Sales Tax officers call off strike | Sarkarnama

विक्रीकर अधिकाऱ्यांचा  बेमुदत संप तूर्त स्थगित: "जीएसटी'चा मार्ग मोकळा

कैलास रेडीज :  सकाळ न्यूज नेटवर्क 
गुरुवार, 29 जून 2017

ऐतिहासिक घटनेचे साक्षीदार होणार 
विक्रीकर विभागाचे सुमारे 12 हजार अधिकारी आणि कर्मचारी आहेत. राज्यात 45 कार्यालये आहेत. तब्बल 70 ते 80 हजार कोटींचा महसूल विक्रीकर विभागाकडून संकलीत करण्यात येतो. "जीएसटी'ची अंमलबजावणी देशासाठी आणि राज्यासाठी ऐतिहासिक घटना असून अधिकारी संघटना या परिवर्तनात सहभागी होणार आहेत.

मुंबई :  राज्य सरकारचा महसूल गोळा करण्यात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या विक्रीकर विभागातील अधिकारी आणि कर्मचारी संघटनांनी "जीएसटी'च्या पार्श्‍वभूमीवर 1 जुलैपासून पुकारलेल्या बेमुदत संपाला स्थगिती दिली आहे.

वेतनश्रेणी आणि इतर मागण्यांच्या पूर्ततेसाठी सरकारने सकारात्मक प्रतिसाद दिल्यानंतर 31 ऑगस्टपर्यंत संप स्थगित करण्यात आला. त्यामुळे "जीएसटी'च्या अंमलबजावणीचा मार्ग मोकळा झाला आहे. 

"जीएसटी'साठी त्रोटक यंत्रणा, अद्ययावत तंत्रज्ञानाचा अभाव, रिक्‍त पदे तातडीने भरणे, वेतन श्रेणीसंबधीच्या मागण्यांसाठी विक्रीकर अधिकाऱ्यांनी 1 जुलैपासून संपाचा निर्णय घेतला होता. त्या पार्श्‍वभूमीवर बुधवारी (ता. 28) रात्री राजपत्रित अधिकारी महासंघ, वित्त विभागाचे अप्पर मुख्य सचिव आणि विक्रीकर राजपत्रित अधिकारी संघटनेची चर्चा झाली.

मागण्यांबाबत अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून तोडगा काढू, असे आश्‍वासन दिले. त्यासह वेतनश्रेणी, निवड श्रेणी व विभागाच्या पुनर्रचनेला सरकारने सकारात्मक प्रतिसाद दिल्याने संप तूर्तास स्थगित केल्याचे महाराष्ट्र विक्रीकर राजपत्रित अधिकारी संघटनेचे अध्यक्ष विनोद देसाई यांनी "सकाळ'ला सांगितले. 

बैठकीला संघटनेचे सरचिटणीस दशरथ बोरकर, प्रदीम शर्मा, नंदकुमार सोरटे आदी उपस्थित होते. जीएसटी अंलबजावणीत विक्रीकर विभागाला विश्‍वासात न घेतल्याबाबत अधिकारी आणि कर्मचाऱ्यांत सरकारविरोधी नाराजी आहे. जीएसटीचे पुरेसे  प्रशिक्षण देण्याची मागणी संघटनांनी केली आहे. 

---------------------------------------------------------
राज्यातील व्यापाऱ्यांची संख्या निश्‍चित झाल्यानंतर अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या संख्येबाबत अभ्यासपूर्ण आकृतिबंध सादर करून विभागाची पुनर्रचना करण्यास राज्य सरकारने अनुकूलता दर्शवली आहे. वेतनश्रेणीबाबत सरकार सकारात्मक असल्याने संप 31 ऑगस्टपर्यंत स्थगित केला आहे. 
- विनोद देसाई, 
महाराष्ट्र विक्रीकर राजपत्रित अधिकारी संघटना 

-------------------------------------------------
कर्मचाऱ्यांना तातडीने प्रशिक्षण आणि वेतनाबाबत सरकारने सकारात्मकता दाखवली. वेतनासंदर्भातील अडचणी दूर करण्याचे आश्‍वासन सरकारने दिल्यानंतर विक्रीकर कर्मचारी संघटनेने आंदोलन स्थगित केले आहे. 
- सुबोध किर्लोस्कर, सरचिटणीस, 
महाराष्ट्र विक्रीकर कर्मचारी संघटना 

--------------------------------------------------------

 

संबंधित लेख