sadabhu khots new organisation | Sarkarnama

सदाभाऊंच्या संघटनेची घोषणा दसऱ्याला! 

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 17 ऑगस्ट 2017

शेतकऱ्यांचे मन समजून घेऊन निर्णय घेणार आहे. माझ्याकडे आता खूप वेळ आहे. मी व्यक्तिद्वेषाने भरलेलो नाही. मलाच लांब पल्ल्याचं कळतं, असं मी समजत नाही. "स्वाभिमानी'त काम करताना मी अनेक वार स्वतःवर झेलले आहेत. मात्र, नेतृत्वावर कधी शिंतोडे उडू दिले नाहीत. याच संघटनेत काम करताना मला चक्रव्यूहात गोवण्यात आले.

- सदाभाऊ खोत 

कोल्हापूर : स्वाभिमानी शेतकरी संघटनेतून हकालपट्टी केलेले कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी नव्या संघटनेच्या स्थापनेसाठी दसऱ्याचा मुहूर्त निवडला आहे. श्री. खोत यांनीच बुधवारी (ता. 16) शाहूवाडी तालुक्‍याच्या दौऱ्यावेळी याचे संकेत पत्रकारांशी बोलताना दिले. याबाबतची सविस्तर भूमिका आपण लवकरच जाहीर करू, असे सांगतानाच त्यांनी "स्वाभिमानी'चे खासदार राजू शेट्टी यांच्यावर शेलक्‍या शब्दांत त्यांचे नाव न घेता टीका केली. 

श्री. खोत यांची मंत्रीपदी वर्णी लागल्यापासून शेट्टी-खोत अशा छुप्या संघर्षाला सुरूवात झाली. जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत श्री. खोत यांनी मुलाला रिंगणात उतरल्यानंतर हा वाद उघडपणे सुरू झाला. शेतकरी संपात श्री. खोत हे शेतकरी विरोधात लुडबुड करत असल्याचा आरोप श्री. शेट्टी यांनी केल्याने या दोघांतील मतभेदाची दरी आणखी रूंदावली. 
गेले सहा महिने सुरू असलेल्या या वादाचे पर्यवसान अखेर श्री. खोत यांच्या संघटनेतून हकालपट्टीत झाले. पण तरीही श्री. खोत यांनी श्री. शेट्टी यांचे नांव घेऊन कधीच टीका केली नाही. रांगड्या भाषेत समोरच्यावर वार करण्यात श्री. खोत यांचा मोठा हातखंडा आहे, पण श्री. शेट्टी यांच्या बाबतीत मात्र त्यांनी अजूनही हात अखडताच घेतल्याचे काल (ता. 16) दिसून आले. 

शाहुवाडी तालुका हा तसा श्री. शेट्टी यांचा बालेकिल्ला. त्यांच्या दोन्ही निवडणुकीत या तालुक्‍याने प्रचंड मताधिक्‍य त्यांना दिले आहे. याच तालुक्‍याच्या दौऱ्यावर जाऊन श्री. खोत यांनी नव्या संघटनेचे संकेत दिले. माझा भारतीय जनता पक्षातील प्रवेश ही अफवा गेले दीड वर्ष ऐकतोय, सत्तेतून बाहेर पडणार, असे म्हणणाऱ्यांचा शोध मी घेणार आहे, असा टोला श्री. शेट्टी यांचे नाव न घेता त्यांनी लगावला. मी आयुष्यात कुणामध्ये फूट पाडली नाही, दयाभावनेसाठी मी चळवळ करीत नाही, असेही ते म्हणाले. 

श्री. शेट्टी यांनी अलिकडेच शेतकरी कर्जमाफीसाठी पुणे ते मुंबई अशी आत्मक्‍लेश यात्रा काढली. या यात्रे दरम्यान श्री. शेट्टी यांच्या पायाला फोड आले होते. या यात्रेची खिल्ली उडवताना श्री. खोत म्हणाले," मीही पदयात्रा काढली; पण माझ्या पायाला फोड आले नाहीत. कारण माझे पाय वडिलोपार्जित मजबूत आहेत.' 
 

 

संबंधित लेख