Sakshana Salgar attacks BJP MLa Ram Kadam | Sarkarnama

मला नाही अब्रू, मी कशाला घाबरू? : सक्षणा सलकर यांची भाजपवर टीका 

सरकारनामा
शुक्रवार, 14 सप्टेंबर 2018

भारतीय जनता पक्षाचे मंत्री, आमदार युवती, महिलांबाबत अत्यंत हीन व बेताल वक्तव्ये जाहीरपणे करत आहेत. आमदार राम कदम यांनी तर दहीहंडी कार्यक्रमात केलेले वक्तव्य कळस गाठणारे आहे.

 -सक्षणा सलकर ,

राष्ट्रवादी काॅंग्रेसच्या युवती सेलच्या प्रदेशाध्यक्षा

नांदेड : " भारतीय जनता पक्षाचे मंत्री, आमदार युवती, महिलांबाबत अत्यंत हीन व बेताल वक्तव्ये जाहीरपणे करत आहेत. आमदार राम कदम यांनी तर दहीहंडी कार्यक्रमात केलेले वक्तव्य कळस गाठणारे आहे. या सर्व प्रकारांबद्दल भाजपच्या वरिष्ठ नेत्यांना काहीही वाटेनासे झाले आहे. त्यांच्याकडून काहीच कार्यवाही होताना दिसून येत नाही. त्यामुळे भाजपची अवस्था एक प्रकारे ‘मला नाही अब्रू...मी कशाला घाबरू’ अशी झाली आहे ,"अशी  टीका राष्ट्रवादी काॅंग्रेसच्या युवती सेलच्या प्रदेशाध्यक्षा सक्षणा सलगर यांनी केली.

युवती सेलच्या माध्यमातून प्रदेशाध्यक्षा सलगर यांनी नुकताच दौरा केला. नांदेड जिल्ह्यातील उमरी येथे ‘युवती व महिलांचे प्रश्न तसेच संघटन’ या विषयावर युवती राष्ट्रवादी कॉँग्रसतर्फे आयोजित युवती मेळाव्यासाठी त्या  शहरात आल्या होत्या. त्यावेळी त्यांनी ‘सकाळ’ कार्यालयाला सदिच्छा भेट देऊन संपादकीय सहकार्यांबरोबर संवाद साधला. नांदेड आवृत्तीचे सहयोगी संपादक दयानंद माने यांनी त्यांचे स्वागत केले. 

युवतींच्या सुरक्षेचा प्रश्न एेरणीवर असताना रक्षणकर्तेच बेताल वक्तव्ये करून महिलांच्या अब्रूचे धिंडवडे काढत असल्याचा आरोप करुन त्या म्हणाल्या की,"  या सरकारवर कुठल्याचाही घटकांचा विश्वास राहिलेला नाही. भाजपाचे आमदार प्रशांत परिचारक म्हणतात की, ‘सैनिक सीमेवर असताना त्यांच्या बायकांना मुले कशी होतात’, जलसंपदा मंत्री गिरीष महाजन म्हणतात ‘दारूच्या बाटल्यांवर सुंदर महिलांचे फोटो टाका’ तर नुकतेच आमदार राम कदम म्हणाले ‘तुम्हाला एखादी मुलगी आवडली तर मला सांगा. तिला उचलून आणून तिच्याशी लग्न लावून देईन’ असे बेताल वक्तव्ये या मंत्र्यांनी केलेले आहेत. "

"विशेष म्हणजे असे असताना देखील भाजपचे वरिष्ठ नेते, मुख्यमंत्री किंवा पक्ष कुठलीच कारवाई करत नाही. उलट शिस्त आणि शिष्टाचाराच्या गोष्टी करतात. खरे म्हणजे महिलांची अब्रू काढणाऱ्यांना शिस्त आणि शिष्टाचार सांगण्याचा अधिकार नाही. त्यांना नैतिकताही नाही या शब्दात   सक्षणा सलगर यांनी संताप व्यक्त केला.

राष्ट्रवादी युवती सेलच्या माध्यमातून युवतींना प्रशिक्षण त्याचबरोबर त्या त्या विभागातील आणि जिल्ह्यातील युवतींच्या माध्यमातून महिलांचे सक्षमीकरण, आरोग्य शिक्षण तसेच लोकशिक्षण आदी उपक्रम राबविण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. यासाठी खासदार सुप्रिया सुळे आग्रही असून आम्हा युवतींची एक प्रशिक्षण कार्यशाळाही त्यांनी नुकतीच घेतली असल्याची माहिती त्यांनी दिली.    
 

संबंधित लेख