे ठेवतात हे पाहणे औत्सुक्याचे असणार आहे.

सध्या जिल्हा दौऱ्यावर पक्षांतर्गत क्षीरसागर विरोधकांची छाप असल्याने संदीप क्षीरसागर यांचा बोलबाला राहणार हे निश्चित आहे. तरीही दौरा आणखी पंधरवाड्यावर असल्याने आणखी काय काय घडमोडी घडतात तेही महत्वाचे आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com