sadashiv sapkal joins shivsena at matoshri | Sarkarnama

सदाशिव सपकाळांबरोबर भाजपमधील त्यांचे समर्थकही अडकले शिवबंधनात!

सरकारनामा ब्युरो
शनिवार, 13 ऑक्टोबर 2018

आज साताऱ्यातुन मोठ्या संख्येने शिवसेना पदाधिकारी मातोश्रीवर उपस्थित होते. पण पाटणचे शिवसेनेचे आमदार शंभूराज देसाई मात्र कुठेही दिसले नाहीत.

सातारा : जावलीचे माजी आमदार सदाशिव सपकाळ यांनी आज 'मातोश्री'वर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शिवबंधन बांधून पुन्हा शिवसेनेत प्रवेश केला. 

यावेळी माजी आमदार दगडू सपकाळ, कृष्णा खोरे महामंडळाचे उपाध्यक्ष नितीन बानूगडे पाटील, जिल्हाप्रमुख हर्षद कदम आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.

1995 ला सदाशिव सपकाळ शिवसेनेतून जावळीचेआमदार झाले. यानंतर 1996 मध्ये हिंदुराव नाईक निंबाळकर शिवसेनेतून खासदार झाले. पुढे सेनेची सत्ता गेल्यानंतर या नेत्यांनी शिवसेना सोडून दिली. आज सदाशिव सपकाळ काँग्रेस, भाजप असे पक्ष फिरत फिरत पुन्हा स्वगृही शिवसेनेत दाखल झाले आहेत. 

मातोश्रीवर आज सपकाळ यांचा शिवसेनेत प्रवेश झाला. सोबत काही भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. यामध्ये भाजप जिल्हा उपाध्यक्ष सचिन मोहिते, सातारा बार असोसिएशनचे धीरज घाडगे, सुरेश रुपनवर, भाजप युवा मोर्चाचे उपाध्यक्ष प्रवीण माने, भाजप महिला मोर्चाच्या उपाध्यक्षा स्वाती शेडगे, भाजप किसन मोर्चाचे सागर पवार, भाजप तालुकाध्यक्ष अशोक सोरटे, भाजचे विभाग अध्यक्ष तानाजी चव्हाण यांचा समावेश आहे. 

या प्रवेशासाठी नितीन बानूगडे पाटील, हर्षद कदम, चंद्रकांत जाधव आदींनी प्रयत्न केले.

संबंधित लेख