sambhajiraje-devendra fadavnis meeting issue | Sarkarnama

#MarathaReservation मुख्यमंत्री संभाजीराजेंना कां बोलावत नाहीत? 

सरकारनामा ब्युरो
शनिवार, 4 ऑगस्ट 2018

राजर्षी शाहू महाराजांचे वंशज आणि भाजपचे राज्यसभा खासदार संभाजीराजे यांनी मराठा आंदोलनाच्या पहिल्या दिवसापासून तोडग्यासाठी पुढाकार घेण्याची तयारी दर्शवली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यासंबंधाने विविध घटकांशी संवाद साधत आहेत, मात्र संभाजीराजेंना अजून चर्चेचे अधिकृत निमंत्रण मिळालेले नाही. 

पुणे: राजर्षी शाहू महाराजांचे वंशज आणि भाजपचे राज्यसभा खासदार संभाजीराजे यांनी मराठा आंदोलनाच्या पहिल्या दिवसापासून तोडग्यासाठी पुढाकार घेण्याची तयारी दर्शवली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यासंबंधाने विविध घटकांशी संवाद साधत आहेत, मात्र संभाजीराजेंना अजून चर्चेचे अधिकृत निमंत्रण मिळालेले नाही. 

औरंगाबादमधील जलसमाधी प्रकरणानंतर मराठा आंदोलन पेटले. त्याचवेळी संभाजीराजे यांनी याप्रश्‍नी नेतृत्व करण्यासाठी, तसेच सरकारशी बोलण्याची तयारी दाखवली होती. मात्र प्रत्यक्षात संभाजीराजेंना अपेक्षित असलेली चर्चा झालेली नाही. गेले काही दिवस महाराष्ट्र पेटतच राहिला. आत्महत्त्यांचे सत्र अजूनही थांबायला तयार नाही. 

महाराष्ट्रात आगडोंब उसळला असताना माजी मुख्यमंत्री आणि भाजप खासदार नारायण राणे यांनी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करुन मार्ग काढण्याचा प्रयत्न झाला. राणे मुख्यमंत्र्यांना भेटल्यानंतर त्यांच्यावर टीका झाली, तरीही त्यांनी पुन्हा चर्चा केली. एका बैठकीला मराठा आंदोलकांचे काही नेते सहभागी होते. मुख्यमंत्र्यांनी कधीही चर्चेस तयार आहे, असे वारंवार म्हटले आहे. मात्र प्रत्यक्षात आंदोलनात असलेले मराठा कार्यकर्ते चर्चेस तयार नाहीत. त्यामुळे कोंडी फुटायला तयार नाही. 

तीन दिवसांपुर्वी मुख्यमंत्र्यांनी मराठा समाजातील प्रतिष्ठित विचारवंतांबरोबर मुंबईत बैठक घेतली. या बैठकीला आ. ह. साळुंखे, सदानंद मोरे, सयाजी शिंदे आदी उपस्थित होते. मात्र संभाजीराजे यांचे वडिल शाहू महाराजांसह कोल्हापुरातील विचारवंतांनी त्या बैठकीला न जाण्याची भूमिका घेतली. यापार्श्‍वभूमीवर संभाजीराजेंनी नोंदवलेले मत महत्त्वाचे आहे. 

खासदार संभाजीराजे आज पुण्यात आहेत. त्यांना काही मराठा संघटनांचे प्रतिनिधी भेटले. तोडगा निघण्यासाठी आपण आग्रही आहे, पण मुख्यमंत्र्यांकडून अजून चर्चेचे निमंत्रण मिळालेले नाही, असे त्यांनी यावेळी झालेल्या चर्चेत सांगितले. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख