sanatan sanstha ban issue | Sarkarnama

कागदपत्रे तयार; सनातन संस्थेवर बंदी घालण्याच्या वेगवान हालचाली 

मृणालिनी नानिवडेकर 
गुरुवार, 16 ऑगस्ट 2018

बॉम्बस्फोटांसारखी घातपाती कृत्य करणाऱ्या संस्थेबद्दलचे पुरावे तपास यंत्रणांनी समोर आणणे अतिशय आवश्‍यक आहे. हा तपास वेगाने व्हावा, अशी आमची प्रारंभापासूनची मागणी आहे. पुरावे योग्य रीतीने गोळा झाल्यास तपास यंत्रणा योग्य दिशेने जाऊ शकतील.

- मुक्ता दाभोलकर

(नरेंद्र दाभोलकर यांच्या कन्या) 

मुंबई : नरेंद्र दाभोलकर, गोविंद पानसरे, गौरी लंकेश या विचारवंतांच्या हत्येशी संबंध जोडला जात असलेल्या सनातन संस्थेवर लवकरच बंदी येण्याची दाट शक्‍यता आहे. या संस्थेशी संबंधित कार्यकर्त्यांकडे सापडलेली स्फोटके आदी साहित्य तसेच दहशतवादी घटनांशी जोडला जात असलेला संबंध लक्षात घेता बंदीचा आदेश लवकरच जारी होण्याची शक्‍यता सूत्रांनी वर्तवली. 

नालासोपाऱ्यात वैभव राऊत याच्या घरी सापडलेली स्फोटके, 10 पिस्तुले तसेच उत्तर प्रदेश, आसाम अशा ठिकाणांहून गोळा केलेले साहित्य लक्षात घेता हा देशविरोधी कटाचा प्रकार असल्याचे तपास यंत्रणांचे मत झाले आहे. पोलिस दलातील उच्चपदस्थांनी यासंबंधीची कागदपत्रे तयार केली असून, ती लवकरच केंद्र सरकारकडे पाठवली जाणार आहेत. 

दाभोलकर यांच्या हत्येत "सनातन'चा हात असून, या संघटनेवर बंदी आणा, अशी मागणी दाभोलकर कुटुंबीय सातत्याने करीत आहेत. त्यातच मागील काही दिवसांत सापडलेली स्फोटके तसेच तपासातील गंभीर धागेदोरे पाहून या वेळी प्रथमच अटक झालेल्यांवर "अनलॉफूल ऍक्‍टिव्हिटीज प्रिव्हेन्शन ऍक्‍ट'अंतर्गत गुन्हे नोंदवण्यात आले आहेत. या कायद्यातील कलम 18 अंतर्गत कट रचणे, 20 अंतर्गत दहशतवादी संघटनेचा कार्यकर्ता असणे तसेच दहशतवादी टोळीचा सदस्य असण्याचे गुन्हे नोंदवण्यात आले आहेत. या कलमांची तीव्रता लक्षात घेता संघटनेवर बंदी आणण्याची मागणी उचित ठरू शकेल, असे मत गृहखात्याशी संबंधित एका बड्या अधिकाऱ्याने व्यक्त केले. 

यापूर्वीच्या शिफारसी 
2011 मध्ये तत्कालीन दहशतवादविरोधी पथकाचे प्रमुख राकेश मारिया यांनी सनातनवर बंदीची शिफारस केली होती. त्या फायलीवर ना केंद्र सरकारने कारवाई केली, ना राज्य सरकारने पाठपुरावा. मारिया यांनी 2008 मधील पनवेल, वाशी, ठाण्यातील स्फोटांचा हवाला दिला होता. त्यानंतर दाभोलकर, पानसरे, कलबुर्गी आणि लंकेश यांच्या हत्येशी सनातनचा संबंध जोडला गेल्याने दिवंगत हिमांशू रॉय यांनीही बंदीची मागणी करणारी कागदपत्रे तयार केली होती. ती केंद्राकडे प्रलंबित आहेत. 

 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख