samrudhi highway | Sarkarnama

"समृद्धी महामार्गा' विरोधात पुन्हा एल्गार

सरकारनामा ब्युरो
रविवार, 26 मार्च 2017

नाशिक : प्रस्तावित नागपूर- मुंबई समृद्धी महामार्गाविरोधात सिन्नर, इगतपुरी व कोपरगाव तालुक्‍यातील शेतकऱ्यांनी पुन्हा आवाज 
उठवण्यास सुरूवात केली आहे. गेल्या तीन दिवसांपासून सिन्नर व इगतपुरी तालुक्‍यात महामार्गासाठी जमीन मोजणी करण्यास आलेल्या अधिकाऱ्यांना शेतकऱ्यांनी हाकलून लावले असून त्या विरोधात मोर्चे काढून विरोध नोंदविण्यास प्रारंभ केला आहे. इगतपुरीतील मोर्चानंतर आता सिन्नर व कोपरगाव तालुक्‍यात मोर्चे काढून शेतकरी विरोध करणार आहेत. 

नाशिक : प्रस्तावित नागपूर- मुंबई समृद्धी महामार्गाविरोधात सिन्नर, इगतपुरी व कोपरगाव तालुक्‍यातील शेतकऱ्यांनी पुन्हा आवाज 
उठवण्यास सुरूवात केली आहे. गेल्या तीन दिवसांपासून सिन्नर व इगतपुरी तालुक्‍यात महामार्गासाठी जमीन मोजणी करण्यास आलेल्या अधिकाऱ्यांना शेतकऱ्यांनी हाकलून लावले असून त्या विरोधात मोर्चे काढून विरोध नोंदविण्यास प्रारंभ केला आहे. इगतपुरीतील मोर्चानंतर आता सिन्नर व कोपरगाव तालुक्‍यात मोर्चे काढून शेतकरी विरोध करणार आहेत. 

नागपूर- मुंबई या 710 किलोमीटरच्या समृद्धी महामार्गाला सिन्नर, इगतपुरी व कोपरगाव तालुक्‍यातील शेतकऱ्यांनी प्रथमपासूनच विरोध केला आहे. मागील वर्षी जून महिन्यात सिन्नर तालुक्‍यातील गावांमध्ये मोजणीला आलेल्या अधिकाऱ्यांना तेथील शेतकऱ्यांनी पिटाळून लावले होते. सिन्नर व इगतपुरी तालुक्‍यातील नवनगरांसाठी जमीन अधिग्रहीत करण्यास मोठ्याप्रमाणावर विरोध केल्यानंतर शासनाने धोरणात बदल करून त्या नवनगरांसाठी भूसंपादन करण्याचा प्रस्ताव बासनात गुंडाळला. त्या साठी विकासकांकडून जमीन घेण्याचा प्रस्तावही तयार केला. त्यानंतर अधिकाऱ्यांनी सिन्नरच्या पूर्व भागातील दुशिंगवाडी,सायाळे, मऱ्हळ व कोपरगाव तालुक्‍यातील काही गावांमध्ये आम्हाला महामार्गाची हद्द निश्‍चित करू द्या नंतर जमीन द्यायची किंवा नाही, याचा निर्णय तुमच्या हाती आहे. सरकार शेतकऱ्यांवर जमिनीसाठी बळजबरी करणार नाही, असे सांगून महामार्गाची हद्द निश्‍चित केली. दरम्यानच्या काळा विदर्भ, मराठवाड्यात बऱ्याच ठिकाणी समृद्धी महामार्गासाठी भूसंपादनाची प्रक्रिया सुरू झाल्यानंतर सिन्नर, कोपरगाव व इगतपुरी तालुक्‍यातील शेतकऱ्यांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली होती. त्यातच महामार्गाच्या अधिकाऱ्यांनी पुन्हा काही गावांमध्ये मोजणीला प्रारंभ केला. शेतकऱ्यांचा विरोध लक्षात घेऊन त्यांनी पोलिस बळाचा धाक दाखविण्यास सुरूवात केल्याचे शेतकऱ्यांचा विरोध आणखी तिव्र झाला आहे. या मुळेच इगतपुरी तालुक्‍यातील शेतकऱ्यांनी आज तेथील तहसील कार्यालयावर मोर्चा 
काढला. सिन्नर तालुक्‍यातील शेतकरीही 30 मार्चला सिन्नर तहसील कार्यालयावर मोर्चा काढणार आहेत. सिन्नर बसस्थानक ते तहसील कार्यालयावर सकाळी 11ला मोर्चा काढून सरकारच्या दडपशाहीचा निषेध करणार असल्याची माहिती संघर्ष समितीचे शहाजी पवार, शांताराम ढोकणे, राजू देसले, सोमनाथ वाघ आदींनी दिले. 
उद्या जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा 
समृद्धी महामार्गासाठी जमिनीच्या मोजणीला शेतकऱ्यांना तीव्र विरोध असून ते अधिकाऱ्यांना पिटाळून लावत आहेत. तसेच मोर्चे काढून निषेध करीत आहेत. या मुळे शेतकऱ्यांनी त्यांचे म्हणणे मांडण्यासाठी सोमवारी (ता.27) जिल्हाधिकारी कार्यालयात यावे. तेथे जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करावी, असा प्रस्ताव प्रशासनातर्फे ठेवण्यात आला आहे. नाशिक जिल्ह्यातील बाधित शेतकऱ्यांचे प्रतिनिधी जिल्हाधिकारी कार्यालयात जाणार असल्याची माहिती संघर्ष समितीतर्फे यावेळी देण्यात आली. 
 

संबंधित लेख