sadabhau youth plan | Sarkarnama

तेच ते बिल्लेवाले सदाभाऊंना नकोत! 

सरकारनामा ब्युरो
सोमवार, 25 सप्टेंबर 2017

सातारा : कृषी व पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या रयत क्रांती संघटनेने प्रत्येक तालुक्‍यातील युवकांची फळी जोडण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. स्वत: सदाभाऊ कऱ्हाड, माण, खटाव तालुक्‍यातील युवकांशी संपर्क साधून त्यांना संघटनेत सामील करून घेण्यावर भर देणार आहेत. लवकरच संघटनेच्या वेबसाईटच्या माध्यमातून युवकांची ऑनलाइन व ऑफलाइन नोंदणी केली जाणार आहे. 

सदाभाऊंनी रयत क्रांती संघटना स्थापन केल्यानंतर पुढे नेमके काय होणार, याची उत्सुकता आहे. पण संवादातून संघर्षाकडे हे ब्रीद घेऊन पुढे निघालेल्या रयत क्रांती संघटनेला आवश्‍यकता आहे ती केवळ युवकांची. तेच तेच बिल्ले वाले, कधी या संघटनेतून त्या संघटनेत जाणारे कार्यकर्ते सदाभाऊंना नको आहेत. त्यांना नवीन युवा कार्यकर्त्यांची फौज निर्माण करायची आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्‍नावर सुरू असलेली चळवळ पुढे नेताना शेतकऱ्यांच्या मुलांना कौशल्य विकासाचे प्रशिक्षण देऊन त्यांना उद्योजक बनविण्यावर भर दिला जाणार आहे. शेतकऱ्यांचे प्रश्‍न सोडविताना त्यांच्या मुलांसाठी अधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून नवीन दिशा दाखविण्याकडे रयत क्रांती संघटनेचा कल राहणार आहे. कोणत्याही प्रश्‍नावर युवकांची माथी भडकविण्यापेक्षा त्यांच्या शक्तीचा उपयोग त्यांच्या भवितव्यासाठी करण्यावर संघटना भर देणार आहे. त्यासाठी प्रत्येक तालुक्‍यातून पाच हजार युवक जोडण्यावर भर दिला जाणार आहे. सध्या कऱ्हाड, माण, खटाव तालुक्‍यात सदाभाऊंनी युवकांशी संपर्क मोहिम सुरू केली आहे. लवकरच संघटनेची वेबसाईट तयार होणार आहे. या वेबसाईटच्या माध्यमातून युवकांची ऑनलाइन नोंदणी केली जाईल. ही नोंदणी पूर्णपणे मोफत असेल. या नोंदणीनंतर युवकांशी संपर्क करून त्यांना कौशल्य विकास व इतर तंत्रज्ञानावर आधारित प्रशिक्षण दिले जाणार आहे. 

संबंधित लेख