Sambhaji Patil Nilangekar's drought tour in the night | Sarkarnama

संभाजी पाटील निलंगेकरांनी अंधारात केली दुष्काळाची पाहणी !

सरकारनामा
शनिवार, 27 ऑक्टोबर 2018

राज्याचे कामगार मंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी शनिवारी वडवणी, माजलगाव तालुक्यात दुष्काळाची पाहणी केली. माजलगाव तालुक्यात त्यांनी अंधारात मोबाईलच्या बॅटरीच्या टॉर्चच्या प्रकाशात पाहणी केली.

माजलगाव (जि. बीड) : राज्याचे कामगार मंत्री संभाजी निलंगेकरांना दुष्काळ दौरा पाहणीसाठी नियोजित वेळेपेक्षा चार तास अधिक वेळ लागल्याने त्यांना अंधारात मोबाईल बॅटरीच्या प्रकाशात दुष्काळाची पाहणी करावी लागली. 

संभाजी पाटील निलंगेकर यांचा दुष्काळ पाहणी दौरा नियोजित होता. पण, त्यांना त्यांना नित्रुड (ता. माजलगाव) येथे पोचण्यसाठी चार तार उशिर लागला. तोपर्यंत अंधार पडला होता. वाहनाच्या खाली उतरताच त्यांचा ताफा रस्त्याच्या कडेला असलेल्या शेतातील कापसाच्या पिकाची पाहणी करण्यासाठी गेला; परंतु अंधारामुळे काहीच दिसत नव्हते.

 त्यामुळे कार्यकर्त्यांनी मोबाईल टॉर्चच्या प्रकाशात त्यांना कपाशीचे जळालेले पिक दाखविले. त्यांनी कापसाच्या पिकाची पाहणी करून पावसाच्या परस्थितीचा आढावा घेतला. पाहणी केल्यानंतर नित्रुड गावातील शेतकऱ्यांनी निलंगेकरांकडे व्यथा मांडल्या. एकाने दोन वर्षांपासून ठिबक सिंचनचे अनुदान मिळाले  नसल्याचे सांगीतले. त्यावर मागील सरकारने २०११ पासून २०१४ पर्यंत अनुदान दिले नाही; ते आपण पूर्ण केले. इतिहासात ऑक्टोबरमध्ये दुष्काळ जाहीर करणारे आपले एकमेव सरकार असल्याचे सांगितले.

जिल्हा तीव्र दुष्काळाने होरपळत आहे. सरासरीच्या निम्माही पाऊस झाला नाही त्यामुळे खरिप पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. परतीचा पाऊस न आल्याने रब्बीच्याही आशा मावळल्या आहेत.

संबंधित लेख