sandeep kshirsagar in beed | Sarkarnama


ब्रेकिंग न्यूज

नगरमध्ये दुपारी तीन वाजेपर्यंत 45 % मतदान
सातारा सातारा लोकसभा मतदारसंघ ३ वाजेपर्यंत ४३ .१४ टक्के मतदान
औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात दुपारी तीन वाजेपर्यंत 45 टक्के मतदान
रावेर लोकसभा मतदार संघात 3 वाजेपर्यंत 38.12% मतदान
जळगाव लोकसभा मतदार संघात 3 वाजेपर्यंत 37.24% मतदान
रायगड मध्ये तीन वाजेपर्यंत 38.46 टक्के मतदान
बारामतीत ३ वाजेपर्यंत ४१.७५ टक्के मतदान
पुण्यात ३ वाजेपर्यंत ३३.०४ टक्के मतदान
रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघात 3 वाजेपर्यंत झालेले मतदान 45.10 टक्के

विधानसभेसाठी संदीप क्षीरसागरांची जोरदार तयारी

दत्ता देशमुख
शनिवार, 14 ऑक्टोबर 2017

जिल्ह्यातील बदलती राजकीय समीकरणे आणि जयदत्त क्षीरसागर यांना पक्षांतर्गत होणारा विरोध पाहता संदीप क्षीरसागर यांच्यासाठी मुंडे, पंडीत शक्ती पणाला लावतील असे बोलले जाते. जिल्हा संघटनेत संदीप क्षीरसागर यांना मिळणारा मान, सन्मान पाहता वारे उलट्या दिशेने वहायला सुरुवात झाल्याचे प्रथम दर्शनी तरी दिसते.

बीड : नगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि ग्रामपंचायत निवडणुकीत आपले काका आणि राष्ट्रवादीचे नेते जयदत्त क्षीरसागर यांना कडवे आव्हान दिल्यानंतर संदीप क्षीरसागर यांनी विधानसभेचा गड सर करण्याची तयारी सुरु केली आहे. जिल्ह्याच्या राजकारणातील बडे प्रस्थ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या क्षीरसागर घराण्यामध्ये मोठा संघर्ष होण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी काका जयदत्त क्षीरसागर यांच्याशीच दोन हात करण्यास संदीप क्षीरसागर सज्ज झाल्याची चर्चा शहरात सुरु झाली आहे. 

दिवंगत माजी खासदार केशरबाई क्षीरसागर यांचे नातू असलेले संदीप क्षीरसागर उच्चशिक्षीत आहेत. पंचायत समिती व जिल्हा परिषदेचे प्रत्येकी पाच वर्ष सभापती म्हणून त्यांनी काम केले आहे. राजकारणातील खाचखळगे अनुभवल्यानंतर संदीप क्षीरसागरांच्या राजकीय महत्वाकांक्षा फुलल्या आणि पालिका निवडणुकीत त्यांनी नगराध्यक्ष डॉ. भारतभूषण क्षीरसागर आणि आमदार जयदत्त क्षीरसागर या दोन्ही काकांविरुध्द बंड पुकारले. 

जिल्ह्याच्या राजकारणात मुरलेले आणि राज्यात देखील मोठी ओळख असलेल्या काकांविरुध्दच्या बंडाकडे संपुर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले होते. संदीप क्षीरसागरांनी केलेल्या या धाडसाची चर्चा आणि कौतुक राजकीय क्षेत्रात मोठ्या प्रमाणात झाले. शहराबरोबर ग्रामीण भागात युवकांचे संघटन आणि संपर्काचे मजबूत जाळे यामुळे आपल्या बंडाला यशाची किनार चढवण्यात संदीप क्षीरसागरांना यश आले. 

काकू-नाना आघाडीच्या माध्यमातून नगर पालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत त्यांनी चांगले यश मिळवले. नगरपालिकेत सर्वाधिक सदस्यांसह उपाध्यक्ष पदासह सर्व सभापतीपदे त्यांच्या आघाडीकडे खेचण्यात त्यांना यश आले. जिल्हा परिषदेतही आघाडीचे चार सदस्य निवडून आणत आपले नाणे खणखणीत असल्याचे संदीप क्षीरसागर यांनी दाखवून दिले होते. नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीतही बीड मतदारसंघात संदीप क्षीरसागरांनी चांगलीच झेप घेतली. आतापर्यंत झालेल्या निवडणुकांमध्ये काका-पुतणे थेट सामना झाला नसला तरी त्यांचे शिलेदार मात्र एकमेकांना भिडले होते. संदीप क्षीरसागर यांनी याच प्रवासात आगामी विधानसभेची पायाभरणी केल्याचे लपून राहिलेले नाही. 

बीड मतदारसंघातून विधानसभेचा गड सर करायचा म्हटलं तर संदीप क्षीरसागर यांना थेट काका जयदत्त क्षीरसागर यांच्याशीच लढावे लागणार आहे. या शिवाय शिवसंग्रामचे विनायक मेटे यांच्या आव्हानाला देखील त्यांना तोंड द्यावे लागेल. राजकारणातील या दोन मोठ्या आसामींना अस्मान दाखवयाचे झाले तर नगर पालिका, जिल्हा परिषद आणि ग्रामपंचायत निवडणुकीतील उत्साह कायम ठेवण्याचे मोठे आव्हान संदीप क्षीरसागर यांना पेलावे लागणार आहे. 

तरूणाई हीच खरी ताकद 
तरुण संदीप क्षीरसागर यांचा जिल्ह्यात मोठा चाहता वर्ग आहे. त्यात युवकांची संख्या मोठी आहे. या तरुणाईनेच संदीप क्षीरसागर यांना विधानसभेवर पाठवण्याचा विडा उचलला आहे. सोशल मिडियावर त्यांचे समर्थक आतापासूनच त्यांचा भावी आमदार म्हणून उल्लेख करायला लागले आहेत. पण त्यासाठी पक्षनेतृत्वाने जयदत्त क्षीरसागरांना डावलून संदीप क्षीरसागरांना उमेदवारी द्यायला हवी. विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते आणि जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे आणि आमदार अमरसिंह पंडित हे दोघेही संदीप क्षीरसागर यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे आहेत ही त्यांच्यासाठी जमेची बाजू म्हणावी लागेल. 

काकांच्याऐवजी पुतण्याला उमेदवारी मिळवून देण्यासाठी या दोन्ही नेत्यांना पक्षाध्यक्ष शरद पवार, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांचे मन वळवावे लागेल. जिल्ह्यातील बदलती राजकीय समीकरणे आणि जयदत्त क्षीरसागर यांना पक्षांतर्गत होणारा विरोध पाहता संदीप क्षीरसागर यांच्यासाठी मुंडे, पंडीत शक्ती पणाला लावतील असे बोलले जाते. जिल्हा संघटनेत संदीप क्षीरसागर यांना मिळणारा मान, सन्मान पाहता वारे उलट्या दिशेने वहायला सुरुवात झाल्याचे प्रथम दर्शनी तरी दिसते. अजित पवार आणि सुप्रिया सुळेंच्या बीड दौऱ्यात संदीप क्षीरसागरांना पहिल्या रांगेत बसण्याचा मिळालेला मान, पंचायत समिती निवडणुकीत त्यांना अधिकार देणारा पक्षाकडून मिळालेला व्हीप ही बदलत्या राजकारणांची नांदीच म्हणावी लागेल.  

 
 

संबंधित लेख