Samir Bhujbal's Talk with Students in Nashik | Sarkarnama

शिवसेनेच्या 'आदित्य संवाद'ला भुजबळांचे 'बोलू भाऊंशी' ने उत्तर

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 17 एप्रिल 2019

समृद्धी महामार्ग हा नाशिककरांच्या नाही तर नागपूरकरांच्या फायद्याचा असल्याची टीका राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार समीर भुजबळ यांनी केली आहे. महात्मा गांधी विद्या मंदिर संचलित लोकनेते व्यंकटराव हिरे महाविद्यालयात 'बोलू भाऊंशी' या युवकांच्या संवाद कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते. यावेळी मतदारसंघाविषयी विविध स्वरुपाची प्रश्‍नोत्तरे झाली.

नाशिक : समृद्धी महामार्ग हा नाशिककरांच्या नाही तर नागपूरकरांच्या फायद्याचा असल्याची टीका राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार समीर भुजबळ यांनी केली आहे. महात्मा गांधी विद्या मंदिर संचलित लोकनेते व्यंकटराव हिरे महाविद्यालयात 'बोलू भाऊंशी' या युवकांच्या संवाद कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते. यावेळी मतदारसंघाविषयी विविध स्वरुपाची प्रश्‍नोत्तरे झाली.

उन्हामुळे वातावरण तापलेले आहे. त्यामुळे निवडणुकीत राजकीय वातावरण मात्र अद्याप तापलेले नाही. वातावरण तापण्यासाठी सर्वच पक्ष, उमेदवारांची धावपळ आहे. यामध्ये शिवसेनेने प्रारंभी आक्रमक प्रचार करीत युवासेनेचे आदित्य ठाकरे यांचा 'आदित्य संवाद' कार्यक्रम केला. त्याला उत्तर म्हणुन राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार समीर भुजबळ यांनी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांशी 'बोलू भाउंशी' उपक्रम सुरु केला आहे.

कॉंग्रेस आघाडीचे उमेदवार समीर भुजबळ यांनी आज महात्मा गांधी विद्या मंदिर संचलित लोकनेते व्यंकटराव हिरे महाविद्यालयात युवकांशी संवाद साधला. त्यांनी मतदारसंघाच्या प्रगतीपर्वा बाबत आपले व्हिजन विद्यार्थ्यांसमोर मांडले. यावेळी ते म्हणाले की, समृद्धी महामार्ग म्हणजे नाशिकला वाळीत टाकून नागपुरला पुढे नेण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. समृद्धी महामार्गामुळे नाशिक आणि परिसरातील नागरिकांना कुठलाच फायदा मिळणार नसल्याचे चित्र आहे. परिणामी नाशिकचा विकास अधिक खुंटला जाऊ शकतो अशी खंत त्यांनी व्यक्त करून खोडसाळपणा करून नाशिकला मागे टाकून नागपूरला पुढे नेण्याचा सद्याच्या सरकारचा डाव असल्याची टिका त्यांनी यावेळी केली.

विद्यार्थ्यांच्या प्रश्‍नांना उत्तर देतांना ते म्हणाले की, नाशिकचा थांबलेला विकासाचा रथ पुढे नेण्यासाठी, शहराला प्रगतीपथावर नेण्यासाठी पक्षाने मला पुन्हा संधी दिली आहे. त्यासाठी आपण कटीबद्ध आहोत. नाशिकमध्ये आयटीपार्क, विमानसेवा, उद्योग, कृषी टर्मिनल मार्केट, फूड पार्क, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ नाशिक उपकेंद्र यासारखे नाशिकचे रखडलेले अनेक प्रकल्प मार्गी लावण्यात येतील. भविष्याच्या दृष्टीने परिपूर्ण विकास करण्याचा मानस आहे.

यावेळी उपस्थित विद्यार्थ्यांनी रोजगार, प्रदूषण, नाशिक मराठवाडा पाणी प्रश्न, क्रीडा, घरपट्टी पाणी पट्टी वाढ, स्पर्धा परीक्षा केंद्र, विद्यार्थी शिष्यवृत्ती, नाशिक बससेवा, गुन्हेगारी, पुणे विद्यापीठाचे रखडलेले काम, शहर स्वच्छता, औद्योगिक विकास, शेतकरी, पर्यटन, नाशिक पुणे रेल्वे, ट्रेकिंग सेंटर, यासारख्या अनेक प्रश्न विद्यार्थ्यांनी विचारले. त्या प्रश्नांवर समीर भुजबळ यांनी विद्यार्थ्यांशी मुक्तपणे संवाद साधला. संस्थेचे संचालक डॉ.अपूर्व हिरे, कॉंग्रेसचे शहराध्यक्ष शरद आहेर, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष रंजन ठाकरे आदी यावेळी उपस्थित होते.
    

 

संबंधित लेख