भाजपचा मुका नाकारल्यास पुण्यातील लढाई सेनेसाठी बिकट!

भाजपचा मुका नाकारल्यास पुण्यातील लढाई सेनेसाठी बिकट!

पुणे : भारतीय जनता पार्टीने मुका घेतला तरी त्यांच्याशी शिवसेना युती करणार नाही, अशी भूमिका शिवसेनेचे नेते व खासदार संजय राऊत यांनी जाहीर केली आहे. या पार्श्‍वभूमीवर पुण्यातील आठही विधानसभा मतदारसंघात पक्षाला तयारी करावी लागणार आहे. गेल्यावेळी वडगाव शेरी व कोथरूड वगळता इतर ठिकाणी पक्षाच्या उमेदवारांना लक्षणीय मते मिळाली नाहीत. त्यामुळे स्वतंत्र लढण्याचा निर्णय घेतला तरी प्रत्यक्ष लढाई सोपी नसल्याचे गेल्या वेळचे निकाल सांगत आहेत. 

विधानसभेच्या गेल्या निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची लाट होती. यावेळी तशी परिस्थिती नाही. राज्य व केंद्र सरकारच्या विरोधात जनमत जात आहे, अशी भूमिका शिवसेनेकडून मांडण्यात येत आहे. त्यामुळेच स्वतंत्र लढण्याचा नारा दिला जात आहे. खासदार संजय राऊत यांचे युती न करण्याचे वक्तव्य त्याचाच भाग आहे. मुंबईत स्वतंत्र लढण्याचा शिवसेनेला फायदा होऊ शकतो. मराठवाडा व विदर्भातही गेल्यावेळी चांगला प्रतिसाद मिळाला आहे. मात्र पुण्यातील वस्तुस्थिती काहीशी वेगळी आहे. शहरात पक्षाचे संघटन तितके भक्कम नाही.

नवे शहराध्यक्ष, माजी आमदार चंद्रकांत मोकाटे यांचे संघटना बांधणीचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र तरीही स्वतंत्रपणे निवडणुका लढविल्यानंतर विजयाची खात्री देता येत नाही, अशा मतदारसंघाची संख्या मोठी आहे. गेल्या निवडणुकीत वडगाव शेरी मतदारसंघात सुनील टिंगरे यांनी चांगली लढत दिली होती. अर्थात यात पक्षापेक्षा त्यांचा वैयक्तिक वाटा अधिक होता. आता टिंगरेदेखील सेनेत नाहीत. टिंगरे यांनी महापालिका निवडणुकीआधीच राष्ट्रवादीत प्रवेश करून नगरसेवकपद पुन्हा मिळवले आहे. या भागात टिंगरे यांची ताकद मोठी आहे. भाजपचे उमेदवार जगदीश मुळीक यांच्याकडून केवळ साडेपाच हजार मतांनी ते पराभूत झाले होते. मात्र टिंगरे नसल्याने पक्षाची स्थिती आता बिकट आहे. विरोधातील उमेदवाराशी किमान लढत देऊ शकेल, असा उमेदवारदेखील वडगावशेरीत पक्षाकडे नाही. 

कोथरूड मतदारसंघात विद्यमान शहराध्यक्ष चंद्रकांत मोकाटे यांनी मेधा कुलकर्णी यांच्याशी लढत देत 40 हजार मते मिळविली होती. एकेकाळी शिवसेनेचे हा बालेकिल्ला मानला जात होता. मात्र मतदारसंघांच्या फेररचनेनंतर सेनेचे गणित बिघडले. मात्र युती होती. गेल्या निवडणुकीत युती तुटल्याने मोकाटे यांची पुन्हा आमदार होण्याची संधी हुकली. उर्वरित हडपसर, खडकवासला, शिवाजीनगर, पर्वती, कसबा, कॅन्टोन्मेंट मतदारसंघात शिवसेनेचा मतदार 20 ते 25 हजारांच्या पुढे नाही. यातील काही मतदारसंघात सेनेला सक्षम उमेदवार मिळणेही अवघड आहे. त्यामुळे स्वतंत्र लढून भाजपला अपशकून करण्यापलिकेडे काहीच साध्य होणार नाही. दरम्यान, स्वतंत्र लढण्याची आमची तयारी आहे. पक्ष सांगेल त्या प्रमाणे कार्यवाही करण्यास आम्ही बांधील आहोत, असे पक्षाचे शहराध्यक्ष मोकाटे यांनी सांगितले. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com