sadashiv pachpute about shrigonda palika election | Sarkarnama

आजपासून काष्टीत नव्हे, तर श्रीगोंदे शहरात तळ ठोकणार : सदाशिव पाचपुते

संजय आ. काटे  
बुधवार, 24 ऑक्टोबर 2018

अंतीम निर्णय घेताना ज्येष्ठ नेते सदाशिव पाचपुते यांचीच भूमिका महत्त्वाची ठरणार आहे.

श्रीगोंदे (नगर) : श्रीगोंदे नगरपालिकेच्या निवडणुकीचा ज्वर वाढला आहे. भाजपची भाऊगर्दी पाहता उमेदवारी कोणाला मिळणार, हे गुलदस्त्यात आहे. भाजपचा उमेदवार कोण द्यायचा, याचा सर्वाधिकार माजी मंत्री बबनराव पाचपुते व जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष बाबासाहेब भोस यांना राहणार असला, तरी अंतीम निर्णय घेताना ज्येष्ठ नेते सदाशिव पाचपुते यांचीच भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. त्यामुळे ते कोणता उमेदवार देणार, यावर विरोधकांचीही खेळी अवलंबून राहणार आहे.

श्रीगोंदे नगरपालिका आपल्याच ताब्यात घेण्यासाठी जोरदार रस्सीखेच सुरू आहे. भाजपमध्ये इच्छुकांची संख्या पाहता उमेदवारी कोणाला मिळणार, वरिष्ठ नेते इतरांची नाराजी कशी दूर करणार, हे महत्त्वाचे ठरणार आहे.

याबाबत बोलताना भाजपचे नेते सदाशिव पाचपुते म्हणाले, श्रीगोंदे नगर पालिकेच्या माध्यमातून शहरात केलेला विकास दिसत असल्याने आमच्याच पक्षात नगराध्यक्षपदासाठी इच्छुकांची संख्या वाढली आहे. नाराजी वाढण्याचे संकेत असले, तरी आमचे नेते जो उमेदवार देतील, तोच निर्णय अंतिम राहणार आहे. पालिका जिंकण्यासाठी आपण शहरात तळ ठोकणार आहे.  
 
विरोधक पैशाच्या जीवावर राजकारण करणार असले, तरी आम्ही विकासाच्या मुद्यावर निवडणूक लढणार आहोत. जिंकण्यासाठीच आम्ही मैदानात उतरणार असून, आजपासून आपण काष्टीत नव्हे, तर श्रीगोंदे शहरात तळ ठोकणार आहोत, असे भाजपचे नेते सदाशिव पाचपुते यांनी सरकारनामा शी बोलताना सांगितले.  

संबंधित लेख